संवेदनशीलता भाग-११

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |
yog_1  H x W: 0




संवदेनशीलतेचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात येते की, अनेक संशोधने होऊनही जगातील रोग कमी होत नाहीत, उलट ते वाढतच चालले आहेत. याचाच सरळ अर्थ असा की, रोग जगात आहेतच. परंतु, त्यांच्याशी लढण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती कमी पडत आहे. प्रतिकारशक्तीला योग्य प्रकारे वाढवण्यासाठी संवेदनशीलता असणे अत्यंत गरजेचे आहे. संवेदनशीलतेचे कार्य जर बाहेरुन विषम प्रकारची औषधे देऊन दाबून टाकले, तर मात्र प्रतिकारशक्तीवर थेट वाईट परिणाम होतो.



हल्ली आपण असे पाहातो की, कुठलाही छोटासा आजार जरी झाला तरी रुग्णावर औषधांचा भडिमार केला जातो व या औषधांमुळे मग रोगप्रतिकारकशक्तीला काम करण्यासाठी वावच दिला जात नाही आणि ही औषधे विषम प्रकारची असल्यामुळे आजार शरीरातून बाहेर न जाता शरीरात मुरतो. एका अवयवाकडून दुसर्‍या अवयवाकडे जातो. बहुतांशी तो कमी महत्त्वाच्या अवयव वा संस्थेकडे परावर्तित होतो, यालाच आपण ‘रोगदमन’ म्हणतो. उदा. थोड्या प्रमाणात सांधेदुखी किंवा गुडघेदुखी असल्यास त्यावर अनेक प्रकारची वेदनाशामक औषधे, तेल-मलमे वापरली जातात. या अशा औषधांच्या अतिवापरामुळे मग गुडघ्याच्या आजारात रुग्णाला तात्पुरते बरे वाटू लागते. परंतु, तो रोग शरीरातून जात नाही व तो रोग शरीरात अतिमहत्त्वाच्या अशा हृदयाकडे जातो व त्या माणसाला संधीवात दाबला जाऊन हृदयरोगाची लक्षणे दिसू लागतात. माणसाची नैसर्गिक संवेदनशीलता दाबून टाकल्यामुळे हे शारीरिक नुकसान होत असते.



प्रत्येक माणसाला अतिशय झटपट बरे व्हायचे असते. मानवी स्वभावाच्या याच उतावळेपणाच्या खास गुणामुळेच औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे फावते व दररोज बाजारात ‘फास्ट काम करून आराम देणारी औषधे’ या नावाखाली अत्यंत घातक अशी औषधे लोकांच्या माथी मारली जातात व ‘सोकॉल्ड एज्युकेटेड्’ माणूस म्हणजेच तथाकथित शिकलेला माणूस हे सर्व आनंदाने मान्य करत असतो. म्हणूनच माणूस रोगमुक्त तर होत नाहीच, उलट नवनवीन रोगांना आमंत्रण देत असतो.



अनेक प्रयोगाअंती आता हे सिद्ध झाले आहे की, शरीरावर होणार्‍या आजाराच्या मागे काहीतरी ठोस मानसिक, भावनिक कारणही असू शकते. मनात दाबून टाकलेल्या भावना या बहुतांश आजाराचे मूळ असतात. दोन तृतीयांश आजार हे याच कारणांमुळे होत असतात. परंतु, बरेचदा इतर वैद्यकीयशास्त्रात या गोष्टीचा विचारही केला जात नाही व फक्त रुग्णाच्या शरीराला त्याच्या पेशींना औषध दिले जाते व आजार होण्याचे मुख्य कारण जे मानसशास्त्रात दडलेले असते, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वरकरणी औषधांमुळे रोगाचे दमन होते व संवेदनशीलता अतिशय खालावते.



सततच्या विषम औषधांमुळे संवेदनशीलतेची लयच बिघडून जाते. हीच बिघडलेली लय माणसाच्या मोठ्या आजाराला कारणीभूत ठरते. प्रत्येक जण हल्ली असे म्हणताना दिसतो की, पूर्वी कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, मेंदूचे विकार, हृदयरोग, मधुमेह व इतर मोठे विकार सहसा ऐकू येत नसत. परंतु, हल्ली हे आजार सर्रास ऐकू येतात. लोकांना माझे हेच सांगणे आहे की, यावर विचार करा की हे रोग शरीरात का येत आहेत?



- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@