कोणासाठी मधुर तर कोणासाठी कडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2020   
Total Views |


india shrilanka relation_



द्विराष्ट्र संबंधात मधुरता निर्माण झाल्यास त्रयस्थ राष्ट्रास ते खटकते आणि संबंधांत कटुता निर्माण होते. निर्माण झालेली कटुता ही पुन्हा माधुर्याचे स्वरूप धारणदेखील करत असते. असा संबंधांच्या हिंदोळ्यावर आंतरराष्ट्रीय संबंधांचा झुला कायमच झुलत असतो. सध्या भारताला या सर्वच अनुभवांची प्रचिती श्रीलंकेच्या रूपाने येत आहे.


आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपटावर कोणत्याही एका देशाचे संबंध दुसर्‍या देशाशी कायमस्वरूपी चांगलेच राहतील
, याबाबत शाश्वतता देणे अवघड असते. द्विराष्ट्र संबंधात मधुरता निर्माण झाल्यास त्रयस्थ राष्ट्रास ते खटकते आणि संबंधांत कटुता निर्माण होते. निर्माण झालेली कटुता ही पुन्हा माधुर्याचे स्वरूप धारणदेखील करत असते. असा संबंधांच्या हिंदोळ्यावर आंतरराष्ट्रीय संबंधांचा झुला कायमच झुलत असतो. सध्या भारताला या सर्वच अनुभवांची प्रचिती श्रीलंकेच्या रूपाने येत आहे. लिट्टेच्या दहशतीने ग्रस्त लंका आणि भारत यांच्या संबंधांत काहीसा दुरावा ९० च्या दशकात निर्माण झाला होता. सिंहली आणि तामिळी हा वाददेखील दोन देशांत चर्चेचा विषय ठरला. त्यातच तामिळनाडू सरकारची लंकेप्रती असणारी ध्येयधोरणेदेखील भारत-श्रीलंका संबंधात महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरली. त्यातच मागील काही काळात लंकेची चीनप्रती असणारी जवळीक हीदेखील भारतासाठी डोकेदुखी ठरणारी अशीच होती. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोगी संघटनेतील महत्त्वाचा आणि भारताशी सागरी सीमेने जवळीक साधणारा देश म्हणून श्रीलंका आपणासाठी अनेकार्थाने महत्त्वाचा आहे.



सध्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे भारतभेटीवर आले आहेत
. त्यांच्यात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेकविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि होणारदेखील आहे. यावेळी श्रीलंकेतील तामिळींच्या मुद्द्यावर समेट घडविण्यासाठी लंकेतील सरकार प्रयत्नशील असल्याचे राजपक्षे यांनी नमूद केले. तसेच त्यांनी श्रीलंका घटनेतील १३ व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्याची गरजदेखील यावेळी प्रतिपादित केली. या उभयतांत दहशतवादविरोधी सहकार्य, व्यापार व गुंतवणूक यांची व्याप्ती वाढविणे, द्विराष्ट्रातील संयुक्त प्रकल्प पूर्ण करणे, मच्छीमारांचे प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून सोडविणे आदी मुद्द्यांवरदेखील सकारात्मक चर्चा झाली. या भेटीला आणि चर्चेला खरे पाहिले तर एका वेगळ्या अर्थाने महत्त्व आहे. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात येत असतात, करारदेखील होत असतात. मात्र, भारतासाठी एका अर्थाने डोकेदुखी असणार्‍या देशाच्या जवळ गेलेले राष्ट्रप्रमुख जेव्हा भारतभेटीवर येतात, तेव्हा त्याला जागतिक पटलावर निश्चितच महत्त्व प्राप्त होते.



सन २००५ ते २०१६ या काळात जेव्हा राजपक्षे श्रीलंकेचे अध्यक्ष होते
, तेव्हा तेथे चीनने आपला विस्तार करण्यास सुरुवात केली होती. या काळात चीनने लंकेत आपले पाय भक्कम उभे केले होते, तसेच, हिंदी महासागरातदेखील चीनने आपले पाय भक्कम रोवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे लंकेत वाढणारे चीनचे वर्चस्व हे भारतासाठी मोठे तापदायक असेच होते. भारत-पाकिस्तान आणि चीन या देशांच्या त्रिकूटाचा अभ्यास केला तर श्रीलंकेचे भारतासाठी असणारे महत्त्व जाणवते. जगात चीन हा पाकचा पाठीराखा म्हणून परिचित आहे. नव्हे चीनने आपल्या धोरणांतून तसे अनेकदा दाखवूनदेखील दिले आहे. त्यामुळे श्रीलंका चीनच्या बाजूने गेल्यास भारतासाठी चीन पाकिस्तान हे भूमार्गाने तर श्रीलंका हा सागरी मार्गाने मोठी डोकेदुखी ठरणारा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लंकेसमवेत सुरू केलेली चर्चा ही भारतासाठी मधुर अशीच वार्ता आहे. मात्र, चीनसाठी हे पाऊल कडूपणा ठरणारे आहे.



आज चीन कोरोना व्हायरसच्या साथीने ग्रस्त आहे
. चीनसमोर सर्वात मोठे आव्हान कोरोनाचा निपटारा करणे हेच आहे. तसेच या व्हायरसमुळे चीनच्या अर्थव्यस्थेतदेखील चिंता निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘द इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृतानुसार आणि लंडन येथील आयएचएस या संस्थेच्या माहितीनुसार कोरोनाचे स्वरुप भयंकर आहे. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याबरोबरच जगाच्या अर्थव्यवस्थेलादेखील काही प्रमाणात चटके सहन करावे लागणार आहेत. अशा स्थितीत आगामी काळात चीनचे बहुतांश लक्ष हे आपल्या अर्थव्यवस्थेकडे असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच पाकला दिलेले कर्ज आणि त्याची न होणारी परतफेड यामुळेदेखील चीनला आपली धोरणे कदाचित बदलावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकसाठी एकमेव आशास्थान असणार्‍या चीनने पाकधोरण प्राधान्याने न घेतल्यास पाकसाठीदेखील ती धोक्याची घंटा असणार आहे. अशा सर्व स्थितीत भारत श्रीलंका संबंध मजबूत होणे, हे भारतासाठी केव्हाही अनुकूल असेच ठरणारे आहे. त्या दृष्टीने शासनाने टाकलेली पावले ही निश्चितच स्वागतार्ह अशीच आहेत.

@@AUTHORINFO_V1@@