‘श्रीरामपूर एक्सप्रेस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020
Total Views |

zaheer khan_1  


‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर क्रिकेटपटू झहीर खानवर कौतुकवर्षाव होत आहे. इथवर पोहोचण्यासाठी झहीरने जिवापाड मेहनत केली असून त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख... 



झहीर इज अ ‘सचिन’ ऑफ अवर बॉलिंग.” २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काढलेले हे उद्गारच झहीर खानच्या क्रिकेटमधील योगदानाचे योग्य वर्णन करतात. क्रिकेटमधील त्याच्या योगदानाची दखल घेत, त्याला नुकताच ’पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘पद्म’ सन्मानासाठी क्रिकेटविश्वातून त्याची निवड करण्यात आल्यानंतर झहीर खानवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर अनेक वर्षांनंतर त्याची ‘पद्म’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सध्याच्या घडीला त्याच्यावर संपूर्ण क्रिकेटविश्वातून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी इथवर पोहोचण्यासाठी झहीरने आपल्या आयुष्यात जिवापाड मेहनत केली आहे.



झहीर खान हा भारतीय संघाचा डावखुरा जलदगती गोलंदाज म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. ७ ऑक्टोबर, १९७८ साली झहीर खानचा जन्म झाला. झहीर खान हा मूळचा महाराष्ट्रातीलच रहिवासी असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे त्याचे कुटुंब वास्तव्यास आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला झहीर एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होईल, याचा विचार त्याच्या कुटुंबीयांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र, लहानपणापासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणार्याक झहीरने अथक मेहनतीच्या जोरावर आपले लक्ष्य पूर्ण केले. झहीर खान याचे वडील बख्तियार खान फोटोग्राफीचा व्यवसाय करायचे. झहीरची आई झकिया खान या शाळेत शिक्षिका होत्या. झहीरला आणखी दोन भावंडे आहेत. मात्र, यापैकी झहीरला एकट्यालाच क्रिकेट खेळण्यात फार रस होता. लहानपणापासूनच क्रिकेट शौकीन असणार्याम झहीरचे अभ्यासाकडे लक्ष तसे कमीच. आई शिक्षिका असली तरी झहीरला अभ्यासात तितकी रुची नव्हती, जी क्रिकेट खेळण्यात होती. त्यामुळे लहानपणापासूनच क्रिकेटमध्येच करिअर घडविण्याचा निर्णय झहीरने घेतला.



झहीरनेही आपल्या मूळगावी श्रीरामपूरमधूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेटमध्ये करिअर घडवायचे म्हटले तर अनेक खेळाडू हे फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करण्यावर भर देतात. याचे कारणही तसेच आहे. कारण, क्रिकेटवेडा देश मानल्या जाणाऱ्या  भारतात बहुतांश खेळपट्ट्या या फलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. त्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी तयारी करणारे बहुतांश खेळाडू फलंदाज होण्यासाठीच प्रयत्न करतात. श्रीरामपूरचा झहीर खान मात्र याला अपवाद ठरला. झहीरने फलंदाजीपेक्षा तेज गोलंदाज होण्यावरच अधिक भर दिला. त्याचा हा निर्णय म्हणजे, प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा प्रयत्न होता आणि हेच झहीरचे वैशिष्ट्य असल्याचे अनेक प्रशिक्षक सांगतात. अनेक गोलंदाज नव्या चेंडूने स्विंग करून विकेट्स मिळवितात. मात्र, झहीरबाबत नेमके उलट आहे. झहीर नव्या चेंडूने तर विकेट्स मिळवतो. मात्र, जुन्या चेंडूनेही स्विंग करत विकेट्स घेण्याची क्षमता झहीरची आहे. त्यामुळेच धोनीने त्याला ’भारतीय गोलंदाजीचा सचिन’ म्हणून संबोधले होते. त्याच्या या गोलंदाजीच्या वैशिष्ट्यावरूनच त्याला ‘श्रीरामपूर एक्सप्रेस’ म्हणूनही ओळखले जाते.


अहमदनगर येथे होणाऱ्या ‘क्रॉम्प्टन’ क्रिकेट करंडक स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना काही गोलंदाज प्रशिक्षकांची नजर झहीरवर पडली. या प्रशिक्षकांनी झहीरमधील गोलंदाजीचे कौशल्य ओळखत त्याला रणजीचे सामने खेळण्यासाठी निमंत्रण दिले. येथूनच झहीरच्या घरगुती क्रिकेटला खर्याक अर्थाने सुरुवात झाली. बडोद्याच्या रणजी संघात मिळालेल्या संधीचे झहीरने सोने केले. २००० साली कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खेळणार्यास भारतीय क्रिकेट संघाला तेज आणि डावखुऱ्यास गोलंदाजाची गरज होती. अनेक प्रशिक्षकांनी यासाठी झहीरचे नाव सुचवले. तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी झहीरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तत्कालीन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉचा त्रिफळा उडवत झहीरने स्वतःला सिद्ध केले. येथूनच झहीर सर्वत्र प्रकाशझोतात आला. आपल्या उत्तम कामगिरीचा धडाका सुरूच ठेवल्यानंतर झहीर भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून उदयास आला.

झहीर हा ‘डावखुरा गोलंदाज’ म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो फलंदाजी उजव्या बाजूने करी. क्रिकेटविश्वात अनेकांना याचे नवल वाटे. आपल्या कारकिर्दीत अनेकदा उत्तम फलंदाजी करत झहीरने भारतीय संघाला संकटसमयी मोलाचे योगदान दिले आहे. ७७ कसोटी सामन्यांत २७१ बळी मिळविण्याचा विक्रम झहीर खानच्या नावावर आहे, तर २३० एकदिवसीय सामन्यांमध्ये २४७ बळी त्याने मिळविले असून अनेक सामन्यांमध्ये त्याला ’सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०११ साली झालेल्या विश्वचषक करंडक स्पर्धेत एकट्या झहीरने २१ बळी मिळविण्याचा विक्रम केला होता. इतर कोणत्याही संघाच्या खेळाडूंना हे शक्य झाले नव्हते. उशिरा का होईना, मात्र त्याच्या कार्याची दखल घेत झहीरला ‘पद्मश्री’ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. याबद्दल ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून त्याचे अभिनंदन!


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@