विजयी षट्कार कोण खेचणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2020
Total Views |

DAE_1  H x W: 0
नवी दिल्ली (पार्थ कपोले) : दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गेल्या महिन्याभरापासून धडधडत असणाऱ्या राजकीय पक्षांच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने आपला सर्व जोर लावत तुफान प्रचार केला. या निवडणुकीचे वर्णन क्रिकेटच्या 'ट्वेंटी - ट्वेंटी' सामन्याप्रमाणे करता येईल. सुरुवातीला अडचणीत असल्याचे वाटणाऱ्या भाजपने सामना 'सुपर-ओव्हर'पर्यंत खेचण्यात यश मिळविले आहे, आता विजयी षट्कार कोण खेचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. साधारणपणे डिसेंबरच्या मध्यापासून आप आणि भाजपने आपापल्या प्रचारास सुरुवात केली होती. गत निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळविणाऱ्या आपसाठी प्रारंभी ही निवडणूक फारच सोपी जाणार असल्याचे चित्र होते. त्याला कारण म्हणजे सत्ताबदल करण्याएवढी मतदारांमध्ये नसलेली नाराजी आणि भाजपने मुख्यमंत्रीपदाचा जाहीर न केलेला चेहरा. त्यामुळे भाजप आपल्याला आव्हान देईल, अशी कल्पनाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा नियोजनबद्ध झंझावाती प्रचार यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण बदलले आणि ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसल्याची जाणीव आपला झाली.
 
शाहीन बाग आंदोलन आले अंगलट
 
नागरिकत्व सुधारणा कायद्यास (सीएए) विरोध करण्यासाठी आंदोलक शाहीन बाग परिसरात पन्नासहून अधिक दिवस आंदोलन करीत आहेत. त्यामुळे नोएडास दिल्लीशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता बंद असून त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. शाहीन बाग आंदोलन हे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार, असा सुरुवातीला सर्वांचा कयास होता. त्याचप्रमाणे आप आणि काँग्रेसनेही आंदोलनात छुपा पाठिंबा अथवा त्याविरोधात काहीही न बोलण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, आंदोलनस्थळी बोलली जाणारी भाषा, पीएफआय या कट्टरतावादी संघटनेचा त्याला असलेला सर्व प्रकारचा पाठिंबा यामुळे दिल्लीकर जनतेच्या मनात शाहीन बाग आंदोलनाविषयी नकारात्मकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे या आंदोलनाविरोधात पोलिसी बळाचा वापर केला जाईल आणि त्यानंतर भाजपविरोधात मोठा असंतोष उसळेल, असा विरोधकांचा अंदाज होता. मात्र, भाजपने त्याबद्दल पद्धतशीर मौन पाळल्याने विरोधकांचा मोठा भ्रमनिरास झाला. भाजपला अडचणीचे ठरण्याऐवजी हे आंदोलन आपल्यालाच अडचणीचे तर ठरणार नाही ना, अशी भीती सत्ताधारी पक्षाला वाटू लागली.
 
भाजपचा नियोजनबद्ध प्रचार
 
भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत आपल्या पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि स्थिक मुद्द्यांची सुयोग्य सांगड घालण्यात भाजपला यश आले. दिल्लीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न म्हणजे स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, प्रदूषण आणि शिक्षण या मुद्द्यांवर भाजपने भर दिला. आम आदमी पक्षाने या मुद्द्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा दावा भाजपने प्रचारात केला. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची दिल्ली सरकारतर्फे न होणारी अंमलबजावणी हा प्रचारात महत्त्वाचा मुद्दा ठरला. अधिकृत करण्यात आलेल्या १७३१ अनधिकृत कॉलन्यांमधील मतदार कोणाकडे कौल देतो, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे सीएए हा अनपेक्षितपणे दिल्लीच्या प्रचारात महत्त्वाचा मुद्दा ठरला. सीएए हा राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रभावी ठरणारा मुद्दा नाही, असा जो समज निर्माण झाला होता तो यानिमित्ताने बऱ्याच अंशी पुसला गेला आहे. त्याचप्रमाणे शाहीन बाग आंदोलन, तेथे वापरली जाणारी भाषा, जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादंग आदींचाही प्रभाव निवडणूक प्रचारात पडला आहे. दिल्लीच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आणि भाजपने त्यावर मोठा जोर प्रचारात दिला.
 
भाजपची दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचारयंत्रणा हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. भाजपने राष्ट्रीय ते स्थानिक अशा सर्व प्रकारचे देशभरातील कार्यकर्ते प्रचारात उतरविले आहेत. त्यामध्ये नगराध्यक्ष, महापौर, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, आमदार आणि खासदार अशी फौज दिल्लीत प्रचार करीत होती. दिल्लीतील ७० मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ३५०० म्हणजे प्रत्येक मतदारसंघात ५० चौक सभा घेण्यात आल्या. सुरुवातीला एका मतदारसंघाची जबाबदारी एका खासदारावर होती, त्यानंतर एका मतदारसंघात पाच खासदारांना सक्रिय करण्यात आले; म्हणजे तब्बल तीनशेहून अधिक खासदार सक्रिय होते. त्याचप्रमाणे उमेदवारांची आणि अन्य नेत्यांची प्रचार यंत्रणा ही समांतरपणे कार्यरत होती. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, सत्ताबदलास कारणीभूत ठरेल एवढी नाराजी आपविरोधात नसल्याचेही सांगण्यात येत आहे. केजरीवाल यांनी गेल्या दीड वर्षांपासून केंद्र सरकारविरोधात संघर्ष ओढवून घेणे जवळपास थांबविले होते. परिणामी,दिल्लीकरही त्यामुळे खुश होते.
 
बदलता कौल...
 
भाजपला निवडणुकीत समाधानकारक कामगिरीची अपेक्षा असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. विविध सर्वेक्षणांचा कानोसा घेतला तर असे दिसते की, सुरुवातीला म्हणजे डिसेंबरमध्ये आप आणि भाजपमध्ये दिसणारा मतांचा संभाव्य फरक हा जवळपास ३० टक्के होता. मात्र, त्यात आता घट होऊन तो फरक सात ते दहा टक्क्यांवर आला आहे. अर्थात, तरीदेखील अनेकांची सत्तेसाठी आप हीच पहिली पसंती असल्याचे मत आहे. मात्र, भाजपही भरीव कामगिरी करेल, असेही अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
 
...तर भाजपला हरविणे अवघड!
 
माजी परराष्ट्र मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी आपल्या ट्विटमध्ये महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. ते म्हणाले की, “दिल्लीमध्ये एकदिलाने काम करणाऱ्या भाजपला हरविणे अत्यंत अवघड आहे, असे सुषमा नेहमी म्हणत असे. दिल्लीत आज नेमकी तशीच परिस्थिती निर्माण झाली असून कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करीत आहेत. भाजपसाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@