लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक! (भाग -१)

    08-Feb-2020
Total Views |
tilak_1  H x W:



महाराष्ट्रात क्रांतिकारकांची चळवळ घडली, वाढली ती टिळकांच्या काळात. देशपातळीवर टिळकांचे नेतृत्व ‘लोकमान्य’ होण्याचा तो काळ! ब्रिटिशांना जमेल त्या मार्गाने खिंडीत गाठण्याचे प्रयत्न टिळक करत होतेच. मात्र, सगळेच प्रयत्न त्यांना अगदी जाहीरपणे करता येत नसत. अशावेळी ‘क्रांती’च्या वाटेवरून चालणार्‍यांना टिळक आधार देत, त्याचे बळ वाढवत आणि काही सूत्र टिळकांना पडद्यामागून हलवावी लागत असत. ब्रिटिशांना जरब बसवण्यासाठीचा हा लपंडाव होता. क्रांतिकारकांच्या साथीने ब्रिटिश सरकारविरुद्ध हा लपंडाव टिळक कसे खेळले आणि कसे जिंकले, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘इतिहासाच्या पडद्यामागे’ डोकावून बघायला हवेच...!


महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या राज्यांमध्ये सर्वाधिक क्रांतिकारक होऊन गेले. महाराष्ट्रात १९२० पर्यंत सशस्त्र क्रांतिकारक मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. ज्या काळात ही क्रांतिकारकांची फौज महाराष्ट्रात वाढली, त्या काळी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या रूपाने महाराष्ट्राकडे होते, हे विसरून चालणार नाही. टिळकांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात क्रांतिकारकांच्या पिढ्या घडल्या. लोकमान्य टिळक हेसुद्धा काळवेळ पाहून सशस्त्र प्रतिकार करता येईल का, हे वेळोवेळी आजमावून पाहत. स्वतः टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात शस्त्राचा वापर कधी केला नाही, पण शस्त्रधारी देशभक्तांशी त्यांचा सतत संपर्क असे. अशा उलाढाली करणार्‍या मंडळींना ते प्रोत्साहन देत साहाय्य करत. त्यांच्या अडचणीच्या वेळी टिळक खंबीरपणे पाठीशी उभे राहत असत. त्यामुळे सशस्त्र प्रतिकार करणार्‍या लोकांना टिळकांचा पाठिंबा होता याची सरकारला दाट शक्यता वाटत होती. न. चिं. केळकर यांनी लिहिल्याप्रमाणे, “टिळकांचे नित्य स्वरूपाचे राजकारण हे कायदेशीर व सनदशीर असून दंडगाई, हुल्लड, शारीरिक प्रतिकार, भाषेचा अत्याचार, धाडस, धोका सोसण्याची तयारी, कायदेभंग, बंडखोरी या गोष्टी त्यांच्या नैमित्त्यिक सदराखालीच मोडतात.”


क्रांतिकारकांच्या धडपडीला पडद्यामागून टिळकांचा पाठिंबा होताच, तो जाहीरपणे ते बोलून दाखवू शकत नव्हते इतकेच! अर्थात, ‘राजकारण’ यालाच म्हणतात ना!


‘अभिनव भारत’ ही सशस्त्र क्रांतिकारकांची सर्वात मोठी संघटना. विनायकराव सावरकर तिचे संस्थापक. गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सवाच्या दरम्यान मेळ्यांच्या स्पर्धा होत असत. देशभक्तीच्या भावनेने भरलेली तरुणाई मोठ्या आवेशाने आपल्या शब्दांनी या काळात स्वातंत्र्याचा जयघोष करत असे. स्वातंत्र्याचे तेजोमय कार्य करणारे म्हणून खुद्द विनायकराव सावरकर, ‘अभिनव भारत’ संस्थेचे सक्रिय आणि ‘स्वातंत्र्यकवी’ म्हणून ख्याती असलेले गोविंद आबाजी दरेकर हेसुद्धा टिळकांच्या आणि शिवरामपंत परांजपे यांच्या प्रशंसेला पात्र ठरले होते. ‘शिवजन्मोत्सव’ आणि ‘गणेशोत्सवा’च्या माध्यमातून त्यांची पदे, कविता गाण्यासाठी बोलावणे येत असे. त्यांचे सहकारी भट लिहितात, “आमच्या मित्रमेळ्यातील गोविंदांची पदे पुण्यास लोकमान्य टिळक व काळकर्ते परांजपे यांनीही मुक्तकंठाने प्रशंसिली होती, खुद्द श्रीशिवाजी उत्सवाच्या वेळी निमंत्रणावरून, रायगडावरही या मेळाव्याच्या मुलांनी आपल्या स्वातंत्र्यगानाचा नजराणा अर्पिला होता व अखिल महाराष्ट्राचे मन आकर्षून घेतले होते.” (अभिनव भारत - वि. म. भट - पान क्र. २०) टिळकांनी सावरकरांच्या मित्रमेळ्याला पहिले पारितोषिक देऊन सुवर्णपदक दिल्याचे काहींनी आपल्या आठवणीत लिहिले आहे. या जहाल शब्दांतून ब्रिटिशशाही विरोधात जास्तीत जास्त द्वेष बाहेर पडू लागायचा, वातावरण तापायचे, टिळकांना नेमके हेच हवे होते, टिळकही मागेपुढे न पाहता अशा स्वातंत्र्यशाहिरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायचे.



टिळकांचा क्रांतिकारकांवर किती प्रभाव होता हे कबूल करताना भट लिहितात, “टिळकांच्या व्याख्यानासंबंधाने बोलणे, लिहिणे म्हणजे सूर्याला निरांजन दाखवणेच होय. जनतेवरचा त्यांचा पगडा अलौकिक होता. ते म्हणतील ती पूर्व दिशा, ही लोकांची भावना होती. त्यांच्या व्याख्यानांच्या परिणामाबद्दल मी काय व किती लिहावे? आमच्या उतास चाललेल्या घाईला त्यांनीच १९०६ मध्ये त्या वेळी पायबंद घातला होता.” ( अभिनव भारत - पृ. क्र. २३ ) नाशिकमध्ये बाबा सावरकरांच्या पुढाकाराने एक बैठक झाली होती, त्या बैठकीत या सळसळत्या तरुणांना उद्देशून टिळक म्हणाले होते, “आम्हीही अशा गुप्त चळवळी, शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली होती. किरकोळ तयारीने काही होणार नाही. तुम्ही उतावळेपणाने फार घाई करू नका. कार्य योग्य आहे, पण धीमेपणाने शिस्तीनेच चला.”


खरंतर ‘सबुरीने चला’ हे जरी सांगितलं तरी त्याचा किती उपयोग होईल, याची खात्री नव्हती. कारण, प्रत्येकजण देशभक्तीच्या भावनेने भारून आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करत असे. तात्या सावरकरांनी लिहिलेल्या ‘म्याझिनी’च्या पुस्तकाचे हस्तलिखित टिळकांनी वाचलं, तेव्हा ‘याची प्रस्तावना तरी गाळा’ असा सल्ला दिला होता, तो पुढे यावर काय करवाई होईल हे जाणूनच! अर्थात, त्याची पर्वा करत नसल्याने बाबाराव सावरकरांनी तो फेटाळून लावला हे वेगळं सांगायला नको. आपल्या कृत्याने आपल्याला किती शिक्षा होईल, त्याचे परिणाम काय होतील, याची कल्पना फारशी कुणालाच नव्हती. तत्कालीन लहान-मोठे वकील, ज्यांच्याकडे सल्ला विचारायला जावे, अशांना इतक्या मोठ्या गुन्ह्याचे काय परिणाम होतील हे नीटसे ठाऊक नसायचे. लहान-मोठ्या चोर्‍या, भांडणे यातच त्यांचे वकिलीचे ज्ञान संपून जाई. क्रांतिकारक विचार करत की, फारफार तर काय होईल, टोकाची अवस्था म्हणजे फासावर चढवले जाणे. या वधस्तंभाचे भय क्रांतिकारकांपैकी मात्र कुणालाही नव्हते. ते स्वातंत्र्याचे व्रत होते, स्वातंत्र्य मिळवण्याच्या ओढीची ती नशा होती. पारतंत्र्याच्या चिखलात रुतून बसण्यापेक्षा उद्याच्या स्वातंत्र्यस्वप्नांची नशा अधिक चांगली, नाही का?


ही रांगडी पोरं अजून पोरसवदा वयात होती, त्यांच्या योजना या नक्कीच धोकादायक होत्या, सोप्या नव्हत्या, भविष्यात त्यांना यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार हे टिळकांना दिसत होते; तरीही टिळकांनी त्यांना कधीही रोखून धरले नाही, त्यांच्या शक्तीचा विनियोग व्हावा यासाठी सबुरीचे काही मार्ग निर्माण करून दिले. त्यांना जबरदस्तीने टिळकांनी रोखून धरले असते, तर भडका आणखी उडाला असता आणि सगळ्याच कार्याचा बिमोड झाला असता. म्हणूनच तर सेनापती बापटांनी होतीलाल वर्मा यांच्या हाताने जी बॉम्ब बनवण्याची पाठवलेली पुस्तिका, तिची एक प्रत टिळकांनी आपल्याकडे ठेवली होती. ‘सशस्त्र उठाव करायला ४० टक्के लोक तयार झाले, तर आपण त्यांचे नेतृत्व करू,’ असे टिळकांनी बापटांना सांगून ठेवले होते हे विसरायला नको. सनदशील मार्गाने जाहीरपणे टिळकांना राजकारण करावे लागले तरी त्यांचे लक्ष या क्रांतिकारकांवर होतेच ना!


१९०८ साली जेव्हा टिळकांवर खटला भरला गेला, तेव्हा मुजफ्फरपूर बॉम्ब प्रकरण चर्चेत होते. त्यानंतर टिळकांना सहा वर्षे आणि अण्णासाहेब पटवर्धन यांना १९ महिने शिक्षा झालेली होती. बंगालमध्ये जे घडत आहे, त्याच्या मुळाशी टिळक आहेत, असा दाट संशय सरकारला होता. महाराष्ट्रात असेच काहीतरी होईल याची भीती वाटत होती. त्याची माहिती देण्यासाठी आणि खबरदारी घेण्यासाठी विलायतेतून हिंदुस्थान सरकारला काही तारा येत, त्याचा सुगावा काही गुप्त क्रांतिकारकांना लागला होता, यातून नेमके काय सांगतात हे ‘कोडवर्ड’मध्ये असायचे, टिळकांच्या खटल्याच्या संदर्भात त्या वेळी सरकारी खात्यात कामाला असलेले मोघे यांनी एके दिवशी रात्री मोठ्या हुशारीने ‘कोडवर्ड’ लिहिलेले काही कागद वि. म. भटांच्या हाती आणून दिले आणि त्याच्या अनुषंगाने भटांनी आणि त्याचे सहकारी हरी अनंत थत्ते यांनी काही तारांचा अनुवाद केला, त्यापैकी स्टेट सेक्रेटरी लॉर्ड मोर्ले यांनी व्हॉईसरॉयला तार केली होती आणि त्यात लिहिले होते, “टिळकांचा सावरकर आणि बापटांशी घनिष्ट संबंध आहे. तरी तुम्ही सावरकरांवर नजर असू द्या.” यातील ‘सावरकर’ म्हणजे ‘बाबा सावरकर’ असावेत! कारण, त्यानंतर लगोहात बाबा सावरकरांच्या घरावर २४ तास पोलिसांचा पहारा बसला. टिळक जसे या क्रांतिकारकांची काळजी करायचे, तसेच टिळकांसाठी हे क्रांतिकारकसुद्धा कुठल्या थरला जाऊन, जीवावर उदार होऊन हे काम करत होते याचेच हे उदाहरण, असे कित्त्येक प्रसंग अजूनही दडलेले आहेत.


भटांनी ‘अभिनव भारता’चा सगळा इतिहास लिहिला आहे. ते खरंतर राजद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झालेले, कटात गोवलेले, शिक्षा भोगून सुटका झाल्यानंतर सुमारे १० महिने उसनवारीवर जगलेले... त्यामुळे पोलिसांचा खडा पहारा त्यांच्यावर होता. त्यामुळे नोकरी मिळत नव्हती, उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. अशा काळात टिळकांनी ‘केसरी’, ‘मराठा’ याचा दुय्यम संपादक म्हणून भटांना नोकरीवर रुजू केले हे विशेष! भट लिहितात, “शेवटचा आसरा टिळक हेच होते. १९१५च्या डिसेंबरात मी त्यांना भेटलो व सर्व कहाणी सांगितली. टिळकांच्या आधारावरच पुढचा माझा संसार मी रेटला. इतकेच नव्हे, तर पुन्हा मेडिकल कॉलेजमध्येही त्यांच्याच आश्रयामुळे मी प्रविष्ट होऊन डॉक्टर होऊ शकलो. त्यांचे उपकार मी जन्मोजन्म विसरणार नाही.” (अभिनव भारत - पृ. क्र. १९५) नंतर मात्र ‘चिरोल केस’मध्ये त्यांच्या वकिलाने म्हणजेच कार्सन याने टिळकांना विचारले होते की, “तुम्ही राज्य क्रांतिकारक म्हणून कोर्टाने शिक्षा दिलेल्या भटांना आपल्या नोकरीत ठेवले आहे ना?” टिळकांनी त्याला सणसणीत उत्तर दिले होते, “होय! राजकारणात शिक्षा झालेले लोक राष्ट्राचे प्रधानही होतात!”


गणेशोत्सव, त्याच्या पाठोपाठ सुरु झालेला शिवजन्मोत्सव यांच्या माध्यमातून टिळक आपल्या विरुद्ध वातावरण बिघडवत आहेत, असे ब्रिटिशांना ठाऊक होते. मात्र, जाहीरपणे त्यांना पकडावे, अटक करावी अशी संधी यापैकी कशातूनच टिळकांनी ब्रिटिशांना मिळू दिली नाही. चापेकर प्रकरणात मात्र जरा गोष्टी वेगळ्या घडल्या. चापेकरांनी रँडला मारल्यानंतर इतर वर्तमानपत्रांनी यात टिळकांचा समावेश असलाच पाहिजे, अशा आशयचे बरेच लेखन केले होते. या खुनाशी टिळकांचा संबंध असलाच पाहिजे वगैरे लेखन ‘टाईम्स’, ‘मुंबई गॅझेट’सारख्या वर्तमानपत्रात सातत्याने प्रसिद्ध होऊ लागले होते. टिळक काहीही म्हणोत, त्यांची राज्यविषयक अप्रीती ही वरवरची तात्कालिक नसून फार खोल व स्थायी स्वरुपाची आहे, असे म्हणून ‘केसरी’ आणि पुण्याची इतर वृत्तपत्रे यांचा या खुनाशी संबंध आहे, असेही ‘टाईम्स’चे म्हणणे होते. ‘भावनगरी’ नावाच्या एका पारशी गृहस्थाने पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की, “शिवाजी उत्सवातल्या ज्या भाषणांनिमित्त टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लोकांनी लादला, तो जमेला धरून सामान्य लोकांना व विद्यार्थीवर्गाला जे शिक्षण पद्धतशीर देत आहेत व ज्यामुळे उत्सवानंतर एका आठवड्यात रँड व आयस्ट यांचे खून पडले, त्याविषयी स्थानिक अधिकारी काय करत आहेत ?” खरंतर हे भावनगरी आपलेच देशबांधव, तरीही आपल्याच माणसांच्या विरुद्ध ही माणसे वागली! देशाचे दुर्दैव, दुसरे काय! १९९७ साली टिळकांच्या खटल्याच्या पुस्तकाला ‘सेटलूर’ नावाच्या एका गृहस्थाने टिळकांचा खुनाशी संबंध असलाच पाहिजे, असे लिहिले होते. या काळात ‘केसरी’त प्रसिद्ध झालेले लेख आणि शिवजयंती उत्सवाच्या व्यासपीठावरून केलेली भाषणे राजद्रोही स्वरूपाची आहेत म्हणून त्यांना अटक झाली, ही अटक होण्यापूर्वीपासूनच त्यांनी ‘राजद्रोह कशाला म्हणतात?’ या आशयाचे लेखन करून आपल्या बचावाची दिशा ठरवली होती. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य, पत्रकारिता याबद्दलचे टिळकांचे चिंतन या लेखांतून प्रगट झालेले दिसेल, आजही ते तेवढेच वाचनीय आहे.


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या खटल्यात टिळकांनी माफी मागावी अशी मागणी वारंवार होत होती. मात्र, टिळकांनी याला साफ नकार कळवला. या सगळ्या प्रकरणाबद्दल टिळकांनी घोषबंधूंना लिहिलेल्या पत्रात एक उल्लेख सापडतो, टिळक लिहितात, “मी खटल्याला भिऊन दबलो तर मी अंदमानमध्ये राहिलो काय आणि महाराष्ट्रामध्ये असलो काय सारखेच, अशी माझी भावना आहे. माझे लोकांतले स्थान माझ्या चारित्र्यावर अवलंबून आहे. आणखी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन आपण सर्वजण लोकांचे सेवक आहोत. आणीबाणीच्या प्रसंगी शोचनीयरीत्या हातपाय गाळले तर लोकांचा विश्वासघात व निराशा केल्याचे पाप घडेल. जर मला शिक्षा झाली तर लोकांची सहानुभूती मला त्या संकटातून तारील.” टिळकांची ही वाक्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येकासाठी फार फार मोलाची आहेत.
(क्रमश:)
 
 
-  पार्थ बावस्कर