पुन्हा एकदा भारत-पाक महायुद्ध? ; दुबईत होणार आशियाई चषक...

    29-Feb-2020
Total Views |

IND Pak_1  H x
 
 
नवी दिल्ली : आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत अखेर तोडगा निघाला आहे. पाकिस्तानकडेच याचे यजमानपद राहणार असून स्पर्धा पाकिस्तान ऐवजी दुबईत खेळवली जाणार आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना जगाला पाहायला मिळणार आहे.
 
 
आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत यंदाच्या आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडे देण्यात आलेले होते. पण, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. यामुळे या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर तोडगा काढत यजमानपद पाकिस्तानकडे राहणार असून स्पर्धा पाकिस्तान ऐवजी दुबईत खेळवली जाणार आहे. आयसीसीच्या बैठकीला रवाना होण्याआधी गांगुली यांनी याविषयी माहिती दिली.
 
 
सौरव गांगुलीने सांगितले की, "यंदाचा आशिया चषक दुबईत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ खेळणार आहेत. ' भारताच्या विरोधानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क सोडण्यास नकार दिला होता. यामुळे या स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, दुबईमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक ३ मार्चला होणार आहे. या बैठकीनंतर आशिया चषकाबाबत घोषणा करण्यात येणार आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून क्रिकेट खेळला जात नव्हता. पण, भारत-पाक यांच्यात मालिका खेळवण्यात याव्यात, अशी मागणी पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी केली आहे.