आज दिवस तुमचा समजा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |


wada _1  H x W:



आम्ही वाड्यातील अतिदुर्गम अशा भागातील शाळांना भेट द्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे आधी वडपाडा या शाळेत जाऊन आलो होतो आणि आता तिथूनच सुनीता कारंडेबाई शिकवत असलेल्या खोडदे शाळेत येऊन पोहोचलो. वाटेत बाई त्या शाळेबद्दल माहिती सांगत होत्या. अतिदुर्गम भागातील या शाळा. या शाळेत कोणीही शिक्षक स्वतःहून बदली मागत नाही, कारण येण्याजाण्याकरिता सहज वाहन नाही आणि रस्त्यापासून सामसूम असे एक किलोमीटरभर चालत जावे लागते. या शाळेत बदली म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटावी. खोडदेच्या शाळेत कोणी यायला का धजत नाही, याचा प्रत्यय शाळेत पोहोचेपर्यंत आम्हालाही आला. भोईरसर मुलींना स्कॉलरशिपच्या सराव परीक्षेसाठी गारगावला घेऊन गेले होते. वर्गात मुलं आमची वाट बघत बसली होती, तर काही मुलं बाहेर उभी होती. बाईंना बघून सगळ्यांनी वर्गात धूम ठोकली आणि चटचट आपापल्या जागेवर जाऊन बसली. बाईंनी वर्गावर नजर फिरवल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, करण कुठे दिसत नाही. बाईंनी विचारलं, "करण आला नाही का शाळेत?" त्यावर एका मुलानेच चटकन उत्तर दिलं, "आला व्हता पण भांडण झालं म्हणून घरी गेला." मग बाईंनी त्याला बोलवायला एका मुलाला पाठवले आणि ५-७ मिनिटांतच करणने आपल्या स्टाईलमध्ये वर्गात एंट्री केली. नेहमीप्रमाणे आम्ही स्वच्छता किटचे वाटप केले. आजूबाजूला निरीक्षण केल्यावर दिसून आले की, वर्ग सुबकपणे सजवला होता. मुलांशी संवाद साधल्यावर त्यांच्यातील इतर कौशल्यांचीही माहिती मिळाली. बाईंनी आठवण करून देताच सगळे जेवायला पळाले. वाड्याजवळील इस्कॉनच्या संस्थेतून मुलांना रोज जेवण येते. दुसर्‍या वर्गात त्यांची जेवणाची तयारी झाली होती. 'वदनी कवळ...' पाठोपाठ 'बाई जेवायला या' असेही म्हणून झाले होते. 'आता तरी जेवा' असं बाईंनी सांगितलं तरीही मुलं जेवायला तयार नाहीत. मग बाईंनी एक घास खाल्ला आणि त्यानंतरच मुलांनी जेवायला सुरुवात केली. सगळे एक वर्तुळ करून शिस्तीत जेवायला बसले होते.

 

अतिदुर्गम भागातील खोडदेची शाळा असली तरी टापटीप आणि शिस्तबद्ध. याचे सारे श्रेय येथे याआधी असलेले शिक्षक दीपक शनवारे यांचे आहे. ते जवळजवळ ७-८ वर्षं या खोडदे शाळेत होते आणि एक शिस्तबद्ध शाळा म्हणून तिला घडवले आणि त्यानंतरचे धिंडासरही. त्या दोघांच्या नीटनेटकेपणाचे आणि शिस्तीचे धडे आजही गिरवले जातात. अर्थात हे सांगताना बाईंच्या चेहर्‍यावर या शिक्षकांविषयी अभिमान आणि आदर दिसून येत होता. आजही त्याच शिस्तीत ही शाळा आणि शाळेचे कामकाज चालते. बाई शाळेविषयी माहिती सांगत असताना मुलांचे जेवण झाले होते. बाईंनी विचारले, 'तिळमाळच्या शाळेत सगळे येणार ना?...' त्यासरशी सर्वांनी एका सुरात 'हो' म्हटले आणि सर्वजण हात व जेवणाचे ताट धुवून तयार झाले. "त्यानिमित्ताने मुलांची परिसर अभ्यासाची सहलही होऊन जाईल," असं बाई म्हणाल्या. तिळमाळची शाळा. अवघे ५ विद्यार्थी असलेली ही शाळा! या शाळेबद्दल बाईंनी आम्हाला आधीच विचारले होते... "नदीचे पात्र पार करून पलीकडे शाळा आहे. तुम्ही येणार ना? रस्ता चांगला नाही. चालतच जावे लागणार आहे." आम्हीही होकार दिला. खोडदे शाळेपासून आमची सहलच निघाली म्हणायला हरकत नाही. जोडी जोडी करून मुलांसोबत आम्हीही जंगलाच्या वाटेने चालत होतो. पुढे नदीच्या पात्राला जास्त पाणी नव्हते. नदी पार केली तरी पण अजून शाळा कुठेच दिसत नाही. त्यावर कळले की, आता टेकडी पार करून जायचे आहे. हे ऐकून मात्र पोटात गोळा आला. कारण, पूर्ण रस्ता दाट झाडीतून आणि डोंगराळ होता. त्या मोठमोठ्या खडकांवर पाय ठेवून वाट काढत जाणे भलतेच कठीण गेले आणि भीतीसुद्धा वाटली. पूर्ण डोंगर पार करेपर्यंत खूपच दमछाक झाली. मी आणि गौरी तर पार थकून गेलो. पण आमच्या बरोबरची मुलं मस्त मजेत पटापट उड्या मारत बाईंशी गप्पा करत, वाटेत कुठे बोर कधी कुठे दगड गोळा कर अशी बागडत चालली होती. त्या मुलांपैकीच सरिता आणि जयश्री मात्र आमची काळजी घेत आमचा हात धरून चालत होत्या. तिळमाळची शाळा कधीच सुटली होती, पण ३ मुलं आमची वाट आतुरतेने पाहत होती. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघून आमचा थकवा कुठच्या कुठे पळाला. उरलेली दोन मुलं मात्र बोरं काढायला रानात निघून गेली होती. स्वच्छता किटबरोबरच त्या मुलांना आम्ही टॉफी आणि खाऊ दिला.

 

त्या मुलांनी टॉफीचा कागद फेकून दिले नाही, तर शाळेच्या दरवाजाला त्याचे तोरण बनवणार होते. हे ऐकून खूप मस्त वाटलं. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे गाणे आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकले आहे आणि स्वप्नही बघितले आहे. या प्रसंगाने त्या गाण्याची आठवण झाली आणि मन लहानपणात कधी घेऊन गेले, ते कळलेच नाही. सगळे मस्त मजा करत खाऊ खात होते. परत येताना मात्र आम्ही दुसर्‍या बर्‍यापैकी चांगल्या रस्त्याने आलो आणि पाहिलं तर त्या ठिकाणी नदीला पाणी होतं. मुलांची तर मजाच झाली आणि बाईंनी होकार देताच सगळ्यांनी नदीत मस्त डुबकी मारली. काही जण खेकडे पकडत होते, तर मुली रंगविण्यासाठी गुळगुळीत गोटे गोळा करत होत्या. मस्त यथेच्छ नदीत डुंबून झालं होतं. या सर्वांत करणची जास्त मजा चालली होती. आम्हीही त्यात सहभागी झालो होतो. अशी परिसर अभ्यासाची सहल मी, ओंकार, संपदा, आशिष आणि गौरी पहिल्यांदाच अनुभवत होतो. खोडदे शाळेत परत येताना वाटेत दिसणार्‍या झाडांबद्दल, रानभाज्यांबद्दल मुलं आम्हाला माहिती सांगत होती. आता मात्र प्रचंड भूक लागली होती. जयश्रीच्या घरी जेवणाची सोय केली होती. बाहेर मुलं तिथे कोंबडी पकड, बकरी पकड, तर कुणी झाडाच्या झावळीचे पदर कातून छान छान आकार बनवत होती... करण तर मस्त झाडावर चढून उलट टांगून बसला होता. आता आमची निघायची वेळ झाली होती कारण ओंकारचे शिक्षकांसाठीचे ट्रेनिंग सेशन दुसर्या ठिकाणी सुरू होणार होते. सगळ्यांचा निरोप घेऊन निघणे थोडे जडच गेले. सरिता अजूनही माझा हात धरून होती. कारंडेबाईंनी मुलांना सांगितले की, ओंकारदादा आणि सगळे पुन्हा नक्की येणार आहेत. मुलांसाठी आणलेले कपडे त्यांना दिले आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आमच्या गाडी दिसेनाशी होईपर्यंत मुले धावत आणि आम्हाला टाटा करत पळत होती. आम्ही मागे वळून त्यांना पाहत होतो आणि टाटा करत होतो. हा पूर्ण दिवस या मुलांसाठी आणि आमच्यासाठी कवी भा. रा. तांबेंच्या कवितेप्रमाणे अद्भुत आणि अविस्मरणीय होता,

 

या बालांनो या रे या

लवकर भर भर सारे या

मजा करा रे , मजा मजा

आज दिवस तुमचा समजा

 

- पूर्णिमा नार्वेकर

९८२०००३८३४

 
 
@@AUTHORINFO_V1@@