मुंबई : शिमग्याच्या मुहूर्तावर कमलनाथ सरकारला बसलेल्या दणक्यामुळे देशासह राज्यातील राजकीय वर्तूळात सर्वांना धक्का बसला आहे. ज्योतिराज शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. यातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना नाव न घेता टोला लगावला आहे, 'मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का? काका जरा जपून!', असा सल्ला पवारांना त्यांनी दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशातील या घटनेला लोकशाहीचा अपमान, असे म्हटले होते. यालाही भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "मध्यप्रदेशात जनादेशाचा अपमान झाला असे म्हणत आहेत. होळी आहे, भांग प्यायल्यामुळे दिग्विजय सिंहांना दोष देता येणार नाही. कारण शुद्धीवर असताना त्यांनी जनादेशाची भाषा केली नसती. महाराष्ट्रात शेण खाऊन सरकार बनवण्याचा विषय ताजा असताना", असा टोला भातखळकर यांनी हाणला आहे.
आता रडता कशाला ?
'चक्रव्यूहात कोंडून, कौरवांनी एकत्र येऊन, एकट्या अभिमन्यूची हत्या केलीत ना??? मग आता कमरेखाली प्रहार करून भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली तर रडताय कशाला?', असा सवाल त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला आहे.