‘शुभ्र’धुलाई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020
Total Views |
india_1  H x W:





न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या मालिकेत ‘५-०’ असे निर्भेळ यश मिळविल्यानंतर भारतीय संघावर सध्या कौतुकवर्षाव होत आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच मालिका जिंकत इतिहासाला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक करावे तितके कमीच. आगामी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाचा हा मालिका विजय फार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आगामी ‘टी-२०’ विश्वचषक हा ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर खेळविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या खेळपट्ट्या जलद आणि उसळत्या चेंडूंसाठी पोषक मानल्या जातात. त्यामुळे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना येथे अधिक वाव असतो. ही मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे निभाव लागेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत ही मालिका आपल्या खिशात टाकली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने जे यश मिळवले, ते माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सौरभ गांगुली यांनाही जमले नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करत इतिहास रचला होता. एकदिवसीय मालिकेतही टीम इंडियाने उत्तम प्रदर्शन केले होते. मात्र, ‘टी-२०’ सामन्यात भारताला ते शक्य झाले नव्हते. त्यावेळी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. इतकेच नव्हे, तर २००७ साली भारताने पहिला ‘टी-२०’ विश्वचषक जिंकला तरी भारताला त्या स्पर्धेत न्यूझीलंडला काही पराभूत करता आले नव्हते. न्यूझीलंडविरूद्ध ११ पैकी भारताला केवळ एकाच ‘टी-२०’ सामन्यात विजय मिळवता आला होता. भारताने आता सलग पाच ‘टी-२०’ सामने जिंकल्याने आता हा आकडा सहावर जाऊन पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण ‘टी-२०’चे १६ सामने खेळविण्यात आले असून यात न्यूझीलंडचेच पारडे अद्यापही जड आहे. न्यूझीलंडने एकूण आठ सामने जिंकले असून भारताला अद्याप केवळ सहाच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारताला न्यूझीलंडविरूद्ध पुन्हा एकदा दमदार कामगिरी करावी लागणार आहे.


‘टेनिस’सम्राट

रॉजर फेडरर हा टेनिस विश्वातील सम्राट म्हणून ओळखला जातो. स्वित्झर्लंडच्या या ३९ वर्षीय खेळाडूने टेनिस विश्वातील विविध विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टेनिस विश्वात नवी क्रांती घडविणारा खेळाडू म्हणून नावलौकिक असणारा फेडरर सध्या तंदुरुस्तीसाठी संघर्ष करत असताना टेनिस कोर्टवर दिसून येतो. वयाच्या ३९व्या वर्षीसुद्धा फेडरर अखेरच्या क्षणापर्यंत सामना जिंकण्यासाठी झुंज देतानाचे पाहायला मिळते. एकेकाळी ‘टेनिसचा बादशाह’ म्हणून ओळखला जाणाऱ्या या खेळाडूला सध्याच्या घडीला नवख्या खेळाडूंनाही नमवणे कधी कधी कठीण होऊन बसते. पराभवानंतर अनेक माजी टेनिसपटू त्याला निवृत्तीचा सल्ला देतात. मात्र, शांत, संयमी आणि कर्तृत्ववान खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडररने या विषयावरून कधीही वाद ओढवून घेतलेला नाही. अगदी विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतरही फेडररने खचून न जाता जे उत्तर दिले, ते खरोखरच प्रशंसनीय आहे. “टेनिस खेळण्याची माझी भूक अजूनही संपलेली नाही,” असे म्हणत त्याने अनेक टीकाकरांचे तोंड बंद केले. “आपण केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर आजही केवळ आवड असल्यामुळेच टेनिस खेळत आहोत,” असे त्याने स्पष्ट केले. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतही उपांत्य फेरीत फेडररला सर्बियाच्या नोवाक जोकोविचविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. फेडरर आणि जोकोविच यांच्यामधील लढत रंगतदार होईल, अशी आशा होती. मात्र, जोकोविचने फेडररला तीन सरळ सेट्समध्ये पराभूत केले. जोकोविचपुढे फेडररचा खेळ निष्प्रभ ठरला. लढत अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाली नाहीच. या पराभवानंतर अनेकांनी पुन्हा एकदा फेडररला निवृत्तीचा सल्ला दिला. मात्र, पुढील स्पर्धेसाठी आणखीन जोमाने तयारी करत असल्याचे सांगत फेडररने टीकाकरांना प्रत्युत्तर दिले. फेडरर आणि जोकोविच यांच्यात आत्तापर्यंत ५० सामने झाले असून सर्वाधिक २७ वेळा जोकोविचने विजयी होण्याचा मान मिळवला आहे. फेडरर २३ वेळा विजयी झाला आहे. शारीरिक तंदुरुस्ती पाहता, फेडररचे ‘कमबॅक’ करणे अवघड मानले जाते. मात्र, मुळातच टेनिसवर जिवापाड प्रेम करणारा हा खेळाडू सहजासहजी माघार घेण्याची शक्यता कमीच आहे. चाळीशी ओलांडल्यानंतरच तो निवृत्ती स्वीकारेल अशी आशा आहे. त्यामुळे निवृत्तीच्या अखेरपर्यंत खेळावर प्रेम करणाऱ्या या खेळाडूचे कौतुक करावे तितके कमीच...!


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@