नवी दिल्ली : आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय दंगलीमध्ये गुप्तचर विभागाच्या अंकित शर्मा यांच्या हत्तेचादेखील गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने ताहीर यांची सदस्यपदावरून हकालपट्टी केली आहे.
ताहीर हुसेन यांच्या घरावरून २५ फेब्रुवारीला दंगलखोरांनी दगडफेक केली होती, असा दावा विरोधकांनी केला. तसेच हुसेन यांच्या घराच्या छताचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, आणि मोठे दगड आढळून आले. त्यानंतर गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येमध्ये ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला. ताहीर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचे अंकित शर्मा यांच्या वडिलांनी सांगतिले होते. मात्र, ताहीर हुसेन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.
ताहीरवर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तेव्हा आपने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सीएए विरोधक व समर्थक आमने सामने आले होते. दोन्ही गटामध्ये रविवारी आणि सोमवारी जोरदार धुमश्चक्री झाली. दगडफेक, जाळपोळीसह गोळीबारही करण्यात आला. या दंगलीमध्ये पोलीस कर्मचारी, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यासह तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
मात्र, आता हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीमध्ये जनजीवन पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मागील ३६ तासांत कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेनंतर जमावबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे.