भीष्मांची राजनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


bhishma pitamah_1 &n



न्यायप्रियता हेच उत्तम राजाचे लक्षण. राजाने कधीही आपल्या राज्यातील दुबळ्या जागा उघड करू नये. उलट शत्रूच्या राज्यातील दुबळ्या जागा हेरता आल्या पाहिजे. याशिवाय आपल्या गुप्त योजनांचा थांगपत्ता कुणालाही लागू देता कामा नये. त्याची वागणूक अतिशय सरळ असावी. स्वभाव कोमल असावा, परंतु याचाही अतिरेक होऊ देऊ नये.

 


युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विनंती केली
, “राजधर्म म्हणजे काय? राजाची कर्तव्ये कोणती, याबद्दल मला कृपा करून सांगा.” त्याची नम्रता व ज्ञानपिपासा पाहून भीष्मांना आनंद झाला. ते म्हणाले, “तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात मला आनंदच आहे. परमेश्वराची व ज्ञानी ब्राह्मणांची पूजा करणे, हे राजाचे प्रथम कर्तव्य होय. राजा नेहमीच कृतिशील असावा, राजा कधीच प्राक्तनावर काही सोडत नाही. कृती ही प्राक्तनाला आकार देते. कृतिशीलतेबरोबर सत्यभक्ती श्रेष्ठ आहे. राजा नेहमीच सत्यभक्त असावा. राजा विविध गुणांनी संपन्न असावा. त्याची वागणूकही निष्कलंक असावी. आत्मसंयम, नम्रता आणि सदाचार हे गुण त्याने जोपासावे.त्याने सर्व वासनांवर विजय मिळवावा. न्यायप्रियता हेच उत्तम राजाचे लक्षण. राजाने कधीही आपल्या राज्यातील दुबळ्या जागा उघड करू नये. उलट शत्रूच्या राज्यातील दुबळ्या जागा हेरता आल्या पाहिजे. याशिवाय आपल्या गुप्त योजनांचा थांगपत्ता कुणालाही लागू देता कामा नये. त्याची वागणूक अतिशय सरळ असावी. स्वभाव कोमल असावा, परंतु याचाही अतिरेक होऊ देऊ नये. कारण, मग प्रजेला त्याचा आदर व दरारा राहणार नाही. कोणत्याही प्रकारचा अतिरेक राजाने टाळावा. तो अतिकठोर वागला तरी प्रजेला अप्रियच होईल. सेवकांची निवड कशी करावी, हे त्याला अवगत असावे. त्याने स्वभावात करूणा ठेवावी. मात्र, क्षमाशील असूनही दुबळे नसावे, नाहीतर प्रजा त्याचा गैरफायदाच घेईल. राजा नित्य दक्ष व जागरूक असावा. त्याने मित्रांचा व शत्रूंचा सतत अभ्यास करावा. प्रजाहित हेच त्याचे आद्यकर्तव्य होय. प्रजाहिताचा ध्यास असावा. कुणावरही पूर्ण विश्वासू नये. आपल्या मनात काय चालले आहे, ते कुणालाही कळू देऊ नये.



जो शत्रू आपल्याहून सामर्थ्यवान आहे
, त्याच्याशी मैत्री करावी. आपल्या बरोबरीचा असेल त्याच्याशी युद्ध करावे. आपल्याहून दुबळा असेल, त्याच्यावर आक्रमण करावे. विवेकबुद्धी नित्य जागृत ठेवावी. आपले गुप्तहेर नित्य तरबेज ठेवावेत. शत्रूच्या अधिकार्‍यांना लाच, लालूच दाखवून आपलेसे करावे. राजाची वाणी नित्य प्रसन्न असावी. नित्य प्रजेच्या पित्याप्रमाणे वागावे. वेगवेगळ्या खात्यांवर तरबेज माणसे निवडावी, नेमावी. पडकी घरे त्याने बांधून द्यावीत म्हणजे तो लोकप्रिय होईल. गुन्हेगारांना यथोचित दंड करावाच. आपला खजिना सदैव समृद्ध ठेवावा. अधिकार्‍यांवर बारीक लक्ष ठेवावे. आंधळा विश्वास नाशास कारणीभूत होतो. त्याला शत्रूच्या राज्यातील निष्ठेचे खच्चीकरण करता यावे. शत्रूच्या गोटात आपले हितचिंतक निर्माण करावेत. राजाने गुप्तता पाळून आपले सैन्य वाढवावे. तो मनमोकळा असावा पण कुटिल व कारस्थानी पण असावा.”



युधिष्ठिराने विचारले
, “राजाला ’राजन’ असे का संबोधतात? त्याला वेगळी वागणूक का मिळते?” भीष्म म्हणाले, “एक काळ असा होता की, राजाला अस्तित्त्वच नव्हते. शिक्षाही तेव्हा नव्हती. सर्व माणसे सदाचरणी होती. सगळे एकमेकांना सांभाळत होते. पण पुढे अनेक चुकीच्या गोष्टींनी मानवाच्या हृदयात प्रवेश केला. लोभ, क्रोध यांनी माणसाचा ताबा घेतला. मग मानवाचे सदाचरणी रूप बदलले. देवांनाही भीती वाटू लागली की, मानव आत्मनाशाकडे जातो आहे. ते ब्रह्मदेवाकडे गेले. ’मानवाला वाचवा’ म्हणून ब्रह्माची आराधना त्यांनी केली. मग पितामह ब्रह्मा यांनी एक लाख धडे असलेला प्रबंध लिहिला, ज्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांचे वर्णन होते. शिक्षा कशी व कुणाला करावी, हे त्यात लिहिले होते. दुकानदार, व्यापारी यांनी संपत्ती कशी राखावी व वाढवावी, तापसांनी तपस्या कशी करावी, संन्यस्तांनी कसे वागावे हे सर्व सुचविले होते.कायदा कसा अमलात आणावा, धर्माचरण, गुप्तहेर संस्था असे अनेक विषय त्यात चर्चिले होते. त्याला त्यांनी ‘दंडनीती’ असे नाव दिले. त्या सर्वात प्रमुख स्थान राजाचे आहे.”



युधिष्ठिराने मग विचारले
, “पितामह, मग प्रजेची काय कर्तव्ये असतात?” भीष्म म्हणाले, “प्रजेच्या हितासाठी राजाला निधी लागतो. त्यासाठी प्रजेने आपल्याकडील पाळीव जनावरातला एक पंचमांश भाग, मूल्यवान धातू एक पंचमांश, धान्य एक दशांश राजाला दिले पाहिजे. जे जे शस्त्रविद्येत निपुण आहेत, त्यांनी आपणहून सैन्यात भरती व्हावे. प्रजेच्या गुणांचा एक चतुर्थांश भाग व दोघांचाही चतुर्थ भाग राजाकडे जातो.” युधिष्ठिर म्हणाला, “राजाची विशेष कर्तव्ये कोणती?” भीष्म म्हणाले, “स्वत:वरती नियंत्रण कसे ठेवावे, हे त्याला माहिती पाहिजे.जो स्वत:च्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवतो, तोच शत्रूवर विजय मिळवतो. किल्ल्यांमध्ये, नगरात, सीमेवर राजाने पुरेसे सैन्य सज्ज ठेवावे. गुप्तता ही खूप महत्त्वाची. ती पाळली गेलीच पाहिजे. गुप्तहेर खूप हुशार असावेत. कार्यक्षम हवेत. एका गुप्तहेराला दुसर्‍याची माहिती नसावी. शत्रूवर अचानक हल्ला करावा. समजा एखादा शत्रू अधिक समर्थ आहे, असे कळले तर सलोखा करावा. संरक्षक सैन्याकरिता प्रजेच्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाने घ्यावा. प्रजा ही राजाला मुलासारखी असते, परंतु चुकीच्या वर्तनाला शिक्षा ही झालीच पाहिजे.



- सुरेश कुळकर्णी 

 

(क्रमश:)

@@AUTHORINFO_V1@@