पाकिस्तानचे ‘मैं हूँ ना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020   
Total Views |

imran khan mahathir _1&nb



मलेशियाने इस्लामिक देशांच्या आयोजित केलेल्या बैठकीला इमरान खान यांनी गेल्या वर्षी दांडी मारली. पण, त्या दांडीची भरपाई म्हणूनच की काय, इमरान खान सध्या दोन दिवसीय मलेशिया दौऱ्या वर आहेत. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नीतीनुसार असे हे दोन इस्लामिक देश एकमेकांचे गोडवे गाण्यात धन्यता मानताना दिसतात.



पाकिस्तान आणि मलेशियाच्या दिवसेंदिवस घनिष्ट होणाऱ्या  संबंधांविषयी वेगळे सांगायला नकोच. त्याचाच पुढचा अध्याय म्हणजे मलेशियातील क्वालालंपूरचा इमरान खान यांचा दौरा. डिसेंबर अखेरच्या ‘उम्माचा सरकता ध्रुव’ या ‘जगाच्या पाठीवर’ मध्ये आधी म्हटल्याप्रमाणे, सौदी अरेबिया आणि मलेशियाच्या वर्चस्वाच्या लढाईत पाकिस्तानला सौदीसमोर मान तुकवावी लागली होती. मलेशियाने इस्लामिक देशांच्या आयोजित केलेल्या बैठकीला इमरान खान यांनी गेल्या वर्षी दांडी मारली. पण, त्या दांडीची भरपाई म्हणूनच की काय, इमरान खान सध्या दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यावर आहेत. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नीतीनुसार असे हे दोन इस्लामिक देश एकमेकांचे गोडवे गाण्यात धन्यता मानताना दिसतात. क्वालालंपूरमध्ये झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त बैठका आणि पत्रकार परिषदेमध्येही हीच बाब प्रामुख्याने निदर्शनास आली. तसेच इमरान खान यांनी मलेशियाकडून पाम तेलाच्या खरेदीचे आश्वासन महाथिर यांना दिले असून द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत करण्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.



मलेशियाने ‘कलम ३७०’च्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक व्यासपीठावरून भारतावर तोंडसुख घेतले. एवढेच नाही तर भारताच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वरूनही मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी नाराजी व्यक्त केली. मग काय, भारतानेही मलेशियाकडून आयात होणाऱ्या पाम तेलाच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात कपात करून मलेशियाला ‘जशास तसे’ उत्तर दिले. हा खरं तर मलेशियासाठी एक मोठा आर्थिक दणकाच होता. कारण, भारत हा मलेशियाकडून सर्वाधिक पाम तेलाची खरेदी करणारा देश. पण, महाथिर यांच्या भारतविरोधी भूमिकेने या तेल व्यापारावर पाणी फेरले. मग काय, मलेशियालाही त्यांचे पाम तेल कोणाच्या तरी गळ्यात मारायचे होतेच आणि त्यांनाही पाकिस्तानच्या रूपाने आयता बकरा सापडला. पण, मलेशियानेही हे ध्यानात घ्यावे की, गेल्या वर्षी भारताने मलेशियाकडून जवळपास ४ दशलक्ष टन पाम तेल खरेदी केले होते, तर पाकिस्तानने केवळ १.१ दशलक्ष टन.



त्यामुळे आता हाच प्रश्न उपस्थित होतो की, जो देश आर्थिक डबघाईच्या किनार्यासवर आहे, ज्या देशात महागाईने जनतेचे जिणे त्रस्त केले, जिथे साध्या पोळीच्या पिठासाठीही लोकांना मैलोन्मैल वणवण भटकावे लागते, त्या देशाला मलेशियाकडून आणखीन पाम तेल खरेदी करण्याचा निर्णय कितपत व्यवहार्य? ज्या प्रमाणात भारत मलेशियाकडून पाम तेल खरेदी करत होता, तेवढ्याच प्रमाणात पाम तेल पाकिस्तानसारखा तुलनेने छोटा आणि आर्थिकदृष्ट्या मरगळलेला देश खरेदी करू शकतो का? तर निश्चितच नाही. पण, ‘तुमचे पाम तेल भारताने नाही घेतले ना, मग आम्ही घेऊन तुमच्यावर उपकार करू,’ ही इमरान खान यांची या निर्णयामागील मोठेपणा मिरवणारी भूमिका असावी. या निर्णयाचा खरोखरीच पाकिस्तानला किती फायदा होईल, किती तोटा होईल, याची तसदी पाकिस्तानी पंतप्रधानांनी सवयीनुसार घेतली नसावीच. असो. याव्यतिरिक्त महाथिर यांनी पाकिस्तानमध्ये ऑटोमोटिव्ह प्लांट, इंजिनिअरिंग व्यवसायात गुंतवणूक करण्याचीही तयारी दर्शविली. ज्यामुळे इमरान खान हे आपल्या देशात परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून चार पैसे येतील म्हणून खुश झाले असले तरी महागाईने उच्चांक गाठला असताना पाकिस्तानात अशी कितीशी मोटारखरेदी वास्तवात होऊ शकते, हा संशोधनाचाच विषय आहे. पण, महाथिरांनी असेच अनेक उद्योगी ‘तीर’ सोडले आणि इमरान खान यांनी ते ‘फलदायी अस्त्र’ म्हणून आनंदाने झेललेही!



त्यामुळे इमरान खान यांचा मलेशिया दौरा हा केवळ एक ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा केविलवाणा प्रयत्नच म्हटला पाहिजे. त्यातच ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ अर्थात ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे’ यादीतून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठीही इमरान खान यांना मलेशियाच्या मदतीची गरज आहेच. केवळ आणि केवळ स्वार्थासाठी, इस्लामच्या नावावर हे दोन्ही देश एकमेकांना कुरवाळत आहेत. पण, झाकीर नाईकही आता जड झालेल्या मलेशियाला पाकिस्तानसारख्या वहाबी इस्लामच्या छत्रछायेत कूस बदलणारा पाकिस्तान किती दिवस जवळचा वाटतो ते पाहायचे; अन्यथा ही जवळीक सौदीच्या गादीला पुन्हा हादरा देणारी ठरली तर इमरान खान यांच्यासाठी एकीकडे आड, दुसरीकडे विहीर अशी बिकट परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@