इस्त्रायल-महाराष्ट्र ऋणानुबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2020   
Total Views |


israel india relation _1&




इस्त्रायलमध्येही महाराष्ट्राचा डंका घुमत असल्याने आपल्या राज्यासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे
. इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालविले जात असून तेथील नागरिकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.


नुकताच
मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला. राज्यात मराठी बोलली जाणे निश्चितच स्वाभाविक आहे. मात्र, सातासमुद्रापार इस्त्रायलमध्ये देखील मराठी भाषेचा डंका वाजत आहे. यासंबंधीची माहिती नुकतीच समाजमाध्यमांवर प्रसारित होताना दिसली. तसेच याच देशामार्फत प्राप्त तंत्रज्ञानामुळे राज्यातील महत्त्वाचे पीक असणारी संत्रीदेखील आपला गोडवा पसरविताना दिसून येत आहेत. त्यामुळे इस्त्रायलमध्येही महाराष्ट्राचा डंका घुमत असल्याने आपल्या राज्यासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालविले जात असून तेथील नागरिकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रायलमधील नागरिकांना मराठी भाषा शिकणे का आवश्यक वाटते ? मराठीचा लळा या नागरिकांना कशासाठी आहे, हे जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहणे क्रमप्राप्त ठरते.



एका माहितीनुसार साधारण दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात तेथील ज्यू लोक एकंदरीत इस्त्रायलमधील बदलती सामाजिक स्थित्यंतरे लक्षात घेता इस्त्रायलमधून बाहेर पडू लागले
. यावेळी जगाच्या पाठीवरील विविध भागांना त्यांनी आपले आश्रयस्थान म्हणून निवडले. त्यातील काही नागरिक हे आपल्या राज्यातील अलिबाग येथे वास्तव्यास आले. कालांतराने हे सर्व ज्यू नागरिक भारताच्या मातीत आणि राज्याच्या संस्कृतीत सरमिसळून गेले. या नागरिकांना ‘बेने इस्रायली’ म्हणून ओळखले जाते. सुतारकामापासून ते तेलाचे घाणे चालवण्याचे व्यवसाय हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. कालपरत्वे हे लोक पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत स्थलांतरित होत गेले. यातूनच या नागरिकांचा मराठीशी ऋणानुबंध निर्माण झाला. आजही राज्याच्या काही शहरात या नागरिकांचे वास्तव्य आपणास दिसून येते. त्यांच्या मातृभाषेवर मराठी भाषेचे संस्कार झाले आणि जुदाव मराठी ही नवीन भाषा यातून निर्माण झाली.



मराठी चालीरिती
, संस्कार, पाककला या इस्त्रायली नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यांच्या राज्यातील वास्तव्याने बनल्या. कालपरत्वे जागतिक स्थिती सुधारत गेली. यातच इस्त्रायलची पुनर्बांधणी होण्यासदेखील सुरुवात झाली. तेथील स्थिती बदलत असल्याने साहजिकच सामाजिक स्थित्यंतरेदेखील बदलने क्रमप्राप्त होते. यातूनच जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी वास्तव्यास असणारे ज्यू लोक पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्र भूमीचा लळा लागलेल्या राज्यातील इस्त्रायली नागरिकांना मराठी भूमी सोडणे जड जात होते. त्यामुळे यातील काही नागरिक राज्यातच राहिले तर काही पुन्हा इस्त्रायलला परतले. मात्र, जे परतले ते मराठी भाषेची शिदोरी घेऊनच. त्यामुळे तेथे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या विनंतीनुसार तिथे मराठी भाषेचे वर्ग इस्त्रायलमध्ये सुरू करण्यात आले. यासाठीची जबाबदारी मुंबई विद्यापीठाकडे देण्यात आली. त्यामुळे आजही आपल्याला ज्यू लोक मराठी शिकतानाचे चित्र सहज दिसून येते. इतकेच नाही तर हे लोक आपल्या व्यवहारातदेखील मराठीचा वापर करत असून स्वतःला अभिमानाने मराठी संबोधत असल्याचे आढळते.



इस्त्रायलशी निर्माण झालेल्या या हृदयस्थ संबंधांचा फायदा राज्यातील महत्त्वपूर्ण पीक असलेल्या संत्री उत्पादनासदेखील झाला आहे
. नागपूरमधील जगप्रसिद्ध संत्रीस मागील काही वर्षात अनेकविध संकटांचा सामना करावा लागला. यातून मार्ग काढण्यासाठी इंडो-इस्त्रायल करार साकारण्यात आला होता. या कराराच्या माध्यमातून प्राप्त झालेले तंत्रज्ञान नागपुरी संत्र्यांसाठी वरदान ठरले आहे. यंदा संत्री उत्पादनात तब्बल तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच संत्र्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून नागपुरात इंडो-इस्रायल संत्री गुणवत्ता केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा उत्पादन वाढीच्या रूपाने सध्या दिसून येत आहे. अमरावती मार्गावरील संत्री गुणवत्ता केंद्राच्या दाव्यानुसार, इस्त्रायलच्या तंत्रज्ञानामुळे गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्हीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या तंत्रज्ञांच्या माध्यमातून एका हेक्टरमध्ये दहा टन उत्पादन देणारे शेतकरी आता त्याच जमिनीत चाळीस टन उत्पादन घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मानवी जीवनात प्रस्थापित होणारे संबंध हे कधी आणि केव्हा फलदायी ठरतील, याचे उत्तर नियतीलाच माहीत असते. हेच या संपूर्ण प्रवासावरून जाणवते.

@@AUTHORINFO_V1@@