तेरा वैभव अमर रहे माँ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020   
Total Views |

LGBT march_1  H


देशविघातक विचार असणार्‍या, देशाला तोडायची इच्छा बाळगणार्‍या शरजील इमामचे समर्थन करणारे नारे नुकतेच मुंबईत दिले गेले. ‘शरजील तेरे सपनों को हम मंजिल तक पहुचाऐंगे’, हे नारे दिले गेले ते ‘क्विर आझादी मोर्चा’च्या दरम्यान. मुंबईच्या आझाद मैदानात १ फेब्रुवारी रोजी हे नारे देशद्रोह्यांनी दिले. मुंबईमध्ये ही देशद्रोह्यांची पिलावळ पैदा कशी झाली? त्यांचा निषेध करावा तितका थोडा. देशाचे तुकडे पाडू इच्छिणार्‍यांना देशविघातक कृत्यासाठी सजा व्हावी हीच प्रत्येक भारतीयांची इच्छा.


२००८ सालापासून समलैंगिक पुरुष, समलैंगिक महिला, उभयलिंगी, तृतीयपंथी यांच्या हक्कासाठी हा ‘क्विर आझादी मोर्चा’ काढला जातो. पूर्वी दरवर्षी यामध्ये ३७७ कलमाविषयी चर्चा असायची, विरोधात्मक नारे असायचे. एकंदर समलैंगिक पुरुष, समलैंगिक महिला, उभयलिंगी, तृतीयपंथी यांच्या भावनेचा सन्मान समाजाने करावा, त्यांना माणूस म्हणून स्थान द्यावे, या समर्थनासाठी या मोर्चाचे आयोजन होते. आता ‘क्विर’ म्हणजे काय तर इतरांपेक्षा सर्वार्थाने वेगळे आणि खटकणारे असे काही. मात्र १९४० सालापासून जागतिक स्तरावर मान्य केले गेले की, ‘क्विर’ म्हणजे लैंगिकतेच्या बाबतीत सर्वमान्य समाजाच्या समजुतीपेक्षा वेगळे असे.



त्यामुळेच मुंबईमध्येही समलैंगिक पुरुष, समलैंगिक महिला, उभयलिंगी, तृतीयपंथी यांच्या हक्कासाठी ‘क्विर आझादी’ म्हटले गेले. ‘क्विर’ शब्दाचा इतिहास हा असा. पण, त्यात पुढे ‘आझादी’ शब्दही लावला गेला. कदाचित या वर्गाला अमानुषतेच्या संदर्भापासून ‘आझादी’ हवी असावी. पण, ’आझादी... आझादी’ बोंबलत भारताचे तुकडे पाडणार्‍यांनी या ‘आझादी’चा संदर्भ त्यांच्यापरीने देशद्रोही पद्धतीने घेतला असेल, यात काही शंका नाही. असो, तर मूळ मुद्दा असा की, १ फेब्रुवारी रोजी हा ‘क्विर आझादी मोर्चा’ काढण्यात आला. तो यापूर्वी नेहमी ऑगस्ट क्रांती मैदानात होत असे. पण, यावेळी हा मोर्चा आझाद मैदानामध्ये करावा, असे प्रशासनाने सुचविले. या मोर्चाच्या आयोजनामध्ये ‘हमसफर’ ट्रस्टचे नेहमी योगदान असते. यावेळचे आश्चर्य असे की, या मोर्चाचे आयोजन व्हावे यासाठी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केले होते. त्यासंदर्भाची बातमीही एका दैनिकाने छापली होती. यावर सुळेबाई काय म्हणतील, माहिती नाही. पण, यावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत.


हा मोर्चा होता समाजातील शोषित, वंचित आणि खरेच सर्वार्थाने पीडित तृतीयपंथी आणि इतर घटकांचा. पण, इथे ‘टिस’मध्ये (टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स) शिकणारी उर्वशी चुडावाला पोहोचली. तिने मोठ्या जोशात ’शरजील तेरे सपनोंको, रावण तेरे सपनो को मंजिल तक हम पहुचाऐंगे’ चे नारे दिले. खरे तर शरजील किंवा रावण हे दोघे कोणी समाजसुधारक आहेत का की तृतीयपंथी आणि तत्सम समाजगटांसाठी त्यांनी काही काम केले आहे? काही विचारजागृती केली आहे का? नाही. तर या दोघांचेही स्वप्न देशाचे तुकडे करण्याचे. ‘जेएनयु’ येथील कुख्यात ‘तुकडे तुकडे गँग’चे, जे ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’ चे स्वप्न आहे, तेच या शरजीलचे आणि रावणाचेही स्वप्न. तसे शरजील भर सभेत बोलला होता आणि बोलल्यानंतर भेकडासारखा लपूनही बसला होता. अर्थात तरुणाईच्या डोक्यात देश तोडण्याची ठिणगी टाकण्याचे काम त्याने केले होते. त्याचे काम संपले होते. त्यामुळे त्याने पोबारा केला, पण तो पकडला गेला. तर असा हा शरजील आणि तसाच तो रावण. रावणही म्हणे शरजीलचा धर्मबांधवच.


काहींचे म्हणणे आहे की, त्याचे खरे नाव ‘नसीमुद्दीन खान’ आहे. हिंदू देवधर्माविरोधात शिव्याशाप देऊन, समाजाच्या एका गटाला फितवण्यासाठी त्याने ‘रावण’ नाव धारण केले. याचाच अर्थ हिंदूंचे दैवत राम म्हणून इतर धर्मीयांनी त्यातल्या त्यात समाजातील मागास गटांनी श्रीरामाच्या विरोधात रावणाची प्रतिमा दीप्तीमान करावी, यासाठी या रावणाचा प्रयत्न आहे. थोडक्यात उर्वशी चुडावाला ही ‘टिस’ची विद्यार्थिनी. या दोघांचे देश तोडण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे नारे देत होती. ती एकटी नव्हती. तिने घोषणा दिल्यानंतर एका घोळक्यातून या नार्‍याचे समर्थन केले जात होते. हे आवाज काही तृतीयपंथीयांचे वाटत नव्हते. याचाच अर्थ गरीब नाडलेल्या तृतीयपंथीयांच्या आड या देश तोडू पाहणार्‍या नालायकांनी आपला ‘अजेंडा’ इथेही घुसडला होता. बरं ते नारे आणि त्याचे समर्थन तत्काळ केले असावेत, असेही दिसले नाही. तर, मोर्चाचे आयेाजन करणार्‍या कुणालाही विचारल्यावर ते सांगतील की मोर्चा किंवा कुठेही नारे दिल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ नारे देण्यासाठी तालीम करावी लागते. नाही तर नारे चुकतात. ‘क्विर आझादी मोर्चा’त दिलेल्या देशविघातक नार्‍यांचीही तालीम यापूर्वी झाली असणारच. या पार्श्वभूमीवर शरजीलचे ‘टिस’मध्ये येणेजाणे होते का, हे सुद्धा तपासायला हवे.


यावर एक सामान्य प्रश्न पडतो की, दिल्लीचे ‘जेएनयु’, ‘जामिया मिलीया’ किंवा मुंबईच्या ‘टिस’ येथूनच ‘आझादी’चे थोतांड पसरवणारे विद्यार्थी का निघतात? अर्थात सगळेच विद्यार्थी तसे नाहीत. पण, सर्वेक्षण करा. अगदी खुले आव्हानच समजा की, सर्वेक्षण करा आणि या दोन्ही शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी, समाज आणि देशाबद्दल नेमके काय विचार करतात याचा मागोवा घेतला तर चित्र चटकन समोर येईल. अर्थात, या शैक्षणिक संस्थांबद्दल नितांत आदर आहे. पण, शिक्षणाच्या व्यासपीठाचा वापर करून शिक्षणाऐवजी इतरच क्षेत्रात प्रगती करण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी का तयार होतात, याचेही उत्तर काय आह?विचाराअंती वाटते की, शैक्षणिक संस्थेतील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हेरणे, त्यांना गरिबी आणि जातीय संघर्षाची हिंसात्मक जाणीव करून देणे तर दुसर्‍या स्तरावर ‘आहेरे’ गटातील सुसंस्कृत विद्यार्थ्यांशी जवळीक साधणे. तरुण वय, ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वैराचार’ यातील रेषा धूसरच असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे की, तुमच्या धर्मात तुम्हाला बंधने आहेत. मुक्त व्हा. काय वाट्टेल ते करा. यासाठी विद्रोह करा. एका पातळीवर मुले यासाठी तयारही होतात. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही स्तरांवरच्या विद्यार्थ्यांना गळाला लावण्यासाठी विविध उपक्रम तयार आहेतच. तरुणाईच्या संवेदनशीलतेचा अक्षरशः क्रूरपणे वापर करत काही देशद्रोही लोक समाजसेवक विचारवंतांचा बुरखा घालून या विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती वावरत असतात. नेमके हेच लोक खलनायक आहेत. जे समाजातल्या होतकरू विद्यार्थ्यांची भावी नागरिकांची मानसिकता, सामाजिकता बिघडवतात.



तर विषय असा होता की, ‘क्विर आझादी मोर्चा’मध्ये देशविघातक नारे लगावले गेले. एका टोळक्याने या मोर्चाचा वापर केला. मोर्चातले लोक आले होते, ते आपले हक्क मागण्यासाठी. आपल्यालाही माणूस म्हणून जगू द्या हे सांगण्यासाठी. त्यांचे राहिले बाजूला आणि या घाणेरड्या विचारसरणीच्या लोकांनी देश तोडण्याचे नारे दिले. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍यांची ही औलाद. नव्हे यांच्या इतके हेच क्रूर आणि निर्दयी आहेत. आपण शोषित, वंचित, पीडितांच्या दुःख निवारणासाठी काम करतो, आपणच काय ते खरे पुरोगामी, मानवी हक्क कार्यकर्ते, संविधानवादी आणि हो निधर्मी आहोत, असा यांचा तोरा असतो. पण, ‘क्विर आझादी मोर्चा’मध्ये सहभागी झालेल्या दुःखितांचा आवाज दडपून आपला देशद्रोही आवाज उठवणार्‍या या लांडग्याचे खरे स्वरूप उघड झाले. हे जर खरेच मानवतावादी असते तर यांनी या पीडितांचा वापर केला नसता. या नालायकांनी नारे दिले. पण त्यामुळे वादंगात सापडला, तो नेहमी होणार ‘क्विर आझादी मोर्चा’. अर्थात या मोर्चाच्या आयोजकांनी स्पष्ट केले की, “देशविघातक नारे देणार्‍या लोकांशी आमचे देणेघेणे नाही. आम्ही त्यांना ओळखतही नाही. तसेच आमच्या व्यासपीठावरून देशविघातक नारे देणार्‍यांचा आम्ही कडक निषेध करतो.” आयोजकांनी मोर्चात सहभागी झालेल्या तमाम समलैंगिक पुरुष, समलैंगिक महिला, उभयलिंगी, तृतीयपंथीयांच्या वतीने जरी यांचा निषेध केला आहे, तरी उर्वशी चुडावाला आणि तिच्या सहकार्‍यांना लाज नसणारच.


कारण त्यांची तशी मानसिकताच घडवली गेली आहे. आपण काय बोलतो, याचा संदर्भही यांना कळतो का? मुंबईत राहून आसाम तोडायचा आहे, भारत तोडायचा आहे, समाज तोडायचा आहे. हे यांच्या मते मोठे छान स्वप्न, ध्येय आहे. वाईट वाटते ते, या प्रवृत्तीला बळी पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचे. त्यांच्या ध्यानीमनी असते का? की आपली उच्चशिक्षित मुले अशा धोकादायक वळणावर आहेत ते. यावरही शरजील इमामचे एक पोस्टर आठवते. त्यात तो म्हणतो, “३७० कलम, बाबरी मशीद आणि आता सीएए हे भारतीय मुस्लिमांनी प्रतिकार करावा यासाठी पुरेसे आहे. दिल्लीचे हजारो मुस्लीम युवक दिल्लीला अस्वस्थ, अस्थिर करायला तयार आहेत. त्यांच्यामुळे आपण काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवू शकतो. याचाच अर्थ तरुणाईच्या भावना भडकावून त्याला काश्मीरच भारतापासून तोडायचा आहे. हाच धागा पकडला तर त्याच्या म्हणण्याची पुष्टी करणारी घटनाही मुंबईत गेल्या महिन्यातच घडली होती. मुंबईच्या आझाद मैदानात महक मिर्झा प्रभू या महिलेने ‘सीएए’च्या विरोधातील मोर्चामध्ये ‘फ्री काश्मीरचे’ पोस्टर हातात घेतले होते. तिने नंतर सांगितले की, काश्मीरमधले इंटरनेट बंद केले, ती काश्मीर बंदी आहे. ती बंदी उठवावी म्हणून मी ‘फ्री काश्मीर’ पोस्टर उचलले.


यावर शिवसेनेच्या संजय राऊतांनीही तिचे समर्थन केले. पण, वास्तव काय होते? महक ही काही अल्पशिक्षित, समाजकारणापासून अनभिज्ञ व्यक्ती नव्हती. ती ब्लॉग लिहिते, कथाकथन करते, ‘सीएए’ आणि ३७० कलमाबद्दलचे तिचे व्हिडिओ होते. काश्मीरमधील काही अशाच लोकांशी तिची मैत्रीही होती. पण, तिने निर्लज्जपणे स्वत:च्या भूमिकेशी फारकत घेतली आणि सांगितले मला तसे काही म्हणायचे नव्हते. पण, तीने मुंबईसारख्या शहरात हातात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर घेतलेले जगाने पाहिले. तेच तर शरजील इमामचे म्हणणे आहे. अर्थात, वेड घेऊन पेडगावला जरी कुणी गेले तरी भारतीय जनता आता जागृत झाली आहे. त्यामुळे शरजील इमाम असो, महक मिर्जा प्रभू असो की उर्मिला चुडावाला असो, यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे खर्‍या भारतीयांना कळते. पण, सत्तेेसाठी वखवखलेल्यांना ते कळूनही वळत नसते. दुर्देवाने त्याचाच फायदा देशविघातक प्रवृत्ती घेतात. त्यामुळेच आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये देश तोडण्याचे नारे दिले जातात. याच्याइतके दुःखद आणि संतापजनक दुसरे काय असेल? पण, आजवरच्या अनुभवावरून वाटते की शरजील, मेहक आणि उर्मिला चुडावालासारखे आले किती आणि गेले किती, भारत एक होता आणि एक राहिल हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण, या भारत देशात आजही शरजील आणि रावणाच्या स्वप्नापेक्षा मातृभूमीसाठी जगणारे मरणारे करोडो आहेत. ज्यांचा ध्यास असतो. -

हम दिन चार रहे ना रहे

तेरा वैभव अमर रहे माँ


‘सीएए’ विरोधच्या मोर्चामध्ये जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकराची प्रतिमा आणि संविधानही हातात घेतलेले दिसले. कारण, विघातक वृत्तीच्या लोकांना माहिती आहे की, डॉ. बाबासाहेब हे शोषित, वंंचित आणि पीडितांचे खर्‍या अर्थाने ‘मुक्तिदाता’ आहेत. त्यांची प्रतिमा पाहून, संविधान पाहून समाजातला एक मोठा गट केवळ उपस्थिती तरी दर्शवेल. त्यामुळे मोर्चाला गर्दी होईल. यातूनच काही लोकांना भडकवून विद्वेष माजवता येईल. छे, ‘मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे’, असे म्हणणार्‍या आणि जगणार्‍या भारतीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे. त्याचा एक भारतीय नागरिक म्हणून निषेध झालाच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३७० कलमाविरोधात होते. ३७० कलमाबाबत ते अब्दुला शेख यांना म्हणाले होते की, “भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा करावा, तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७० ला विरोध आहे. तसेच, भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादित अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही.” तसेच, बाबासाहेब नेहमी म्हणत की, “पाकिस्तानातील दलित बांधवांचा विचार भारत सरकारने करावा.” अर्थात त्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही काँग्रेस सरकारने तो केला नाही. पण बाबासाहेबांचे स्वप्न केंद्रातल्या भाजप सरकारने केले. त्या स्वप्नपूर्तीला चूड लावण्याचे काम ‘सीएए’ विरोधक करत आहेत. या विरोधकांचा वापर शरजील आणि त्याच्यासारखे विचार करणारे देशद्रोही करत आहेत. याचा विचार व्हायला हवा.


-९५९४९६९६३८ 
@@AUTHORINFO_V1@@