बंगालची वाघीण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020
Total Views |
Richa-Ghosh_1  

 


आंतरराष्ट्रीय पातळीची क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगत, ते आपल्या कष्टाच्या जोरावर अवघ्या १६व्या वर्षी पूर्ण करणारी बंगालची वाघीण रिचा घोष हिच्या जीवनाची ही यशोगाथा...

 

 
जागतिक महिला दिनी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना खेळत भारताने नुकत्याच एका नव्या इतिहासाची नोंद केली. पुरुषांप्रमाणेच भारतीय महिलांनीही क्रिकेटच्या विश्वात आपले अस्तित्व सिद्ध केले असून आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठत भारतीय महिलांनी तमाम क्रिकेटच्या चाहत्यांना खूश केले. अंतिम फेरीत सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून खेळणारी १६ वर्षीय रिचा घोष हिचे करावे तितुके कौतुक कमीच, असे म्हटले तर ते कदापि चुकीचे ठरणार नाही.

 


याचे कारण म्हणजे
, ज्या वयात सर्वसाधारण मुले बोर्डाच्या परीक्षा देण्याच्या तयारीत असतात, त्याचवेळी रिचाने मात्र विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा सामना खेळत जगापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम बंगालच्या एका छोट्याशा गावात वास्तव्यास असणारी ही रिचा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळाडू बनेल, असा विचारदेखील तिच्या कुटुंबीयांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र, १६ वर्षीय रिचाने लहानपणीच आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पूर्णही केले. तिच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी असून ती सर्वस्वी कौतुकास पात्र आहे.

 


रिचा घोष ही मूळची पश्चिम बंगालची
. २८ सप्टेंबर २००३ साली पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे तिचा जन्म झाला. रिचाचे वडील मानवेंद्र घोष हे पेशाने शेतकरी. रिचाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा क्रिकेटशी तसा फारसा संबंध नाही. मात्र, सामने पाहण्याची आवड प्रत्येकाला आहे. भारत हा एक क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. देशातील प्रत्येक गल्लीबोळात हा खेळ आवर्जून खेळला जातो. क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगालमध्ये मिठाईप्रमाणेच या खेळांचे मोठे वेड आहे. त्यामुळे सिलीगुडी येथे अगदी लहानपणापासूनच रिचा क्रिकेट खेळू लागली.
 


वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासूनच रिचाने हातात बॅट पकडत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली
. सुरुवातीला ती गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळत असे. मात्र, यामध्येच ‘करिअर’ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षीच धरलेली बॅट आजतागायत तिच्या हातातून काही सुटलेली नाही, असे घोष कुटुंबीय अभिमानाने सांगतात. आजघडीला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळाडू म्हणून ओळख असली तरी येथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास फार संघर्षपूर्ण असल्याचे रिचा सांगते.

 


"आपले वडील शेती करत असल्याने क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे मी सिलीगुडी येथील मुलांसोबतच अनेक वर्षांपर्यंत क्रिकेट खेळत राहिले. लहानपणी क्रिकेट खेळताना काही वाटत नव्हते. मात्र, मोठे झाल्यावर अनेकांनी डिवचण्यास सुरुवात केली. क्रिकेट हा मुलींचा खेळ नाही. राष्ट्रीय स्तरावर काही महिला खेळत असल्या तरी श्रीमंत महिलांचेच ते चोचले. गावातील मुलींनी याचा नाद सोडायला हवा, अशा प्रकारे टोचून बोलत अनेकांनी मनाचे खच्चीकरण केले. मात्र, आपल्या वडिलांनी त्या काळात मोलाची साथ दिली. त्यामुळेच मी येथपर्यंतचा प्रवास करू शकले," असे रिचा अभिमानाने प्रसारमाध्यमांपुढे सांगते.

 


रिचाने वडिलांना क्रिकेटमध्ये करिअर करण्याबाबत सांगितले
. तिचा हा निर्णय कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीला परवडणारा नव्हता. मात्र, तरीही वडिलांनी रिचाला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचीही त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र, वडिलांनी त्यासाठी काही जणांकडून कर्ज काढत रिचाला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. वडिलांचा हा निर्णय रिचाने सार्थ ठरवला आणि कसून सराव करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षीच रिचाला तिच्यातील क्रिकेट खेळण्याच्या अनोख्या पद्धतीची जाणीव झाली. "भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणे मीदेखील उत्तुंग षटकार खेचू शकते, असा आत्मविश्वास मला माझ्या प्रशिक्षकांनी मिळवून दिला,", असे ती सांगते.

 


विशिष्ट पद्धतीने षटकार खेळण्याची शैली पाहून रिचाला २०१२ साली पश्चिम बंगालच्या वरिष्ठ महिला संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली
. तिच्या वयाची दहा वर्षेही पूर्ण झाली नव्हती. तरीदेखील रिचाला या संघातून खेळण्याची संधी मिळाली. अनेकांना क्रिकेट करिअरमध्ये दहा वर्षे पूर्ण केल्यानंतरही या संघातून खेळण्याची संधी मिळत नाही. परंतु, वयाची दहा वर्षे पूर्ण झाली नसतानाही वरिष्ठांनी संधी दिल्याबद्दल मनापासून आभारी असल्याचे रिचा सांगते.

 


पश्चिम बंगालच्या वरिष्ठ संघातून देशातील विविध राज्यांच्या संघाविरुद्ध खेळताना रिचाचा आणखीन क्रिकेटचा सराव झाला
. यादरम्यान बीसीसीआयच्या महिला निवड समितीची नजर तिच्यावर गेली आणि त्यांनी रिचाला आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या तिरंगी ‘टी-२०’ स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि रिचा सर्वत्र प्रकाशझोतात आली. या मालिकेनंतर ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचीही संधी तिला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आज नावलौकिक असला तरी भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे ध्येय रिचाने निश्चित केले असून पुढील वाटचालीसाठी तिला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!
 


- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@