व्हायरल चेक : कोंबड्यांना 'कोरोना' नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |
corona_1  H x W





व्हाट्सअॅपवर फिरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये; डॉ. अजित रानडेंचे नागरिकांना आवाहन 


मुंबई : सध्या चीनमध्ये 'कोरोना' विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची दहशत अवघ्या जगात पसरली आहे. मात्र नेहमीप्रमाणेच व्हाट्सअॅप आणि तत्सम समाज माध्यमातून या विषयी अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोंबडीला कोरोना झाल्यामुळे चिकन खाणे टाळावे, असे मेसेज छायाचित्रासहित व्हाट्सअॅपच्या माध्यमातून फिरत आहेत. मात्र यामागची सत्यता पडताळून पाहत असताना ही सर्व माहिती चुकीची असून, बातमी निव्वळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.


'ही निव्वळ अफवा असून, लोकांनी व्हाट्सअॅप विद्यापीठातून बाहेर येऊन वास्तविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे,' असे महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर याच्या अंतर्गत असलेले मुंबई पशुवैद्यकीय महविद्यालयाचे कुक्कुटपालनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी संगितले. याविषयी सांगताना ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये सध्या अशी कुठलीही घटना झालेली नाही ज्यामध्ये असा विषाणू कुठल्याही कोंबडी किंवा तत्सम प्राण्यात आढळलेला नाही. सध्या समाज माध्यमांतून जे संदेश पोहचवले जात आहेत ते चुकीचे आहे. 'कोंबडीला कोरोनाची बाधा, चिकन खाणे टाळा' अशा मथळ्याखाली जे फोटो व्हायरल होत आहेत, तो कोरोना विषाणू नसून 'राणीखेत' नावच्या रोगाची लक्षणे दिसत आहे. मुळात आपली मांस शिजवून खाण्याची पद्धत ही अतिशय सुरक्षित आहे. एखादे मांस १०० डिग्री सेल्सियसवर उकळल्यावर त्यातले जीव-जंतु निघून जातात, शिवाय भारतीय आहारात वापरले जाणारे मसाले हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने या धोक्याची शक्यता उद्भवतच नाही.


भारतात अशा प्रकारे मृत्यू कोणाचाही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. लोकांनी व्हाट्सअॅप विद्यापीठातून बाहेर येऊन वास्तविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे काही असल्यास आम्ही स्वतः लोकांना या खबरदारी घेण्यासंबंधी सुचन देऊ. याचा कुठलाही परिणाम चिकनवर झालेला नाही, त्यामुळे अगदी निश्चिंतपणे मांसाहार करण्यास हरकत नाही. आणि समाज माध्यमांवर येण्यार्‍या अशा कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. याआधी ही प्लॅस्टिक अंड्यासंबधी अफवा पसरवली गेली होती. कुक्कुटपालन किंवा मांसाहार विरुद्ध असणारी मंडळी ही अफवा पसरवत असल्याचे, डॉ. अजित रानडे म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@