पानिपत : मराठ्यांचा नैतिक विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020   
Total Views |
panipat_1  H x




इतिहासाच्या खांद्यावर बसून भविष्याचा आराखडा मांडता येतो, असे अनेकदा म्हटले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, रियासतकार सरदेसाई, वा. सी. बेंद्रे, ग. ह. खरे यांसारख्या महनीय व्यक्तींनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून वास्तव आपल्यापुढे मांडण्याचे मोठे काम साधारणतः गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये केले. अजूनही हे काम सुरूच असून मराठी मातीतल्या नव्या पिढीनेही ते काम स्वतःहून आपल्या अंगावर घेतल्याचे दिसते. इतिहास अभ्यासक, लेखक आणि व्याख्याते कौस्तुभ कस्तुरे हे त्यातलेआघाडीचे आणि तरुण-तडफदार व्यक्तिमत्त्व. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी महेश पुराणिक यांनी कौस्तुभ कस्तुरे यांच्या आतापर्यंतच्या लेखनाच्या व इतिहासविषय कामाच्या अनुषंगाने सविस्तर मुलाखत घेतली. पानिपतचे युद्ध आणि पेशवाई व सदाशिवरावभाऊ आदी घडामोडींशी संबंधित याच मुलाखतीचा पहिला भाग प्रकाशित करत आहोत...
 
 
  • ‘प्रतिशोध पानिपतचा’ ही आपली नव्याने प्रकाशित झालेली ऐतिहासिक कादंबरी. मुळात ‘पानिपतचे युद्ध म्हणजे मराठ्यांचा पराभव’ असा एक गैरसमज गेली अडीचशे वर्षे ठसवला गेला. परंतु, ‘पानिपत’ म्हणजे खरेच ‘मराठ्यांचा पराभव’ होता का?



‘पानिपतचे युद्ध’ म्हणजे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे इतके की, त्या युद्धाशी संबंधित अनेक गोष्टी गेली कित्येक वर्षं, अगदी आताआतापर्यंत नकारात्मक दृष्टीने पाहिल्या गेल्या. थोडक्यात सांगतो. आपण ‘१७६० गोष्टी करू नकोस’, ‘भाऊगर्दी झाली’, ‘विश्वास नाही माझा, तो पानिपतात केव्हाच गेला’ वगैरे म्हणतो. मी असेही ऐकलेय की, हरियाणात अजूनही कोणी तोर्‍यात काही बोलत असेल तर ‘खुदको भाऊ समझता हैं क्या’ असे म्हणतात. अर्थात, हे वाक्प्रचार, या म्हणी या पानिपतशी संबंधित आहेत. १७६० हे साल असे होते की, जेव्हा मराठ्यांनी एका वेळी अनेक गोष्टी केल्या. अंताजी माणकेश्वरांच्या एका पत्रात नानासाहेब पेशवे आणि एकंदरच मराठी फौजा १७५७ पासून सात निरनिराळ्या शत्रूंशी लढत आहेत असे आहे. यात गोवेकर आहेत, सिद्दी आहे, निजाम आहे, हैदर आहे आणि असे अनेक. मुळात एका वेळी अनेक ठिकाणी लढणे हे चुकीचे आहे, असे न समजता आम्हा मराठ्यांमध्ये एका वेळेस इतके सगळे शत्रू अंगावर घेण्याची धमक होती, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. एखाद्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असेल्या घोळक्याला ‘भाऊगर्दी’ म्हणताना मला पानिपतावर पठाणांनी घेरलेला सदाशिवरावभाऊ दिसतो. ‘विश्वास पानिपतात गेला’ म्हणताना तो अठरा वर्षांचा पोर युद्धात गोळी लागून रणांगणावर पडलेला दिसतो. ‘विश्वासराव’ अप्रतिम सुंदर होता. इतका की पेशव्यांचा बखरकार म्हणतो, ’बायकांत देखणी मस्तानी आणि पुरुषांत विश्वासराव’ असा हा मराठ्यांचा भावी पेशवा त्या युद्धभूमीवर पडला.
 
‘पानिपत हा खरेच मराठ्यांचा पराभव होता का?’ हा प्रश्न जेव्हा आपण इतिहासाला विचारतो तेव्हा इतिहास काहीसे अनपेक्षित उत्तर सांगतो. म्हणजे ’हो’ आणि ’नाही’ असेही. ‘हो’ का? तर युद्धभूमीवर अहमदशाह अब्दालीने मराठी फौजांना हरवले, मराठ्यांचा सेनापती मारला, एवढेच नाही तर ‘भावी पेशवा’ म्हणून फौज ज्याला बघत होती तो तरुणही मारला गेला. अफगाणांनी बाजार आणि युद्धसाहित्य लुटले, याशिवाय लुटायला खजिना शिल्लक नव्हताच, पण स्त्रियांची अब्रूही लुटली गेली. पुरुषांना गुलाम करण्यात आले. दुबळ्यांची कत्तल झाली. अर्थातच, लौकिकार्थाने हे युद्ध म्हणजे हारच. पण, ही झाली एकच बाजू. परराष्ट्रीयदृष्ट्या या युद्धाचे परिणाम पाहिले असता इतिहास काही वेगळे दाखवतो. अब्दाली इथे का आला होता? त्याच्या मर्जीतला बादशाह बसवावा, दिल्लीची मुघल सल्तनत त्याची अंकित म्हणून राहावी ही त्याची अपेक्षा होती. भाऊसाहेबांनी जेव्हा ’अब्दालीची जड हिंदुस्थानात रुतो देणे अयोग्य’ असे म्हणून ’चकतेयांची (चकते-चुघताई-मुघल) पातशाही राखणे हे आम्हांस अगत्य’ म्हटले त्याचा अर्थ अब्दाली परका आहे, अहमदिया करारानुसार मराठे हिंदुस्थानचे रक्षणकर्ते आहेत, तेव्हा त्याने आपल्या प्रदेशातच राहावे असे म्हणणे होते. प्रत्यक्ष पानिपत मोहिमेतही भाऊसाहेब म्हणतात की ’(अब्दाली)चे मते सरहिंदेची हद्द, आमचे मते अटकेची हद्द’ म्हणजेच अटकपर्यंतचा मुलुख हा आमचा आहे हे मराठ्यांचे धोरण होते. पानिपतच्या युद्धानंतर अटकेपर्यंत मराठे जरी जाऊ शकले नाहीत पुन्हा तरी तिथे सप्तसिंधूच्या प्रदेशात शिखांची सत्ता उदयाला आली, जिने अब्दालीला हिंदुस्थानापासून दूर ठेवले. युद्धानंतर अब्दालीने स्वतः नानासाहेबांना पत्र लिहून सांत्वन केले आणि म्हटले की माझी लढायची इच्छा नव्हती, पण तुमचा भाऊ हट्टाला पेटल्याने युद्ध झाले आणि तो मारला गेला. अब्दालीने ‘गुलजार’ नावाच्या वकिलासोबत पुण्याला पेशव्यांकडे मानाची वस्त्रे आणि भेट पाठवली. त्याने याकुबअलीला पुण्याला पाठवून ’पेशव्यांच्या मर्जीने तह करा’ म्हटले. वाटेत गाझीउद्दीन आणि सुरजमलने जेव्हा ‘पेशव्यांकडे जाऊ नका, आमच्याशी तह करा,’ म्हटले तेव्हा याकूब म्हणाला, ’शहांची आज्ञा आहे की खुद्द पेशव्यांशीच तह करा आणि त्यांना समजावून सांगा सगळे’ म्हणून. परत जाताना त्याने बादशहाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच लावली. पूर्वीप्रमाणे म्हणजे मराठ्यांनी जशी लावली होती तशी. बादशाह बसवला तो मराठ्यांच्याच मर्जीतला आणि अहमदिया करारही तसाच सुरू ठेवला. पानिपतनंतर नानासाहेब पेशवे जवळपास ४० हजार सैनिकांची फौज घेऊन अब्दालीवर चालून निघाले होते, पण सरदारांनी अडवल्याने ते भेलशापर्यंतच गेले. अब्दालीला या गोष्टी अर्थातच समजत होत्या आणि मराठे ताज्या दमाने आपल्यावर चालून आले, तर मात्र आपण जिंकत नाही हे त्याला दिसत होते. खुद्द पानिपतच्या युद्धात विश्वासराव पडेपर्यंत अब्दालीला आपण हरतोय असे वाटत होते आणि त्याने मागच्या मागे आपला कबिला वगैरे पळून जाण्यासाठी सिद्ध केला होता. या सगळ्यातून एकच दिसते ते म्हणजे केवळ योगायोगाने अब्दाली जिंकला, पण नंतर पुन्हा युद्ध झाले असते तर आपली धडगत नाही, हे त्याला कळून चुकले. हा मराठ्यांचा नैतिक विजय होता. ५०० कोसांवर जाऊन मराठे हिंदुस्थानसाठी लढतात ही ती नैतिकता होती. या दृष्टीने पाहायला गेले तर पानिपत हा आमच्यासाठी नैतिक विजयच होता.


  • ‘प्रतिशोध पानिपतचा’ ही कादंबरी लिहिण्यामागचा आपला नेमका उद्देश काय? तसेच या कादंबरीत पानिपतच्या युद्धाची कथा आहे की, पानिपतावरील कथित पराभवाचा सूड घेण्याची की, तत्कालीन वास्तव समजावून सांगणारी आहे?


पानिपतची ही जखम भळभळत राहिली. पण, मराठ्यांनी ही भळभळती जखम अडवली नाही, तिच्यावर खपली धरली, पण ती जखम दहा वर्ष भरू दिली नाही. पानिपतनंतर सहा महिन्यांच्या अवधीत उत्तरेची पुन्हा व्यवस्था लावून आलेले नानासाहेब पेशवे क्षयाने आणि त्यातच पानिपतच्या धक्क्याने मरण पावले. मृत्युसमयी नानासाहेबांनी काय उपदेश केला तो आज उपलब्ध आहे. ‘उत्तर पुन्हा मुक्त करावी आणि तिथे मराठ्यांचा अंमल बसवावा,’ हे स्वप्न आपल्या हयातीत नानासाहेबांना जमले नाही. पण, पुढे गादीवर आलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाने ते स्वप्न पूर्ण केले. नानासाहेब गेल्यावर रघुनाथरावांसारख्या घरभेद्या काकाला सांभाळून, त्यातही निजाम-हैदारादी सत्तांना धाकात ठेवून माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या सुमारे दहा वर्षांनंतर उत्तरहिंदची मोहीम पुन्हा उघडली. सुरुवातीला रामचंद्र गणेश कानडे यांना प्रमुख नेमून सुरू झालेल्या या मोहिमेत विसाजी कृष्ण बिनीवाले, तुकोजी होळकर आणि महादजी शिंदेसुद्धा होते. हे चार पराक्रमी सरदार उत्तरेत जाऊन त्यांनी उत्तरेत मराठ्यांचा जम बसवायला सुरुवात केली. अर्थात, चार डोकी एकत्र आल्यावर एकमेकांशी खटके उडणारच. या सार्‍यात रामचंद्र गणेशांना परत बोलवून माधवरावांनी मोहिमेची मुखत्यारी विसाजीपंतांवर दिली. बिनीवाले म्हणजे सैन्याच्या आघाडीचा प्रमुख सरदार. त्यात त्यांच्याकडे ’हुजुरात’ म्हणजे खाशा पेशव्यांचीही फौज होती. महादजी शिंदे यांची ही पहिली प्रदीर्घ मोहीम, जिच्यात त्यांनी आपले शौर्य पुरेपूर दाखवले. पानिपतनंतर जवळपास सात-आठ वर्षे महादजींना घरगुती भांडणांमध्येच अडकून पडावे लागले. दि. ७ फेब्रुवारी रोजी मराठी फौजांनी दिल्लीला मोर्चे लावले आणि १० फेब्रुवारी रोजी दिल्लीचा किल्ला जिंकला. केवळ तीन दिवसांत किल्ल्याने पांढरे निशाण दाखवले. म्हणजे सिंहगडसारखा किल्ला सहा महिने लाभूनही एके काळी मुघलांना जिंकता आला नव्हता, पण मध्यवर्ती सत्तेच्या राजधानीने मराठ्यांसमोर तीन दिवसांत दम तोडला. मराठी फौजांनी किल्ला ताब्यात घेऊन तिथे भगवा जरीपटका उभारला. शिवाजी महाराजांचे स्वप्नच जणू साकार झाले. पूर्वी भाऊसाहेबांनी किल्ल्यात भगवे झेंडे मिरवले होते, पण किल्ल्यावर सलग असा ध्वज लागला नव्हता तो आज लागला. पुढे मुघल बादशाहने ताबा घेईपर्यंत तीन महिने किल्ल्यावर आपला ध्वज फडफडत होता. एवढेच करून मराठे थांबले नाहीत तर पानिपत ज्याने घडवले तो नजीबखान नुकताच मरण पावला होता. झाबेतखान नावाचा त्याचा मुलगा त्याचीच ‘री’ ओढत होता. या रोहिल्यांच्या पत्थरगडावर मराठी फौजांनी हल्ला करून पत्थरगड अक्षरशः जाळला. महादजी शिंदे यांच्यासाठी ही तर नाजूक जखम. पानिपत मोहीम नजीबखानामुळे सुरू झाली, त्याच्याच दगाबाजीने दत्ताजी शिंदे मारले गेले. जानकोजीचाही भ्याडपणे खून पाडला गेला. जसे पेशवे घराण्यातील दोन पराक्रमी पुरुष मारले गेले, तसे शिंदे घराण्यातीलही दोन पराक्रमी वीर इथे मारले गेले होते. मराठ्यांनी पत्थरगडातल्या नजीबाच्या कबरीलाही सोडले नाही. थोडक्यात, ‘तू मेलास तरी तुला शांतपणे झोपू देणार नाही आम्ही, तुला उकरून पुन्हा गाडू’ अशी ईर्ष्या आता मराठी सैन्यात होती. यानंतरही ही मोहीम सुरू होती. पण, एवढ्यात माधवराव पेशवे गेले. त्यांच्या आयुष्यातील हे सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण झाले होते. हा पानिपतचा बदला होता, प्रतिशोध होता.
 
‘प्रतिशोध’ ही कादंबरी पानिपतानंतरच्या माधवराव पेशव्यांच्या दहा वर्षातील मुख्य घडामोडींवर आधारित आहे. यातही ‘उत्तरहिंद’ हा विषय असल्याने माधवरावांच्या हैदरअलीवरच्या मोहिमा यात नाहीत. पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पडतात इथून सुरू झालेला हा कादंबरीचा प्रवास पत्थरगड जिंकल्यावर पूर्ण होतो. माधवरावांची मानसिकता, त्यांनी बाहेरच्या आणि अंतर्गत शत्रूंना दिलेली यशस्वी लढत, त्यांचे स्वप्न वगैरे हे केंद्रस्थानी आहे. १६ वर्षांच्या कोवळ्या मुलावर संबंध हिंदुस्थानचा कारभार येतो, त्यात घरातलीच माणसे वाईटावर टपलेली असताना हा मुलगा सगळ्यांना पुरून उरतो ही गोष्ट सोपी नाही. सुरुवातीला रघुनाथरावांशी लढताना माघार घ्यावी लागली तेव्हा गोपिकाबाईंना वाईट वाटले आणि त्यांनी अन्नपाणी सोडले. हे पाहून १७-१८ वर्षांचा हा मुलगा आईला म्हणतो, “काळजी करू नकोस, हे लौकिकात बरे नाही दिसत. अन्नपाणी वगैरे सोडून दुःखी होऊन काही होणार नाही. आज वेळ माझी नाही असे समजून मी गप्प आहे, पण माझीही वेळ येईलच आणि तेव्हा जगाला दिसेल मी कोण आहे ते.” हे पत्र इतके थक्क करणारे आहे की परीक्षेत नापास झाल्यावर, लग्न मोडल्यावर, प्रेयसीने नकार दिल्यावर वगैरे साध्या साध्या गोष्टीवरून आत्महत्या करणारे कुठे आणि एक युद्ध हरूनही आत्मविश्वास न गमावता आईला समजावणारा हा मुलगा कुठे. हा एकच नाही, असे अनेक गुण आहेत माधवरावांचे. हे सगळे मला भावले, त्यांचे ते उत्तरहिंद, विशेषतः पानिपतचा बदला घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले तेव्हा त्यांनी विसाजी कृष्णांवर सोन्याची फुले उधळून पुण्यात स्वागत करावे वगैरे दिलेल्या आज्ञांवरून त्यांना किती आनंद झालेला ते मला जाणवले. सत्ताविसाव्या वर्षी हा माणूस हे जग सोडून गेला. इतके की एका पत्रात म्हटलेय, “श्रीमंत सोडून गेले. वाघ गेला, आता सारी कोल्ही उरली आहेत. या सार्‍यासाठीच ‘प्रतिशोध’ लिहावीशी वाटली. माझी ही पहिली कादंबरी असली तरीही इतिहासाची कास अजिबात न सोडता, केवळ नावापुरती दोन-तीन काल्पनिक पात्र घेऊन बाकी सगळे मूळ पुराव्यांनिशी लिहिले आहे.
 
  • पेशवाईकालीन विषय चालू आहे तर आपल्या ‘पेशवाई’ आणि ‘सदाशिवरावभाऊ’ या दोन्ही पुस्तकांबद्दल काय सांगाल
 
‘पेशवाई’ हे नाव घेतले की आजकाल काहीतरी वेगळाच अर्थ घेतला जातो. ‘पेशवाई’ म्हणजे वाईट, जशी मुघलाई तशी पेशवाई वगैरे अनेक. इतकेच नव्हे, तर काही जण ’पेशवाई’ हा शब्द इतिहासात कधीच नव्हता वगैरे म्हणतात, जे अर्थातच निरर्थक आहे. ‘पेशवाई’ हा शब्द जुना आहे. याचा अर्थ पेशवेपदाची गाडी चालवण्याची परंपरा ती ‘पेशवाई.’ खुद्द शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव, मोरोपंत पेशवे यांना ‘पेशवाई’ दिली, असे जेधे शकवलीत स्पष्ट म्हटले आहे. शाहू महाराजांच्या रोजनिशीत, अनेक पत्रांत, बखरींमध्ये ‘पेशवाई’ हा शब्द आपल्याला आढळून येतो. एकूणच, शाहू महाराज दक्षिणेत आल्यावर पुढे १७१३ मध्ये त्यांनी श्रीवर्धनकर भट घराण्यातल्या बाळाजी विश्वनाथांना पेशवाई दिली आणि आपल्या मृत्युसमयी नानासाहेबांना वंशपरंपरागत ‘पेशवाई’ चालू ठेवण्याची आज्ञा दिली. यानंतर सांगोला करारान्वये पुढे पेशव्यांनी मुखत्यारी घेऊन राज्य सांभाळले, त्यामुळे नंतर पुणे हे सत्ताकेंद्र बनले. १७१३ मध्ये या घराण्याकडे ‘पेशवाई’ येऊन १८१८ मध्ये तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात हे पेशवेपद इंग्रजांनी खालसा केले. या १०५ वर्षांच्या कालावधीत या घराण्याने जी काही चांगली-वाईट काम केली ती सगळी सोप्या भाषेत, सर्वसामान्यांना कंटाळा न येत समजावीत म्हणून ‘पेशवाई’ हे पुस्तक मी लिहिले. खरेतर पुस्तक लिहून चार वर्षे तसेच पडून होते, कारण ’हा विषय खपणार नाही, लोकांना आवडणार नाही’ म्हणून अनेकांनी ते नाकारलेही. पण, जेव्हा प्रकाशित झाले तेव्हा जवळपास महिन्याभरातच एक आवृत्ती संपली आणि हे सिद्ध झाले की ‘पेशवाई’बद्दल जाणून घेण्याचे कुतूहल अजूनही आहे. या पुस्तकात आधी जसे घडले तसे आणि मग परिशिष्टात माझी मते मी मांडली आहेत. शाहू महाराजांच्या मृत्युपत्रांसह काही अस्सल मोडी कागदपत्रांची छायाचित्रे आणि सगळ्या पेशव्यांचे मूळ शिक्केही पुस्तकात दिले आहेत.
 
‘सदाशिवरावभाऊं’बद्दल तेच. म्हणजे ’पानिपत हरले ते भाऊंमुळे, त्याला कसलाही युद्धाचा अनुभव नव्हता, तो बोरूबहाद्दर होता’ वगैरे चर्चा अजूनही झडत असतात. चावडीवर गप्पा माराव्या तसे कोणीही उठून पानिपतावर बोलतो आणि सेनापतीवर नाकर्तेपणाचा ठपका ठेवतो, ही गोष्ट मला सलत होती. त्यातच जातीयवादातून भाऊ अजूनच खलनायक बनत गेला. मूळ इतिहास काय सांगतो? सदाशिवरावभाऊंना पानिपतच्या जवळपास १५ वर्षे आधीपासून युद्धाचा अनुभव होता. भाऊंनी पानिपतच्या अगदी अकरा महिने आधी उदगीरचे युद्ध जिंकून निजामाचा पराभव केला होता. सदाशिवरावभाऊ हे कोल्हापूरच्या गादीचे पेशवेसुद्धा होते. ते जेवढे फडावर मुत्सद्दी होते तितकेच युद्धात शूर होते. हे सगळे पुराव्यांनिशी मांडावे म्हणून अखेरीस २०१७ साली ‘सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ’ हे पुस्तक लिहावे लागले. नाव देतानाही तो सगळ्या बाबतीत ‘धुरंधर’ होता हे दर्शवणे मला संयुक्तिक वाटले. ‘पेशवाई’ लिहिताना सोप्या भाषेत लिहावे हा हेतू असल्याने मी संदर्भ शेवटी जोडले आहेत, पण ‘सदाशिवरावभाऊ’मध्ये संदर्भ त्या त्या वाक्याला आहेत, जेणेकरून अभ्यासकांनाही या गोष्टीची मदत होईल. या पुस्तकातही भाऊसाहेबांच्या आयुष्याशी निगडित बखरी, पत्रे वगैरेंची चित्रे देण्यात आली आहेत.
 
 
(क्रमश:)
@@AUTHORINFO_V1@@