आजीच्या पक्षात नातवाची ‘घरवापसी’ ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020
Total Views |
Shinde _1  H x





नवी दिल्ली (पार्थ कपोले) : "माधवरावांनी भारतीय जनता पार्टीमध्ये परत यावे, अशी आमच्या आईची (राजमाता विजयाराजे शिंदे) अखेरपर्यंत इच्छा होती. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले, मात्र तेव्हा त्यात अपयश आले. मात्र, आज आमच्या दादाच्या (माधवराव) ७५ व्या जयंतीदिनी आजीचा नातू आणि आमचा भाचा ज्योतिरादित्य भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत, ही फार महत्वाची घटना आहे..." अशी काहीशी भावनिक प्रतिक्रिया ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या आणि मध्यप्रदेशातील भाजपच्या आमदार यशोधराराजे शिंदे यांनी दिली.

 


भाजपच्या संस्थापकांपैकी एक राजमाता विजयाराजे शिंदे यांचे नातू
, काँग्रेसचे मातब्बर नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सांभाळून घेणारे काँग्रेसचे महत्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुळवडीचा मुहूर्त साधून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे अगोदरच गलितगात्र झालेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे उत्तर भारतात धुळवड साजरी होत असताना काँग्रेसवर मात्र शिमगा करण्याची वेळ ज्योतिरादित्य यांनी आणली.

 


मध्यप्रदेश
विधानसभा निवडणुकीत भाजपचा निसटता पराभव झाला आणि नशिबानेच काँग्रेसला सत्ता मिळाली. सुरूवातीचे काही दिवस शांततेत गेल्यानंतर कुरबुरा सुरू झाल्या होत्या, ज्योतिरादित्य शिंदे आपली नाराजी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काँग्रेसश्रेष्ठींना कानावर घातलीही होती. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्याकडे नेतृत्व देत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवावा, अशी शिंदे यांची मनापासून इच्छा होती. मात्र तसे झाले नाही आणि कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यानंतर सत्ता आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद हवे होते, काँग्रेसने त्याकडेही दुर्लक्ष केले. मग शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला, तेथेही त्यांना निराशा हाती लागली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक गुना मतदारसंघात त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर पक्ष राज्यसभेत आपले पुनर्वसन करेल, अशी आशा त्यांनी बाळगली होती. मात्र, मुरब्बी कमलनाथ यांनी तेथेही आडकाठी घातली. त्यानंतर मात्र ज्योतिरादित्य यांचा संयम संपला आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला.
 


खरे तर मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवून पक्षाला पुन्हा मजबूत करण्याची संधी काँग्रेसकडे होती. मात्र
, नवे नेतृत्व उभे करण्याऐवजी ते नेतृत्व सडविण्याची काँग्रेसची संस्कृती असल्याने हायकमांडच्या मर्जीतील कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. एकीकडे कमलनाथ आणि दुसरीकडे दिग्वीजय सिंह यांनी ज्योतिरादित्य यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. कारण ज्योतिरादित्य यांना पद दिले असते तर आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राहुल गांधी यांना झाकोळून टाकले असते, ही भितीही हायकमांडला सतावत असावी. त्यामुळे ज्योतिरादित्य यांचा जास्तीतजास्त खच्चीकरण करण्यास हायकमांडने परवानगी दिली असावी.

 


विशेष म्हणजे काँग्रेसची माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील ज्योतिरादित्य हे महत्वाचे शिलेदार (राजस्थानातले अन्य शिलेदार सचिन पायलटदेखील लवकरच वेगळा विचार करणार असल्याची चर्चा आहे). राहुल गांधी यांना नेहमीच ते सांभाळून घेत असत. मग लोकसभेतील चर्चा असो किंवा पत्रकारांशी बोलणे. अगदी मंदिरात गेल्यावर आरती कशी घ्यावी
, तिथल्या व्हिजीटर्स बुकमध्ये प्रतिक्रिया कशी लिहावी हेदेखील ज्योतिरादित्य अगदी जातीने त्यांना सांगत असत. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान मोदींना मिठी मारण्याचा पराक्रम राहुलनी केला होता. मिठी मारल्यानंतर ज्योतिरादित्य यांना त्यांनी मारलेला डोळादेखील सर्वांनी पाहिला होता. त्यामुळे हे सर्व होत असताना राहुल गांधी यांचे मौन अतिशय बोलके आहे. त्यामागे सोनिया – राहुल – प्रियांका यांच्यातील शीतयुद्ध तर कारणीभूत नव्हे, अशी शंका येण्यास बराच वाव आहे.
 
 

आणि एक वर्तुळ पूर्ण...

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरच्या गादीच्या स्थापनी केली ती थोरल्या बाजीरावांसमवेत रणमैदान गाजविणाऱ्या मराठा साम्राज्याचे पराक्रमी आधारस्तंभ असणाऱ्या राणोजी शिंदे यांनी. कालौघात शिंदे आडनावाचे झाले सिंदिया. शिंदे राजघराणा आणि जनसंघ भारतीय जनता पार्टीचे जुने संबंध. ग्वाल्हेर गादीच्या राजमाता विजयाराजे शिंदे या जनसंघाच्या मोठ्या नेत्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक. काँग्रेसपासून १९५७ साली आपल्या राजकारणाची सुरूवात करणाऱ्या राजमाता विजयाराजे शिंदे गुणा लोकसभा मतदारसंघातून त्या खासदारही होत्या. मात्र, त्यानंतर काही काळातच काँग्रेससोबत मतभेद झाले आणि राजमाता जनसंघात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांचे पुत्र माधवराव हेदेखील वयाच्या २६ व्या वर्षी जनसंघाचे खासदारक म्हणून निवडून आले होते.

 

मात्र, त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणिबाणी आणि आई मुलातील वाद यामुळे माधवरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जनता पार्टीचे सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, भैरोसिंह शेखावत यांच्यासोबतचे एक महत्वाचे नाव हे राजममाता विजयाराजेंचे होते. त्यामुळे आई भाजपची संस्थापक तर मुलगा काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती शिंदे कुटुंबात निर्माण झाली होती. तोपर्यंत माधवराव काँग्रेसमध्ये प्रस्थापित झाले होते आणि राजीव गांधी यांचे विश्वासू अशी ओळखही निर्माण झाली होती.

 

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसची सूत्रे आल्यावरही माधवरावांची काँग्रेसमध्ये महत्वाची भूमिका होती. माधवरावांचे नाव त्यावेळी पंतप्रधानपदासाठीदेखील घेतले जात होते. मात्र २००१ साली त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा होती, मात्र ती केवळ चर्चाच राहिली. आता मात्र भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत ज्योतिरादित्य यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस सोडण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे माधवराव शिंदे यांच्या ७५ व्या जयंतीचा मुहूर्त निवडला. माधवरावांनी भाजपमध्ये यावे, अशी राजमाता विजयाराजेंची अखेरपर्यंत इच्छा होती. त्यामुळे ज्योतिरादित्य यांनी भाजपप्रवेशाचे दिलेले संकेत पाहता आजीच्या पक्षात नातू घरवापसी करीत आहे, असे म्हणता येईल.



 
@@AUTHORINFO_V1@@