‘कोरोना’ विषाणूचा जागतिक व्यवस्थेवरील हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2020   
Total Views |

corona _1  H x


चिनी नववर्षानिमित्त २३ जानेवारीपासून बंद असलेल्या शेअर बाजारांचे निर्देशांक या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ८ टक्क्यांहून अधिक कोसळले. अनेक देशांनी चीनला जाणाऱ्या विमानसेवा एक ते तीन महिन्यांसाठी खंडित केल्या असून रद्द झालेल्या विमानसेवांची संख्या १० हजार इतकी आहे. साहजिकच आहे की, विमान कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली असून औषधे आणि रुग्णालयांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली.



चीनमध्ये ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सर्व जगभर चिंतेचे वातावरण आहे. एक तर चीन ही जगाची मध्यवर्ती आर्थिक सत्ता बनली आहे. अर्थव्यवस्थेचा आकार आणि दरडोई उत्पन्न या बाबतीत चीन अमेरिकेच्या मागे असला तरी अनेक देशांसाठी तो सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि गुंतवणूकदार आहे. दुसरे म्हणजे, हा विषाणू संसर्गजन्य असून तो झपाट्याने पसरू शकतो. तिसरे म्हणजे, चीनमध्ये लोकशाही नसून माध्यमांवर तसेच समाजमाध्यमांवर सरकारचे नियंत्रण असल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे बाहेर येऊ न देण्याचा तो नेहमीच प्रयत्न करतो. असे म्हटले जात आहे की, आजवर १७ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊन बळींची संख्या ४२५च्या पुढे गेली आहे. कोरोनाचे चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहेत.




चिनी नववर्षानिमित्त २३ जानेवारीपासून बंद असलेल्या शेअर बाजारांचे निर्देशांक या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ८ टक्क्यांहून अधिक कोसळले. अनेक देशांनी चीनला जाणाऱ्या विमानसेवा एक ते तीन महिन्यांसाठी खंडित केल्या असून रद्द झालेल्या विमानसेवांची संख्या १० हजार इतकी आहे. साहजिकच आहे की, विमान कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली असून औषधे आणि रुग्णालयांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली. दोन डझनहून अधिक देशांनी चीनमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था केली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमध्ये काम करत असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलावले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे. आसियान तसेच सार्क गटातील अनेक देश चीनवर अवलंबून आहेत. पर्यटन क्षेत्राकडे बघितल्यास असे दिसून येते की, गेल्या वर्षी परदेशात जाणाऱ्यार चिनी प्रवाशांची संख्या १७ कोटींहून अधिक होती तर १४ कोटींहून अधिक परदेशी पर्यटकांनी चीनला भेट दिली होती.



हाँगकाँग, थायलंड आणि कंबोडियासारख्या देशांच्या अर्थव्यवस्था चिनी पर्यटकांवर अवलंबून आहेत. सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या श्रीमंत देशांना भेट देणार्या. चिनी पर्यटक आणि उद्योजकांची संख्याही लक्षणीय आहे. तीन महिने चिनी पर्यटक आले नाहीत, तर अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसू शकेल. एवढेच काय चीनमधील अंतर्गत पर्यटन आणि प्रवासावरही विपरित परिणाम झाला आहे. वुहान शहर ज्या हुबै प्रांतात येते, तिथे या विषाणूचा संसर्ग सर्वात जास्त आहे. त्यामुळे एकप्रकारे १० कोटी लोकसंख्या असलेले हे राज्यच सील करण्याचा प्रयत्न आहे. ‘जगाची फॅक्टरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचा चीन हा पुरवठादार असून, ही जी साखळी किंवा ‘इकोसिस्टिम’ आहे, ती जर काही काळासाठी खंडित झाली तरी त्याचे व्यापार आणि रोजगारावर प्रतिकूल परिणाम होणार आहेत. हुबै प्रांतात मजुरांच्या टंचाईमुळे रोजंदारीच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘पूर्वेचे लास वेगास’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मकाऊने आपल्याकडील कसिनो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणू हा चीनच्या व्यवस्थेपुढील आव्हान असल्याचे म्हटले आहे.




कोरोना विषाणूमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी चीन युद्धपातळीवर प्रयत्न करू लागला आहे. वुहान आणि अन्य शहरातील ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या विषाणूच्या प्रसाराकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यांना काढून टाकण्यात आले असून बाधित लोकांना वेगळे काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी रुग्णालये उभारण्यात येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टरांना आणले जात असून माध्यमे आणि समाजमाध्यमांची सफाई करून कोरोना विषाणूबद्दल वाईट बातम्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला आहे की, अमेरिका कोरोना विषाणू संदर्भात जाणीवपूर्वक अफवा पसरविण्याचे काम करत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने प्रवास आणि व्यापारबंदीची गरज नसल्याचे सुचवूनही अमेरिकेसारखे देश, ज्यांच्याकडे असे संसर्गजन्य आजार नियंत्रणात आणण्याची व्यवस्था चांगली आहे, टोकाची पावले उचलत आहेत. याबाबत देशांनी शांतपणे विचार करून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित भूमिका घ्यावी, असे आवाहन चीनने केले आहे. हा विषाणू वटवाघुळापासून आला की प्रयोगशाळेत तयार केला गेला होता, याबद्दलची चर्चा सुरू आहे. या सर्व अफवा आहेत, असे ग्राह्य धरले तरी भविष्यात जैविक युद्ध झाले तर एक विषाणू किती मोठा धुमाकूळ घालू शकतो, याची आपल्याला कल्पना येईल.




२५ हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असून त्यात तीन भारतीयांचाही समावेश आहे. तिघेही केरळचे असून वुहानमध्ये शिकण्यासाठी गेले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कंबर कसली आहे. भारताने या आठवड्याच्या सुरुवातीपासून चिनी नागरिकांना तसेच चीनमध्ये वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले असून पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या भारतात येण्यावर निर्बंध लादले आहेत. एअर इंडियाने दोन विशेष विमानांच्या साहाय्याने वुहानमध्ये अडकलेल्या ६५४ भारतीय तसेच ७ मालदीवच्या नागरिकांना सुखरूप परत आणले आहे. विशेष म्हणजे, चीनशी खास मैत्री असलेल्या पाकिस्तानचे विद्यार्थी आणि नागरिक मात्र चीनमध्येच अडकून पडले आहेत. विशेष विमानाने त्यांना परत आणायची पाकिस्तानची ऐपत नाही, तर आपल्या विशेष विमानाने त्यांना पाठवायला चीनला सवड नाही. या पाकिस्तानी लोकांनी व्हिडिओद्वारे पंतप्रधान इमरान खान यांना मदतीसाठी आवाहन केले असून भारताप्रमाणे आपल्याला परत नेण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.




गेल्या सहा वर्षांमध्ये केवळ चीनच नाही, तर सौदी अरेबिया, इराक, सीरिया, येमेन आणि युक्रेनसारख्या देशांतील यादवी युद्धात अडकलेल्या ८० हजारांहून अधिक नागरिकांना सुखरूप परत आणताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जी तत्परता दाखवली, तिचे जगभर कौतुक झाले. परदेशात फसवणूक झालेल्या स्त्रिया, विद्यार्थी, नोकरी-धंद्यानिमित्ताने परदेशात स्थायिक झालेले आणि त्या देशात राजकीय, आर्थिक, नैसर्गिक संकटात सापडलेले कामगार, एवढेच कशाला यादवी आणि युद्धग्रस्त देशांत अपहरण झालेल्या परिचारिका आणि धर्मप्रसारक, यातील कोणाबद्दलही भेदभाव न दाखवता, केवळ ते भारतीय आहेत, या एका कारणासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय धावून गेले. एवढेच काय, वेळोवेळी विविध देशांनी भारताला आपल्याही नागरिकांची सुटका करायची विनंती केली आणि भारताने तिला मान देऊन आपल्या या क्षमतेचा वापर त्या देशांशी असलेले संबंध मजबूत करण्यासाठी केला. ‘एअरलिफ्ट’ चित्रपट पाहिल्यास १९९०च्या दशकात अनिवासी भारतीयांबद्दल भारत सरकार आणि खासकरून परराष्ट्र मंत्रालय किती उदासीन होते, ते पाहून हळहळायला होते. भारतासाठीही कोरोना विषाणूचा प्रसार टाळणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराला तोंड द्यायला आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच आपत्ती निवारण क्षमता सज्ज ठेवणे आवश्यक आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@