शरीर उत्तम चांगले...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


health_1  H x W



शरीराच्या साहाय्यानेच आपणास सृष्टीतील सर्व भोग्य पदार्थांचे सेवन करता येते. सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो आणि याच साधनरूप शरीराने जीवनाचे अंतिम साध्य असलेले परब्रह्म साधता येते, इतके या शरीराचे महत्त्व आहे.


अयं लोक
: प्रियतमो देवानामपराजित:।

यस्मै त्वमिह मृत्यवे दिष्ट: पुरुष: जज्ञिषे।

स च त्वानुह्वयामसि मा पुरा जरसो मृथा॥

(अथर्ववेद-5/30/17)

अन्वयार्थ

(पुरुष) हे जीवात्म्या! तुझे (अयम्) हे (अपराजित:) कदापी पराजित न होणारे (लोक:) शरीररूपी लोक, जग (देवानाम्) विद्वान व दिव्य ज्ञानी जनांचे (प्रियतम:) अतिशय प्रिय असे स्थान आहे. (यस्मै मृत्यवे) ज्या मृत्यूकरिता (दिष्ट:) निश्चित होऊन(इह) या जगात (जज्ञिषे) तू जन्माला आला आहेस. (स: च त्वा) अशा मृत्यूच्या पाशात अडकलेल्या तुला (अनुह्वयामसि) मी - ईश्वर इशारा, संकेत देतो की तू (जरस: पुरा) जरावस्थेच्या, म्हातारपणाच्या अगोदर (मा मृथा:) मरू नकोस!



विवेचन


जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणजे
‘शरीर’ होय. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ साधावयाचे असतील तर सर्वात मोलाचे असते ते शरीरच! शरीराशिवाय काहीच करता येत नाही... म्हणून कठोपनिषदात ‘शरीरं रथमेव तु।’ असे म्हटले आहे. म्हणजेच शरीर हे रथ आहे, ज्यात आत्मा हा राजा आहे. शरीराचे अस्तित्वच जर का नसेल, तर आत्मा हा या जगात आपले आवागमन करू शकणार नाही आणि कर्मही करणार नाही. शरीराच्या माध्यमाने मानव उत्तमोत्तम कामे करीत इहलोक आणि परलोक साध्य करू शकतो. इतकेच नव्हे, तर शरीराच्या आधारेच तो पवित्र व शुभ कर्मांद्वारे जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटून आपला मोक्षमार्ग प्रशस्त करू शकतो. समर्थ रामदासदेखील हाच भाव व्यक्त करतात -

या नरदेहाचेनि आधारे।

नाना साधनाचेनि द्वारे ॥

याच नरदेहात पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकारादी तत्त्वे विद्यमान आहेत. ज्यांच्या योगे मानव आपले इप्सित साध्य करू शकतो. यासाठीच ते या शरीराची प्रशंसा करताना म्हणतात -

धन्य धन्य हा नरदेहो ।

येथील अपूर्वता पाहो ॥

सदरील मंत्रात शरीराची महिमा गाताना ऋषी म्हणतात की, हे पराजित न होणारे प्रमुख साधन आहे. ‘देवानां पूरयोध्या।’ आठ चक्रे व नऊ द्वारांनी युक्त ही दिव्य तत्त्वांची अयोध्या म्हणजेच अपराजिता नगरी आहे. संसारसागराला तरून नेणारी ही अजेय नौका आहे, पण याची किंमत मूर्ख लोकांना कशी कळणार? कारण, नानाविध व्यसनांमध्ये गुरफटून व अनिष्ट सवयींना बळी पडून हे आंधळे जग या अपूर्व देहाची विटंबना करते. शरीर मिळाले आहे, तर मग त्याचे रक्षण काय आपोआप होणार काय? त्याकरिता दररोज नियमितपणे व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान, उचित आहार-विहार, निद्रा आणि यम-नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. तसेच ब्रह्मचर्यसेवनाने या शरीराला बळकटी प्रदान केली, तर मग हे शरीर मजबूत बनते आणि याला कोणीही पराजित करू शकणार नाही.



वेदांत एके ठिकाणी म्हटले आहे
, ‘अश्मा भवतु ते तनु:।’ अर्थात, ‘हे माणसा! तुझे शरीर दगडाप्रमाणे टणक व बलशाली बनो.’ बलिष्ट शरीरामध्येच सशक्त इंद्रिये व आत्मा शोभून दिसतो. शरीर कमजोर आणि रोगी असल्यास काहीच साध्य होणार नाही. रोगट शरीरे अकार्यक्षम बनतात आणि अशक्तता व दैन्यावस्थेमुळे नेहमी शत्रूकडून अपमानित होतात. वेळप्रसंगी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मारही खावा लागतो. अशी कुचकामी शरीरे काय कामाची? ती विद्वान व ज्ञानी लोकांनाच नव्हे, तर सामान्यांनाही आवडणार नाहीत. एका सुभाषितात म्हटले आहे, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।’ सर्व प्रकारच्या पवित्र, उत्तम व श्रेष्ठ अशा धार्मिक कार्यासाठीचे शरीर हेच सर्वात मोठे साधन आहे, म्हणून शरीराची उपेक्षा करता कामा नये. संत तुकाराम देखील म्हणतात,

शरीर उत्तम चांगले,

शरीर सुखाचे घोसुले।

शरीरे साध्य होय केले,

शरीरे साधले परब्रह्म ॥

शरीराच्या साहाय्यानेच आपणास सृष्टीतील सर्व भोग्य पदार्थांचे सेवन करता येते. सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो आणि याच साधनरूप शरीराने जीवनाचे अंतिम साध्य असलेले परब्रह्म साधता येते, इतके या शरीराचे महत्त्व आहे.



सदरील मंत्रात पुढे महत्त्वाची बाब विशद केली आहे
, ती म्हणजे ‘मृत्यवे दिष्ट: इह जज्ञिषे।’ या जीवात्म्याचा मृत्यू निश्चित आहे. या जगात प्रत्येकाला मृत्यूसाठीच जन्माला यावयाचे आहे. योगेश्वरांनीदेखील म्हटले आहे - ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु, ध्रुवं जन्म मृतस्य च।’ जन्माला आलेल्याचा जसा मृत्यू निश्चित आहे, तसाच मृत झालेल्याचा जन्मदेखील निश्चित! जन्मासोबत मृत्यू जोडला गेला आहे... राजा असो की रंक, गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकालाच या जगातून एके दिवशी जायचे आहे. कोणीही कायमचा इथे राहणारा नाही. जन्म-मृत्यूचा हा अटळ सिद्धांत प्रत्येकाने लक्षात घेतला, तर माणूस काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, मद-मत्सरादी दोषांना प्राप्त होणार नाही. मृत्यूला समोर पाहून कधीही आपल्या स्वार्थात लिप्त होणार नाही. शेवटच्या मंत्राशांत जीवात्माकरिता विशेष संदेश देताना वेदमंत्र म्हणतो - ‘मा पुरा जरसो मृथा:।’ अर्थात, ‘हे माणसा! वार्धक्याच्या अगोदर तू मृत्यूला प्राप्त होऊ नकोस. व्यर्थ मानसिक चिंता व शारीरिक वेदना करून घेऊ नकोस. आत्महत्येचे विचार मनात बाळगू नकोस. नेहमी आनंदी, उत्साही व आत्मविश्वासाने जगण्याचा प्रयत्न कर.’



शिशु
, बाल, कुमार, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा मानवी देहाच्या विविध अवस्था आहेत. या सर्व अवस्थांतून जाणे इष्ट. शेवटी जरा (वृद्ध) अवस्थेला प्राप्त होऊनच जगाचा निरोप घ्यावा म्हणजे अकाली मृत्यू नको. लवकर मरणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे हे कृत्य तर परमेश्वराकडून मिळालेल्या या अमूल्य नरदेहाचा अपमानच! अनुचित आहार, नियमित व्यायामाचा अभाव व अयोग्य दिनचर्येमुळे मृत्यू लवकर ओढवतो. म्हणून माणसाने अकाली मृत्यूकरिता कारणीभूत ठरणार्‍या या सर्व दोषांना टाळावे आणि ‘जीवेत् शरद: शतम्।’ या वैदिक सूक्तीप्रमाणे शंभर वर्षांचे आयुष्य आनंदाने जगावे. त्याकरिता या शरीराचे रक्षण प्रयत्नपूर्वक करावे. नानाविध रोगांनी ग्रासून निर्धारित आयुष्याच्या मर्यादा ओलांडत मृत्यूला कदापि कवटाळू नये. हेच जीवनाचे खरे रहस्य आहे.



-
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

९४२०३३०१७८

@@AUTHORINFO_V1@@