सिंहासन डळमळीत होऊ नये म्हणून...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2020
Total Views |

agralekh_1  H x



सत्ता टिकवायची तर सावरकरांची कोणी कितीही हेटाळणी करो, हिंदुत्वाच्या नावाने कोणी कितीही शिव्याशाप देवो, तोंडातून ‘ब्र’ही काढायचा नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला. अशा सावरकरद्रोही पक्षांची नेतेमंडळी उपस्थित असताना अनादी -अनंत सावरकरांवरील कार्यक्रम सादर करणे म्हणजे दिल्लीच्या नव्या ‘मॅडम’ आणि बारामतीच्या ‘काकां’च्या नाराजीने सत्तेचे सिंहासन डळमळीत होण्यासारखेच.



शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी राजभाषा दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरातील नियोजित
‘अथांग सावरकर’ कार्यक्रम नुकताच रद्द ‘करून दाखवला.’ ‘अथांग सावरकर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन होत नाही, या सबबीखाली सदर कार्यक्रम रद्द करत असल्याचे पत्रही महासंघाने सादरकर्ते-अभिनेते शरद पोंक्षे यांना पाठवले. परंतु, सबब मनोरंजनाची सांगितली जात असली तरी शिवसेनाप्रणित संघटनेकडून ‘अथांग सावरकर’ कार्यक्रम रद्द करण्यामागचे खरे कारण निराळेच असल्याचे जाणवते. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यासह देशानेही शिवसेनेच्या म्होरक्याने चालवलेला सत्तेचा तमाशा पाहिला. वडिलांचे नाव घेऊन स्वतःची सत्तालालसा भागवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालावर नाचण्याचे ठरवले.




‘वाघ वाघ’ म्हणवून घेणारे वांद्य्राच्या बंगल्यातले ठाकरे स्वतःहून पिंजर्‍यात येत असल्याचे पाहून दिल्लीश्वर आणि बारामतीकरांनीही आनंदाने टाळ्या पिटल्या. परंतु, सावज जाळ्यात आले तर त्याला पुरेसे खेळवून-फिरवून दमवले पाहिजे, या न्यायाने बैठकांचा झोलझमेला चालवत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला महिनाभर इकडून तिकडे-तिकडून इकडे झुलवत ठेवले. अखेरीस हिंदुत्वाचे, सावरकरश्रद्धेचे तत्त्व-निष्ठारूपी दात आणि नख्या गमावून भुंडा झालेला वाघ इशार्यावर उड्या मारायला तयार झाल्याची खात्री दोन्ही काँग्रेसला पटली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवले गेले. तिथून शिवसेनेची आपल्या मूळ भूमिकांवरून जी घसरगुंडी सुरू झाली, ती आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कार्यक्रम रद्द करण्यापर्यंत पोहोचल्याचे दिसते. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील शिवसेनेच्या सत्तेचे आताशी पन्नासेक दिवस झालेत, आणखी पन्नासेक दिवसांनी सेनेच्या नावातले ‘शिव’ तरी राहिल का? कारण, सेनेने ज्यांच्याबरोबर सत्तेचा पाट लावला, त्यांच्याच पूर्वसुरींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त ते दरोडेखोर आणि लुटारू म्हटलेले आहे ना? म्हणूनच आता सत्तेच्या हव्यासापायी सावरकरांना विसरलेल्या सेनेने वरून आदेश आल्यास शिवरायांचे नावही टाकून दिले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही किंवा त्या पक्षाने तसे करावेच, कारण टिपू सुलतानाच्या पाया पडणार्‍यांशी ज्या दिवशी घरोबा केला, त्याच दिवशी ठाकरे सेनेने शिवछत्रपतींच्या नावाला जागण्याचे सोडून दिले!



दरम्यान
, मराठी राजभाषा दिनाच्या नियोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-मंत्रीही हजेरी लावणार असल्याचे समजते. परंतु, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून इतरांचा सावरकरविरोध लपून राहिलेला नाही. काँग्रेसने तर सातत्याने आपल्या दर्जाहीन मानसिकतेचे दर्शन घडवत देशासाठी दोन दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा वापरली. राहुल गांधी तर फिट आल्यासारखे मिळेल त्या मंचावर सावरकरांची यथेच्छ निंदानालस्ती करताना दिसले. अर्थात, राहुल गांधींसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या ज्या वेळी सावरकरांविषयी अपशब्द वापरले, त्या त्या वेळी मर्द मावळ्यांची संघटना म्हणवून घेणार्‍या शिवसेनेने शेपूट घालणेच पसंत केले.



सत्ता टिकवायची तर सावरकरांची कोणी कितीही हेटाळणी करो
, हिंदुत्वाच्या नावाने कोणी कितीही शिव्याशाप देवो, तोंडातून ‘ब्र’ही काढायचा नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला. अशा सावरकरद्रोही पक्षांची नेतेमंडळी उपस्थित असताना अनादी-अनंत सावरकरांवरील कार्यक्रम सादर करणे म्हणजे दिल्लीच्या नव्या ‘मॅडम’ आणि बारामतीच्या ‘काकां’च्या नाराजीने सत्तेचे सिंहासन डळमळीत होण्यासारखेच. मतदारांशी बेईमानी करून ज्या सत्तेचा अट्टाहास पुरा केला, ती सत्ता अंदमानातल्या काळकोठडीत एकेकाळी शिक्षा भोगणार्‍या सावरकरांसारख्या क्रांतिकारकासाठी कशी सोडता येईल? हाच विचार स्वतःला ‘सावरकरानुयायी’ म्हणवून घेणार्‍या शिवसेना व त्या पक्षप्रणित स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने केला आणि मनोरंजनाच्या सबबीखालीअथांग सावरकर’ कार्यक्रम रद्द ‘करून दाखवला.’ अर्थात, वचनपूर्तीच्या कार्यक्रमात नट-नट्यांना नाचवत लावण्यांचा बार उडवून देण्याची बौद्धिक पातळी असलेल्या पक्ष व त्याच्या कार्यकर्त्यांकडून याहून निराळे काय होणार म्हणा?



आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
, ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्याच महिन्यात केलेले दोन गौप्यस्फोट. सत्तास्थापनेपूर्वी घटनाबाह्य कोणतेही काम करणार नाही, असे आम्ही सोनिया गांधींच्या निर्देशावरून शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे चव्हाण म्हणाले होते. चव्हाणांच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की, शिवसेनेला आम्ही जे करायला लावू तेच घटनाधीन, बाकी सगळेच घटनाबाह्य! म्हणूनच ‘शिवसेनेचे हिंदुत्व आणि सावरकरांवरील आस्था’ हा काँग्रेसच्या दृष्टीने घटनेच्या चौकटीबाहेरचा विषय. मग त्याच हिंदूसंघटक सावरकरांवरील कार्यक्रम मराठी राजभाषा दिनी सादर करणे काँग्रेस व त्याच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसलाही कसे रुचेल? परिणामी, मनोरंजन होत नसल्याची सबब सांगत ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ त्यांनी शिवसेना व सेनाप्रणित संघटनेच्या कर्त्याधर्त्यांवर आणली. मते मिळावीत म्हणून सावरकर आणि हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या शिवसेनेनेही मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी निर्लज्जपणे स्वतःच्याच विचारांचे वस्त्रहरण होऊ दिले. तसेच मुस्लिमांच्या आदेशावरून आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत आल्याचेही अशोक चव्हाण आणि मुस्लिमांमुळेच राज्यात सत्तापालट झाल्याचे शरद पवार म्हणाले होते.



अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी लाचार आहेत ते मुस्लिमांपुढे
, ही जाणीव या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेला करून दिली. परिणामी, ज्यांच्या टेकूवर आपली सत्ता चाललेली, त्यांचीच जर हिंदुत्वाची व्याख्या करणाऱ्या, हिंदुत्वाची संकल्पना मांडणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कार्यक्रमाने मर्जी खप्पा झाली तर? तर सत्तेचा गाडा उलटा-पालटा होण्याचा धोका. ते होऊ नये, या भीतीने सावरकरांवरील कार्यक्रमच सादर न केलेला बरा, असा विचार आयोजकांनी केला. हिंदुत्वाचा घोष करणार्‍या आणि सावरकरांना आदर्श मानणार्‍या मतदारांचा, जनतेचा याहून निराळा अवमान तो कोणता असेल? त्या अवमानाला रोखठोक प्रत्युत्तर नंतर इथली जनता देईलच. परंतु, हे शिवसेनेला आता समजणार नाही, कारण तो पक्ष सध्या सत्तेच्या धुंदीत पवार आणि गांधी समजून घेण्यासाठी शंभर जन्मांची तयारी करत आहे आणि त्याची ग्वाही सेना प्रवक्त्यांनीच दिलेली ! म्हणूनच त्यांचा थांग लागेपर्यंत शिवसेनेने स्वतःचे मनोरंजन करून घेणे योग्यच, फक्त त्यासाठी राहुल गांधींना मंचावर आणायचे की आदित्य ठाकरेंना, याचाही निर्णय एकदा घेऊन टाका.

@@AUTHORINFO_V1@@