कांदळवनांवर भराव टाकणारा 'मेट्रो-३'चा ट्रक वन विभागाच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |
tiger_1  H x W:

कांजुरमार्गमधील कांदळवनांवर भराव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-३'च्या बांधकामस्थळावरुन वाहून आणलेले सिमेंट-मातीचे मिश्रण संरक्षित कांदळवन क्षेत्रात टाकणाऱ्या एका ट्रकला 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी मध्यरात्री कांजुरमार्ग परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती 'मॅंग्रोव्ह सेल'कडून 'मेट्रो-३' प्रशासनाला देण्यात येणार आहे.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
मुंबईत सध्या भूमिगत मेट्रो मार्गिका असणाऱ्या 'मेट्रो-३'चे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात मातीचा राडारोडा निर्माण होत आहे. मात्र, प्रकल्पामधून निर्माण झालेली ही माती कांदळवन आणि खाडीक्षेत्रांमध्ये विनापरवाना टाकली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. यापूर्वी पर्यावरणवाद्यांनी 'मेट्रो-३'च्या निर्माणस्थळावरुन माती वाहून नेणारे ट्रक कांजूरमार्गमधील खाडीक्षेत्राजवळ पकडले होते. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता खुद्द वन विभागानेच कांदळवन क्षेत्रात 'मेट्रो-३'च्या माती टाकणाऱ्या ट्रकला पकडले आहे.
 
 
 
 
बुधवारी रात्री गस्तीदरम्यान 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या कर्मचाऱ्यांना एक ट्रक कांजुरमार्गमधील कांदळवन क्षेत्रात (सर्वे क्रं. २७५) सिमेंट आणि मातीचे मिश्रण टाकताना दिसला. हा संपूर्ण भाग संरक्षित कांदळवन वनक्षेत्रात येत असल्याकारणाने आम्ही ट्रकला ताब्यात घेतल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. ट्रक चालक वजैर अहमद मसौंबर अली आणि सिराज अहमद इसाक अहमद यांची चौकशी केली असता त्यांनी हे मिश्रण 'मेट्रो-३'च्या बांधकामस्थळावरुन आणल्याचे सांगितल्याचे, कोकरे म्हणाले. चालकांना ट्रकमधील मिश्रण उवले परिसरात टाकण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, तरीही त्यांनी संरक्षित कांदळवन क्षेत्रात हे मिश्रण टाकून कांदळवनांना नष्ट करण्याचा प्रय़त्न केल्याने दोघांविरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 'मॅंग्रोव्ह सेल'च्या कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या 'मेट्रो-३'च्या ट्रकबाबत मेट्रो प्रशासनाला पत्र लिहणार असल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह सेल'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. या कारवाईसाठी मध्य मुंबई वनक्षेत्रपाल एस.डी. वरक आणि रेंज स्टाफ, पश्चिम मुंबई वनक्षेत्रपाल एस.एम.देशपांडे आणि नवी मुंबई येथील वनक्षेत्रपाल डी.एस. कुकडे यांनी मदत केली.
 
@@AUTHORINFO_V1@@