चौकटींचे आकाश भेदणार्‍या लता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020   
Total Views |
lata sankhe_1  




आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगांना कष्टाने आणि श्रद्धेने मात करत आज लता संखे एमएससीबीच्या महानिर्मिती कंपनीच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला मागोवा...


सर्व चौकटींना आपल्या कर्तृत्वाच्या परिसस्पर्शाने प्रेरणास्रोत बनवणार्‍या लता अविनाश संखे. आज त्या वीज वितरण कंपनीच्या महानिर्मिती कंपनीच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील महानिर्मिती कंपनीच्या मागासवर्गीय कामगारांचे आरक्षण अनुशेष तपासणे, भरणे, तसेच या कंपनीतील राज्यस्तरीय गोपनीय अहवाल तयार करणे, केंद्र सरकारच्या परिपत्रकाची राज्यातील या कंपनीमध्ये अंमलबजावणी करणे, राज्यस्तरीय माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणे, अशा एकापेक्षा एक जबाबदार्‍या लता मोठ्या हिंमतीने आणि यशस्वीपणे सांभाळत आहेत. कायदेशीर तपासणी, न्यायिक अंमलबजावणी करत लता यांनी १०८ सफाई कामगारांच्या संबंधितांना अनुकंपा तत्त्वावरच्या नोकर्‍या मिळवून दिल्या. अर्थात, तो त्यांच्या कामाचा भाग जरी असला तरी ‘अनुशेष भरणे’ ही काही सोपी गोष्ट नाही.


लता या कोळगाव, पालघरच्या नारायण भास्कर पाटील आणि यमुनाबाई पाटील, यांच्या चार अपत्यांपैकी एक. पाटील यांचे संयुक्त कुटुंब! आजी-आजोबा, काका वगैरे मोजून घरात ३१ जण. १ एकर शेती, त्यातून येणारे उत्पन्न ते किती म्हणा? त्यांचे वडील दापचेरी,डहाणूच्या दूध डेअरीत सुरक्षारक्षकाचे काम करायचे, तर आईचा पूर्ण दिवस म्हणजे कष्टाची परिसीमा. ३१ जणांच्या कुटुंबाचे सर्व काम आवरून त्या शेतीकामाला जायच्या. या वातावरणात वाढलेल्या लता. आई एकच म्हणायची, “बाय, कुणालाही उगीच उलटून बोलयचे नाही. सगळ्यांशी चांगले वागायचे.”


पुढे शिक्षणासाठी त्या वाडा येथे काकांकडे आल्या. त्यांचे काका शिक्षक होते. ते एका कुंभार कुटुंबाच्या घरी राहायचे. पण, दोन-चार महिन्यांत त्यांची बदली झाली.पण, शिक्षणासाठी लता तिथेच राहिल्या. त्यावेळी त्यांचा दिनक्रम वेगळाच होता. कुंभार कुटुंबातली मुले पहाटे ४ वाजता उठून घोड्याच्या लीदचा शोध घेत दूर रानोमाळी जायची. लताही त्यांच्याबरोबर जायच्या. घोड्याची लीद शोधून भरून घेऊन यायच्या. त्यानंतर अंघोळ, नाष्ट्याला मिलोची पेज. तेथून पुढे शाळा. दुपारी आले की मिलोची भाकरी आणि खरडा. त्यानंतर मग घोड्याची लीद मातीमध्ये मळण्याचा कार्यक्रम सुरू होई. कारण, या मातीतूनच मडके घडे. लताही हे काम मनापासून करायच्या. कारण, त्या शिक्षणासाठी घरात राहत होत्या. कुंभार कुटुंब पोटच्या पोरांसारखे लतावर प्रेम करे. पुढे दोन वर्षांनी त्या समाज कल्याण खात्याच्या वरळी, मुंबई येथील वसतिगृहात राहून शिकू लागल्या. लोकांना कोडे पडे की, आपल्या वंजारा समाजातील मुलगी बाहेर मुंबईला शिकून काय करणार? पण, पाटील कुटुंब आपल्या विचारांवर ठाम राहिले. लता यांनीही आईवडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. वरळी ते दादरच्या शाळेत येण्यासाठी त्यांना संस्थेकडून प्रवासभत्ता मिळे. पण, कष्टाची सवय असलेल्या लता यांनी तो प्रवासभत्ता बसच्या प्रवासासाठी वापरला नाही. प्रवासाच्या पैशांची बचत करुन त्या पैशांतून त्यांनी टायपिंगचा कोर्स केला. वसतिगृहाच्या बाजूच्या बीडीडी चाळीत लहान मुलांची त्या शिकवणी घ्यायच्या. सुट्टीत घरी जायच्या, तेव्हा त्याच पैशांतून बहिणींना कपडे, कधी कानातले, कधी टिकल्या घेऊन जायच्या. वसतिगृहातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.


त्यांना डॉक्टर व्हायचे होते. पण, परिस्थितीअभावी ते शक्य झाले नाही. मात्र, त्यांचे लग्न झाले ते डॉक्टर अविनाश संखे यांच्याशी! ज्यावेळी लग्न झाले, त्यावेळी लता केवळ १९ वर्षांच्या होत्या आणि सोमय्या महाविद्यालयात नुकत्याच ‘क्लार्क’ म्हणून रूजू झाल्या होत्या. अविनाश हे एमबीबीएस करत होते, इथेही मोठ्या घराचे सर्व व्यवहार सांभाळत त्या नोकरी करू लागल्या. घरातल्यांचे सांगणे की, नोकरी करायची असेल तर कर, पण घराकडे दुर्लक्ष करू नको. पुढे लता एमएससीबीमध्ये नोकरी करू लागल्या. अशातच त्यांची तब्येत बिघडली. मुंबईतल्या नामांकित डॉक्टरांनी उपाय केले. मात्र, त्यांचा निष्कर्ष होता की, लता कधीही आई होऊ शकणार नाहीत. या काळात अविनाश आणि लता यांनी एकमेकांना खूप समजून घेतले. दोघांचीही साईबाबांवर अपार श्रद्धा. या दोघांचीही श्रद्धा आणि निसर्गाची शक्ती म्हणा, लताला मातृत्वाची चाहूल लागली. त्यांना मुलेही झाली. दिवस सरत होते. पुढे लता यांना कष्टाच्या बळावर कार्यालयात बढतीही मिळत गेली.


मात्र, एक विपरीत घटना घडली. डॉ. अविनाश यांना एका व्यक्तीने खोट्या आरोपात गुंतवले. पाच वर्षे न्यायालयात खटला चालला. पाच वर्षांनंतर डॉ. अविनाश यांच्या बाजूने निकाल लागला. त्याकाळात लता यांनी समर्थपणे सगळी परिस्थिती सांभाळली. मध्यंतरी दोन वर्षांसाठी त्यांची नाशिकला बदली झाली. या काळात लता सकाळी ४ वाजता उठायच्या. ‘गीतांजली एक्सप्रेस’ने नाशिकला जायच्या. सायंकाळी पुन्हा मुंबईला परत. का? तर डॉ. अविनाश यांच्या तब्येतीमुळे त्यांना घरचे जेवणच बंधनकारक होते. पुढे पुन्हा त्यांची मुंबईला बदली झाली. पण, या काळातही त्यांच्या कामावर कोणताही फरक पडला नाही. उलट त्या दोन वर्षांमध्ये ‘एकलहरे’ प्रकल्पातील अनुशेष कधी नव्हे ते भरले गेले. निवृत्तीनंतर त्या कोळगाव, पालघर येथे व्यसनमुक्ती केंद्र उभारणार असून त्याची तयारी सध्या सुरू आहे. काम करता करताच लता यांनी वकिलीचे शिक्षणही पूर्ण केले. ‘डीएमएलटी’ (पॅथोलॉजी), ‘डिग्री इन नॅचरोपथी इन योगा’ याचेही प्रशिक्षण पूर्ण केले. एमबीएचेही शिक्षण घेतले. सध्या एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना त्या सर्वतोपरी मदतही करत आहेत. ही प्रेरणा त्यांना कुठून येते विचारल्यावर त्या म्हणतात, “कष्ट हीच प्रेरणा आहे. त्यातून समाधान मिळते.”
@@AUTHORINFO_V1@@