मुंबई : ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विरोधात (सीएए) आवाज उठविणाऱ्या प्रवाशाला पोलिसांकडे घेऊन जाणाऱ्या ‘उबर’चालक रोहित गौर यांचा मुंबई भाजपकडून शनिवारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी रोहित गौर यांना ‘अलर्ट सिटीझन अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ विरोधात बोलत असल्याने ‘उबर’ चालकाने प्रवाशाच्या नकळत सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठत त्याच्या अटकेची मागणी केली होती. ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन असोसिएशन’च्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विटर पोस्ट करत सगळा घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर शनिवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटरवर रोहित गौर यांचा सत्कार करतानाचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, रोहित गौर याने ‘सीएए’वरून देशाविरोधात षड्यंत्र रचणाऱ्याला पोलिसांच्या हवाली केले. रोहित गौरला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात बोलावून जनतेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच ‘अलर्ट सिटीझन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.