स्वयंप्रेरितांसाठी 'त्यांचा' पुढाकार अनुबंध सामाजिक संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020   
Total Views |

Anubandha _1  H





 

समाजातील प्रत्येक वंचित घटकासोबत आत्मियतेचा 'अनुबंध' जोपासत कल्याण येथील 'अनुबंध संस्था' समाजिक काम करीत आहे. वंचित आणि 'नाही रे' गटात असणार्‍या आणि डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी 'अनुबंध सामाजिक संस्था' धडपडते. ज्या वंचित घटकांसाठी ते काम करतात, त्यांना आता 'अनुबंध सामाजिक संस्था' 'वंचित' असे संबोधत नाहीत. जगण्याच्या संघर्षात ही मुलेसुद्धा पुढे वाटचाल करत आहेत. म्हणून त्यांना 'स्वयंप्रेरित' म्हणतात.


महानगराच्या इतर परिसरांतून भंगार गोळा करायला आलेले तरुण आणि कल्याण डम्पिंग ग्राऊंड
, साठेनगर येथे राहणारे तरुण आता महाविद्यालयाची पायरी चढू लागले आहेत. साठेनगर येथील बच्चे कंपनी बालवाडीत जाऊ लागली आहे. शिवाय व्यसनाच्या विळख्यात अडकलेली मुले या जीवघेण्या विळख्यातून बाहेर पडू लागली आहेत. अशांशी मैत्री करून २००५ साली 'अनुबंध'ची स्थापना झाली. गेली १५ वर्षे ही संस्था या मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे. कल्याणमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या शेजारीच आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या कचर्‍याच्या भल्या मोठ्या डोंगर वाटेने जात असताना ठाण्याला राहणार्‍या मीनल सोहनी यांना कचरा वेचक मुलं दिसली. या कचरावेचक मुलांच्या आयुष्य सुधारण्यासाठी काहीतरी करावे, असा विचार आला व व त्यांनी या सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनुबंध सामाजिक संस्था निर्माण केली.


अभ्यास
, खेळ शब्दक्षमता वाढवणे, अभ्यासातील घटकांवर छोटी नाटुकले बसवणे, सहलीमध्ये उद्योजकता प्रशिक्षण, समूहगायन, चित्रकला ओरिगामी, मातीकाम, किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पर्यावरणस्नेही सण-समारंभ, पाणी आणि लाकूड न वापरता होळी, व्यसनमुक्ती उपक्रम 'अनुबंध' राबवते. याच जोडीला रत्नाकर मतकरींच्या 'वंचितांचा रंगमंच' या उपक्रमात सहभागी होऊन मुलांनी दोन्ही वर्षे पारितोषिक मिळवले. यावर्षी वस्तीतील ९९ टक्के विद्यार्थी यशस्वीपणे पुढच्या वर्षात गेले, अशा सर्वांचा शैक्षणिक गुणवत्ता सन्मान पुरस्कार देऊन या संस्थेने गौरव केला. कल्याणमधील कातकरींच्या वस्तीतही संस्थेने शैक्षणिक उपक्रम चालू केले आहेत.

 

रेल्वेस्थानक परिसरात जाऊन संस्थेचे कार्यकर्ते स्थानकांमध्ये राहणार्‍या मुलांशी मैत्री करतात आणि त्याच ठिकाणी मुलांसाठी शिक्षणाचे वर्ग सुरू होतात. सध्या संस्थेतर्फे रेल्वे स्थानक परिसर आणि कल्याण क्षेपणभूमी परिसरातील साठेनगर वस्तीत मुलांसाठी पूरक शैक्षणिक वर्ग भरवले जातात. तसेच रेल्वे स्थानकात राहणार्‍या मुलांना भाड्याने जागा घेऊन पर्यायी घर उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने शिक्षित केलेली रेल्वे स्थानकातील अनेक मुले दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. संस्थेतच शिकलेली काही मुले या कार्यात हातभार लावत आहेत. सामान्य मुलांसारखेच या मुलांमध्येही कला कौशल्य आहे.

 

रेल्वे स्थानकपरिसरात राहणार्‍या मुलांसाठी कार्यक्रम म्हणजे भाजीपोळी खाणे, वैद्यकीय मदत व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे. रेल्वेत वावरणारी निराधार मुले फार लहान वयात विविध व्यवसायांच्या आहारी जातात. त्यांना व्यसनांच्या जाळ्यातून बाहेर काढणे, या मुलांचा वाढदिवस साजरा करणे त्यांचे समुपदेशन करणे आदी कार्यही संस्था नि:स्वार्थी वृत्तीने अखंड करीत आहे. या मुलांसाठी उंबर्डे परिसरातील दोन खोल्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. तिथे त्यांना पर्यायी घर उभे करून देण्याचा 'अनुबंध'चा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे कला आहेत त्यासाठी पुढील शिक्षणाची व्यवस्था करणे, त्यांच्या घरच्या अडचणींमध्ये त्यांना मदत करणे, वस्तीतील पत्र्यावर चित्रकारी करणे, दिवाळी फराळ, किल्ले स्पर्धा, कंदील बनविणे आदी नावीन्यपूर्ण कार्यक्रम संस्था नेहमीच करत असते. शिवाय गणपतीनिमित्त वैचारिक उपक्रम राबविले जातात. या समाजात तळागाळातील लोकांना समान संधी मिळत नाही. रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमच सतावत असतो आणि आजही वनवासी पाड्यावर कुपोषणाचे दर्शन होते म्हणूनच अशा घटकांना आधार देण्यासाठी 'अनुबंध' संस्थेने स्वमदत गट निर्माण केला आहे.

 
 

एकीकडे समाजातील लोकांची मने एकमेकांपासून दूर झालेली असून दिवसेंदिवस ही दरी वाढतच चालल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी अनिरुद्ध मेंडकी आणि मानसी जोशी हे व्यवसायाचे लोकार्पण येथील मुलांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्यांचा जन्म आणि बालपण कचर्‍याच्या ढिगार्‍यासोबत गेले, त्यांचे भविष्य मात्र या कचर्‍याच्या ढिगार्‍यात घुसमटू नये व त्यांना चांगल्या जीवन पद्धतीचीदेखील ओळख व्हावी शिक्षणाबरोबर त्यांची साथ असावी, या हेतूने येथील मुलांसाठी 'बालभवन' ही संकल्पना अस्तित्वात आणली. या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांचे बोलणे सुधारावे आणि एका चांगल्या जीवन पद्धतीची ओळख व्हावी या दृष्टीने परिसरातच मुलांसाठी 'बालभवन' सुरू करण्यात आले आहे. 'अनुबंध' संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याचे बळ दिले. आता दुसर्‍या पिढीलाही मुख्य प्रवाहांसाठी सक्षम करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबीरदेखील राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी कापडी पिशवी बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत सुंदर कापडी पिशवी आणि भक्कम कागदी पिशव्या बनवून पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी उद्युक्त केले जात आहे.

 

संस्थेच्या माध्यमातून काही स्वयंप्रेरित मुलांसाठीदेखील काम केले जाते. बच्चे कंपनीमध्ये विमानाबाबत किती कुतूहल असते ते वेगळे सांगायला नको. विमानातून प्रवास करण्यापेक्षाही जवळून विमान बघण्याचा आनंद हा त्यांच्यासाठी अधिक मोठा असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. याच उद्देशाने कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांसाठी काम करणार्‍या 'अनुबंध' संस्थेने येथील मुलांना मुंबई विमानतळ दाखवण्याचा निर्णय घेतला. या संस्थेमध्ये काम करणार्‍या विशाल कुंटे या तरुणाने त्यासाठी पुढाकार घेत मुंबई विमानतळ प्राधिकरणाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि मग डम्पिंगवरील २८ मुलांसाठी असणारी ही सहल प्रत्यक्षात आली. 'जय हे' या विमानतळावरील संस्थेच्या गीतांजली यांनीही ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. रेल्वे, मेट्रोच्या माध्यमातून ही मुले विमानतळावर पोहोचली आणि मग सुरू झाला त्यांचा स्वप्नवत भासणारा अविस्मरणीय असा प्रवास. मुंबई विमानतळ त्यातही आंतरराष्ट्रीय टर्मिनल आणि त्याची भव्यता, आखीव-रेखीवपणा पाहून या मुलांच्या नजरा अक्षरशः खिळल्या होत्या. विमानतळावर पाय ठेवल्यापासून जणू त्यांची पावलं आणि मनं जणू काही हवेमध्येच तरंगत होती. या विमानतळ भेटीमध्ये मुलांना 'जय हे' संस्थेचे प्रदर्शन, परदेशातून आलेल्या आणि जाणार्‍या प्रवाशांची प्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानतळावर उभी असणारी विमानं दाखवण्यात आली.


कार्यकारिणी सदस्य
विजयभाई पंडित, अध्यक्ष, मीनल सोहनी, सचिव, विशाल जाधव, सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, अ‍ॅड. मीनाक्षी पाटील, डॉ. महेश भिवंडीकर.






@@AUTHORINFO_V1@@