‘व्हिएत-चाम’ उर्फ ‘व्हिएतनाम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Feb-2020
Total Views |


meet_1  H x W:



आतापर्यंत आपण आग्नेय आशियातील तीन देश पाहिले. भारताचा भरत इंडोनेशिया, इस्लामी-ज्वरग्रस्त मलेशिया आणि सदा स्व-तंत्र थायलंड. आज आपण आजच्या काळातील भारताचा घनिष्ठ मित्र व्हिएतनामची चिकित्सा करूया.



व्हिएतनामचा एक मोठा हिस्सा
(उत्तर ते मध्य) हा जवळपास एक हजार वर्षे (इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत) एक चिनी वसाहतच होता. दक्षिणेचा भाग हा ‘फुनान’ (किंवा ‘फु-नाम’) या विशाल हिंदू साम्राज्याचा भाग होता. त्यानंतरच्या काळात उत्तरेकडील व्हिएतवंशीय लोकांनी चिनी जोखडातून सुटका करून घेत स्वत:ची स्वतंत्र राजवट सुरू केली. दक्षिणेला (आणि सध्याच्या इतर शेजारी देशांच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या) ‘फुनान’ची फूट होऊन ज्या वेगवेगळ्या राजवटी अस्तित्वात आल्या त्यांच्यापैकी ‘चंपा’ (Chamapa) या चामवंशीय हिंदू राजवटीने पुढची ८००-९०० वर्षे सध्याच्या व्हिएतनामच्या ५० टक्के (मध्य-दक्षिण) भूभागावर सलग राज्य केले. पुढे युरोपीय वसाहतवाद्यांनी त्यांच्या सोयीसाठी व्हिएतनामच्या नकाशाची तीन भागात आखणी केली - टोनकिन (चीनला खेटलेला उत्तर भाग), अन्नाम (मध्य भाग) आणि क्यी-नाम (दक्षिण भाग). यांपैकी दोन तृतीयांश अन्नाम आणि बराचसा क्यी-नाम या चंपा राज्याचा भाग होते. त्या राज्याचे उत्तरेकडचे महत्त्वाचे शहर ‘इंद्रपूर’ (सध्याचे Da Nang) आणि दक्षिणेचे ‘पांडुरंग’ (सध्याचे Phan Rang) होते.



याच वसाहतवाद्यांनी स्वत
:च्या आकलनासाठी लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देश-त्रिकुटाला ‘इंडो-चायना’ हे नाव बहाल केले. त्यांना या भूप्रदेशात हिंदू आणि चिनी संस्कृतींचा जवळपास समान (आणि स्पर्धात्मक) प्रभाव जाणवला ही त्यापाठची कारणमीमांसा. उर्वरित आग्नेय आशिया हा त्या काळी नि:संशय हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता, हे त्यातून ध्वनित होते. वर म्हटल्याप्रमाणे व्हिएतवंशीयांनी जरी स्वतंत्र बाण्याला अनुसरून वेगळे राज्य स्थापले तरी अनेक शतके ते चिनी साम्राज्याचे मांडलिक होते आणि अनुषंगाने त्या संस्कृतीचे वाहक होते, जिचे प्रतिबिंब त्यांच्या राज्यकारभारात आपसूक पडत होते. त्यामुळेच जेव्हा आधुनिक चीनने साम्यवादी राज्यप्रणाली स्वीकारली, तेव्हा त्याच्या प्रभावाखालील उत्तर व्हिएतनामनेसुद्धा साम्यवादी सत्ता राबवली. हा काही योगायोगाचा भाग नव्हता. दक्षिणेच्या चामवंशीयांची प्रकृती भिन्न होती. तसेच या दोन्ही वांशिक राजसत्तांना एक हजारांहून अधिक वर्षे एकमेकांशी चालू असलेल्या भीषण सत्तासंघर्षाचा पूर्वेतिहास होता. तोपर्यंत ‘व्हिएतनाम’ या नावाचा देशच अस्तित्वात आला नसल्यामुळे उत्तरेने चिनी आणि रशियन रसद पाठीशी घेऊन दक्षिण दिग्विजयाच्या आकांक्षापूर्तीसाठी रेटत राहणे आणि सदर साम्यवादी साम्राज्य-स्वप्नांना सुरुंग लावण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकेच्या मदतीने दक्षिणेने झटत राहणे हा खेळ जागतिक राजकारणाच्या पटलावर प्रदीर्घ काळ (१९५५ ते १९७५) रंगला होता. पुढे साम्यवादी शक्तींची सरशी होऊन या खेळाची सांगता व्हिएतनाम देशाचा जन्म, व्हिएतवंशीयांची त्यावर निरंकुश सत्ता, चामवंशीयांचा प्रचंड संहार, त्यांचे शेजारी देशांत घाऊक स्थलांतर इ. पद्धतीने झाली.



उपरोल्लेखित पार्श्वभूमी लाभूनही आधुनिक व्हिएतनामने त्यापुढील मार्गक्रमण चिनी इशार्‍यानुसार करणे नाकारले
. आधुनिक संदर्भात, जागतिक नकाशावरच्या स्व-स्थानाचे तसेच प्रदीर्घ चिनी पूर्वानुभावाचे भान आल्यामुळे म्हणा, त्याने चिनी जोखडाखाली मान परत येऊ दिली नाही. त्याच्या या पवित्र्यामुळे चीन साहजिकच संतापला आणि तेव्हापासून त्याला वेगवेगळे धडे शिकवण्याच्या मागे लागला. आज व्हिएतनाममध्ये चीनप्रमाणेच एकपक्षीय साम्यवादी (अर्थात हुकूमशाही) राजवट आहे. हे एकमात्र साम्यस्थळ सोडल्यास आता या दोन सख्ख्या शेजार्यांमध्ये कोणताच समान धागा शिल्लक नाही. सदर परिस्थिती आणि आज आशिया खंडात विस्तारवादी चीनच्या डोळ्यास डोळा भिडवण्याची शक्ती राखून असलेला भारत ही सद्यस्थिती या दोहोंचा मिलाफ म्हणजे भारत आणि व्हिएतनाममधील वाढते सौहार्द आणि पूरक सहकार्य. इथे आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे चीन आणि रशिया वगळता ‘सर्वव्यापी व्यूहात्मक भागीदारी’ (Comprehensive Strategic Partnership)चा करार व्हिएतनामने फक्त भारताबरोबर केला आहे. त्यापैकी चीन आणि रशियाबाबतची पार्श्वभूमी आपण मगाशीच पाहिली आहे. म्हणूनच भारताबरोबरचा सदर करार हा विशेष ठरतो.



जागतिक नकाशावर जसे भारताचे स्थान भू
-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच किंबहुना त्याहून किंचित अधिक महत्त्वाचे स्थान आग्नेय आशियात व्हिएतनामचे आहे. ज्याला ‘भू-बहुल आग्नेय आशिया’ (Mainland South East Asia) म्हटले जाते, त्या प्रदेशाच्या चीनला भिडलेल्या सीमेपैकी एक तृतीयांश हिस्सा तर त्याच भागाच्या सागरी सीमेचा (चीनच्या सागरी सीमेला भिडलेला, सलग तब्बल ३२६० किमी लांबीचा) १०० टक्के हिस्सा व्हिएतनामचा आहे. आज दक्षिण चिनी समुद्रात (South China Sea) चीनची जी दादागिरी चालली आहे आणि त्यामार्गे हिंद महासागरात अतिक्रमण करण्याचे त्याचे जे प्रयत्न चालले आहेत, ते पाहता व्हिएतनामसारखा मित्र सदर संवेदनशील क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी असणे हे भारताच्या दृष्टीने किती उपयुक्त असू शकते हे वेगळे सांगण्याची गरज पडू नये.



आतापर्यंतचे विवेचन पाहता काहींचा असा समज होऊ शकतो की त्यात काय एवढे
, चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी बिनसल्यानंतर कोणीही घाबरून धावाधाव करणार आणि सबळ मित्र शोधणारच! असा समज करून घेण्यामागे व्हिएतनामच्या लढाई करण्याच्या (अ)क्षमतेबाबत गृहितक असू शकते. तसे असल्यास सदर (गैर)समज दूर करायलाच हवा. ऐतिहासिकदृष्ट्या व्हिएतनाम हा संपूर्ण आग्नेय आशियात लढाऊ बाण्यात अग्रेसर असलेला देश आहे. पिढ्यान्पिढ्या चाललेल्या अंतर्गत (उत्तर-दक्षिण) युद्धाचा भाग वगळूनसुद्धा हा देश इंडो-चायना भूप्रदेशाचा निर्विवाद ‘दादा’ आहे. उर्वरित आग्नेय आशियातील देशसुद्धा त्याला ‘टरकून’ असतात. म्हणून तर, तो अजिबात उत्सुक नसताना, इतरांनी तो आपल्यात हवाच या उद्देशाने त्याच्या अनेक मिनतवार्‍या करून त्याला अखेरीस (१९९५ साली) ‘आसियान’मध्ये (ASEAN) सामील करून घेतला. हलाखीच्या परिस्थितीत, असंख्य हालअपेष्टा भोगून अमेरिकेसारख्या महासत्तेशी प्रदीर्घ काळ (दुसरे इंडो-चायना युद्ध) झुंजणारा आणि अखेरीस तिला बिनशर्त माघारीची नामुष्की स्वीकारायला लावणारा हा महान योद्धा देश आहे.



या तरी आधुनिक इतिहासातील सर्वपरिचित गोष्टी झाल्या
. अधिक माहिती करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या वसाहतपूर्व भूतकाळात डोकावावे लागेल. व्हिएतनामसह इंडो-चायना ही स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंचांची वसाहत होती. त्याची सुरुवात होण्यास १७व्या शतकाचा मध्य उजाडावा लागला. कारण, तत्पूर्वी २०० वर्षांच्या काळात व्हिएतनामने इतर तीन वसाहतवाद्यांचे तत्सम मनसुबे, अनुक्रमे पोर्तुगीज (सन १५३३), डच (सन १६०१) आणि इंग्रज (सन १६१३), त्यांना चोप देऊन उधळून लावले होते. त्यावरून धडा घेऊन नंतर आलेल्या फ्रेंचांनी एक नवीनच दुधारी (व्यापारी आणि ख्रिस्ती मिशनरी) हत्यार उपसले. व्यापाराच्या निमित्ताने ठिकठिकाणी मिशनर्‍यांचा सुळसुळाट करून धर्मांतराचा सपाटा लावला. धर्मांतरित जनता साहजिकच काही प्रमाणात फ्रेंचधार्जिणी बनली. अशा प्रकारे पकड बसल्यानंतर मग फ्रेंचांनी सैन्य उतरवून देशाचा ताबा १९व्या शतकाच्या मध्यावर घेतला. त्यानंतरही व्हिएतनामी लोकांनी एकजूट करून फ्रेंचांवर निकराचा हल्ला चढवला आणि त्यांच्यासोबत एकूण धर्मांतरित लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना येशूकडे धाडले. त्यानंतरचा इतिहास आपण वर पाहिला आहेच. थोडक्यात, उच्च दर्जाचे क्षत्रियत्व वागवणारा हा देश असून त्याच्या लढाऊ क्षमतेबद्दल शंका नसावी. मात्र, सतत संघर्षरत राहिल्यामुळे गरीब राहिलेला, मदतीची गरज असलेला हा देश आहे आणि तो भारताकडे मित्रत्वाच्या, मदतीच्या अपेक्षेने पाहतोय.



भारतानेही या मित्राला सढळ मदत करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे
. भारताच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत निर्माण होणार्‍या संरक्षण साधनसामुग्रीचा ग्राहक व्हिएतनाम आहे. व्हिएतनामच्या सागरी पट्ट्यात जो खनिज तेलाचा साठा आहे (ज्यावर चीन हक्क सांगतो) त्याचे उत्खनन करून तेल उत्पादन करण्याच्या कामात भारताची सरकारी कंपनी (ONGC Videsh Ltd..) गर्क आहे. व्हिएतनामकडून भारताला झालेली सर्वाधिक मोलाची मदत म्हणजे त्यांच्या 'Cam Ranh' या संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट खोल बंदराच्या जवळच असलेल्या ‘Nha Trang' वर २०१८ साली भारतीय नौदलाला नाविक तळ उभारण्यासाठी मिळालेली परवानगी.



या सर्वव्यतिरिक्त भारताच्या
‘Act East' धोरणांतर्गत भारताने व्हिएतनामला जवळपास १५ लाख अमेरिकन डॉलर्सची मदत त्याच्या Ninh Thuan या प्रांतात (राजधानी Phan Rang, अर्थात पांडुरंग) लक्षणीय संख्येने राहत असलेल्या चाम समुदायाच्या लोकांच्या कल्याणार्थ दिली आहे. तसेच एकूण २२.५ लाख अमेरिकन डॉलर्स किमतीचे तांत्रिक साहाय्य Quang Nam या प्रांतातील प्राचीन चाम स्मारकाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिएतनामची राजधानी हानोई (Hanoi) मध्ये ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रा’चे उद्घाटन २०१६ साली करून परस्पर सांस्कृतिक संबंधांच्या संवर्धनाला चालना दिली. अशा आपल्या या मित्राला ‘मेरा हैं भारत नाम, तेरा हैं व्हिएतनाम’ असे म्हणून त्याचे शुभचिंतन करूया.


- पुलीत सामंत 
(लेखक हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक असून सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभ्यास केंद्रात पीएच.डी संशोधनात कार्यरत आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@