शरजील समर्थनाच्या घोषणांनी सुप्रिया सुळे अडचणीत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |
sharjeel_1  H x




‘एलआरओ’ची तक्रार; मुख्य सचिवांकडून कारवाईचे आदेश

मुंबई : देशाचे तुकडे करण्याची विधाने करणार्‍या शरजील इमामचे समर्थन करण्यासाठी घोषणाबाजी केल्याच्या मुद्द्यावरून ‘एलजीबीटीक्यू’ची आझाद मैदानातील ‘प्राईड परेड’ सर्वत्र चर्चेत आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ला (एनआरसी) विरोध करताना येथे देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. मात्र, देशविरोधी घोषणा देणार्‍यांच्या या आंदोलनाला परवानगी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लीगल राईट ऑर्ब्झव्हेटरी’चे (एलआरओ) निमंत्रक विनय जोशी यांनी या आंदोलनाचे आयोजनकर्ते हरीश अय्यर आणि या आंदोलनाला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या तक्रारीची दखलही घेतली असून राज्याच्या गृहखात्याच्या साहाय्यक सचिवांना याबाबत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्य सचिवांच्या या आदेशांमुळे या आंदोलनाचे आयोजनकर्ते आणि या आंदोलनाला परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘एलजीबीटीक्यू’ची ‘प्राईड परेड’ आयोजित केली जाते. शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला विरोध करताना आंदोलनकर्त्यांनी देशाचे तुकडे करण्याचे विधान करणार्‍या आरोपी शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. याची चित्रफीतही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. हा संतप्त प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला होता.



‘लीगल राईट ऑर्ब्झव्हेटरी’चे प्रमुख विनय जोशी यांनी यासाठी पुढाकार घेत राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीत ते म्हणतात, “देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍या या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासोबतच ‘शरजील तेरे सपनोंको मंजिल तक पहुचाएंगे’ अशी नारेबाजी करणार्‍यांवरही ठोस कारवाई करण्यात यावी.”



‘एलजीबीटीक्यू’ची ही ‘प्राईड रॅली’ हरीश अय्यर यांनी आयोजित केली होती. तसेच या रॅलीला परवानगी मिळवून देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केले होते, यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केले असून याची लिंकदेखील त्यांनी तक्रारीत जोडली आहे. यानुसार या दोघांचही चौकशी करण्याची मागणी विनय जोशी यांनी केली आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या तक्रारीची दखलही घेतली असून राज्याच्या गृहखात्याचे साहाय्यक सचिव सुनील पोरवाल यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.





मुख्यमंत्र्यांनी देशविरोधी नारे सहन केल्यास जनता माफ करणार नाही : देवेंद्र फडणवीस

“शिवसेनेने एवढी वर्षे देशहिताचे राजकारण केले आहे. मात्र, आता मतांच्या राजकारणासाठी मुंबईतील आझाद मैदानात देण्यात आलेल्या देशविरोधी नारे मुख्यमंत्र्यांनी सहन केल्यास जनता त्यांना कदापि माफ करणार नाही,” असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सोमवारी दिल्ली येथे बोलताना दिला. मुंबईतील आझाद मैदानात ‘एलजीबीटीक्यू’ आंदोलनादरम्यान ‘शरजील तेरे सपनोंको को, हम मंझिल तक पहुचाएंगे’ असे नारे देण्यात आले होते. त्याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला. फडणवीस म्हणाले की, “लोकशाहीमध्ये विचारांमध्ये भिन्नता असू शकते. मात्र, देशविरोधी नार्‍यांचे मतांच्या राजकारणासाठी समर्थन करणे योग्य नाही. मुंबईत शरजील इमामचे समर्थन करणारे ‘शरजील तेरे सपनोंको को, हम मंझिल तक पहुचाएंगे’ असे नारे देण्यात आले. आसाम आणि ईशान्य भारतास तोडण्याचे मनसुबे असणार्‍या शरजील इमामच्या समर्थनार्थ असे देशविरोधी नारे देण्यात आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही, मतांच्या राजकारणासाठी ते नेहमीच अशा लोकांना पाठीशी घालत असतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत तरी देशहिताचे राजकारण केले आहे. त्यांनी या देशविरोधी नारे देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. अन्यता जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. कारवाई न केल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल,” असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@