पाणथळ जागा आणि जैवविविधता....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |
tiger_1  H x W:

दरवर्षी ’जागतिक पाणथळ दिवसा’निमित्ताने एक संकल्पना रुजवली जाते. या वर्षाची संकल्पना आहे ’पाणथळ जागा आणि जैवविविधता.’ या संकल्पनेची गरज का भासली असावी ?

 
रायगड (तुषार भोईर) - इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या किनार्यावर ’रामसर’ नावाचे एक शहर आहे. २ फेब्रुवारी, १९७१ साली या शहरामध्ये पाणथळ जागांचे संवर्धन आणि संरक्षणांसंदर्भात ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भात काही दूरगामी निर्णय घेण्यात आले. या परिषदेमध्ये एक आराखडा तयार करण्यात आला. त्या आराखड्यानुसार परिषदेमध्ये सहभागी झालेल्या देशांनी आपल्या देशातील जागतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पाणथळ जागांना ’रामसर’ स्थळाचा दर्जा देऊन त्यांचा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. भारताने या ठरावाच्या करारावर १९८२ साली स्वाक्षरी केली. या ठरावावर सद्यस्थितीत जवळपास १७० देशांनी स्वाक्षरी केली आहे. मानवी जीवनातील पाणथळ जागांचे महत्त्व लोकांना समजावे या हेतूने २ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक पाणथळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. रामसर परिषदेनुसार २,४१० जागांना ’रामसर दर्जा’ देण्यात आला आहे.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
दरवर्षी ’जागतिक पाणथळ दिवसा’निमित्ताने एक संकल्पना रुजवली जाते. या वर्षाची संकल्पना आहे ’पाणथळ जागा आणि जैवविविधता.’ या संकल्पनेची गरज का भासली असावी? यावर थोडासा सखोल विचार केला असता आपल्याला या संकल्पनेचे गांभीर्य लक्षात येईल. पाणथळ जागा या जैवविविधतेला बराचसा हातभार लावतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गेल्या काही दशकांपासून प्राणी आणि वनस्पतींच्या काही प्रजाती नामशेष होत आहेत. पाणथळ जागा या बर्याच पशुपक्षी, कीटक, सरीसृप प्रजातींच्या अधिवासाच्या जागा आहे. या परिसरावर काही प्राण्यांचे प्रजनन अवलंबून आहे. स्थलांतरित पक्षी हे केवळ पाणथळ जागांवर प्रजननासाठी येतात. परंतु, वेगाने वाढणारी लोकसंख्या ही महत्वाच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण बनत आहे. वाढत्या लोकसंख्येला जागा अपुरी पडत असल्याने या पाणथळ जागांवर देखील अतिक्रमण होत आहे. लेखातील छायाचित्रात बारकाईने पाहिले असता आपल्याला या व संकल्पनेचे महत्त्व लक्षात येईल. अर्थातच नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी पाणथळ जागा संरक्षित होणे गरजेचे आहे.
 
 
 
पाणथळ जागा या जमिनीवरील व सागरी परिसंस्था या दोन्हींचे वैशिष्ट्य दाखवतात. निसर्गाने आपल्याला भरभरून दान दिले आहे. त्याचे आपण योग्य संरक्षण केले नाही, तर आपणच आपल्या अस्तित्वावर घाव घातल्यासारखे होईल. निसर्गातील परिसंस्थांमध्ये संतुलन राखण्याचे काम या पाणथळ जागा करतात. तसेच पर्यावरणात समतोल राखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संकटापासून जगाला दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक व मानवनिर्मित पाणथळ जागांचे संरक्षण फार महत्त्वाचे आहे. सध्या मानव एक सत्य बाब विसरत चालला आहे. ते म्हणजे निसर्ग टिकला तरच मानव टिकेल. पाणथळ जागा या जमीन व पाणी इथे आढळणार्या दोन्ही परिसंस्थाना जिवंत राहण्यात हातभार लावतात. त्यामुळे जैवविविधता टिकून राहण्यात मदत होते. जैवविविधतेमुळे निसर्ग टिकून आहे आणि निसर्ग टिकून आहे म्हणून माणूस. पण या सर्व गोष्टींचा माणसाला कुठेतरी विसर पडत चालला आहे. म्हणून ’रामसर’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेला ’पाणथळ जागा आणि जैवविविधता’ अशी संकल्पना राबवण्याची गरज भासत आहे. त्यामुळे सरकारने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. २५ जानेवारीला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील ’नांदूरमधमेश्वर अभयारण्या’ला ’रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्रासाठी व आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या वर्षीच्या संकल्पनेचे महत्त्व लक्षात घेता सरकारने महाराष्ट्रातील अन्य पाणथळ जागांना ’रामसर’ यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
 
 
 
(लेखक वन्यजीव छायाचित्रकार आहेत)
@@AUTHORINFO_V1@@