उद्योगानुभवाचा 'आशिष'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2020   
Total Views |


Ashish Sirsat _1 &nb


आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातच काम करायचे, असा निर्धार करणाऱ्या आशिष सिरसाट यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली. आज 'नाईक ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग' या कंपनीच्या माध्यमातून त्यांची ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून तयार झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही उद्योग यशस्वी करता येतो, याचा आदर्श त्यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसमोर आपल्या कामगिरीतून ठेवला आहे.


मूळचे ठाणेकर असलेल्या आशिष रवींद्र सिरसाट यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केले होते. मात्र, त्यांचा कल हा अभियांत्रिकीकडे होता. अभियांत्रिकी सोडून वाणिज्य शाखेत आल्याचा निर्णय त्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे बारावीनंतर पुन्हा 'मेकॅनिकल ड्राफ्टस्मन'चे शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. शिकत असताना वयाच्या १९व्या वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. निशिकांत फोंडगे यांच्या सहकार्याने त्यांनी हे काम सुरू केले होते. 'ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग' संदर्भातील बड्या कंपन्यांशी त्यांचा संपर्क येत गेला. याच क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव त्यांनी कामादरम्यान गाठीशी बांधला आणि चुलत भाऊ जयंत सिरसाट यांच्या मदतीने दुबई गाठली. दुबईत इम्पोर्ट-एक्स्पोर्ट फर्मच्या माध्यमातून बड्या कंपन्यांच्या निर्यात व्यवस्थापकांशी त्यांचा संपर्क येत गेला. तसेच व्यवसायातील बारकावे समजण्यासाठी ही दुबईवारी फायदेशीर ठरली.

 

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आशिष यांनी केवळ आणि केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर इथवरचा प्रवास केला आहे. ज्या काळात नोकरी म्हणजेच सर्वस्व, असा समज समाजात रुढ होता, त्यावेळी एका मराठी कुटुंंबातील तरुणाने उद्योगात उतरणे आणि यशस्वी होऊन दाखवणे, हा एक अभिमानास्पद क्षण होता, अशी भावना ते व्यक्त करतात. सुरुवातीला घरातून विरोध झाला. मात्र, व्यवसायात नशीब आजमावून बघू, असा विचार वयाच्या २५व्या वर्षी त्यांनी केला. 'तीन ते चार वर्षे स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करू; अन्यथा नोकरी आहेच,' असा विचार करत उद्योगच करायचा, असा ठाम निर्णय त्यांनी घेतला. उद्योगासाठी पुरेसे भांडवल नसल्याने अडथळे येत गेले, शिवाय घरची जबाबदारीही खुणावत होतीच, मार्गदर्शक सोबत नव्हता, होता तो केवळ अनुभव. अनुभवाच्या जोरावर इथवरचा यशस्वी टप्पा गाठणे त्यांना शक्य झाले.

 

दुबईत व्यवसायाचा अनुभव गाठीशी बांधत १९९७ साली भारतात परत आल्यानंतर त्यांनी ओव्हन निर्मितीला प्रत्यक्ष सुरुवात केली होती. मात्र, या कामाचा पसारा हा तितकासा मोठा नव्हता. मात्र, या काळात आलेल्या अनुभवांवर स्वतःच या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बेकरीसाठी लागणारी सर्व साधनसामुग्री आता आशिष यांच्या देखरेखीखाली तयार होत होती. पूर्वी बेकरी व्यवसायात लाकडी भट्ट्यांचा वापर होत असे. कालांतराने या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सवय आशिष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या ग्राहकांना लावली. बेकरी व्यवसायात पूर्वीपासून वापरणाऱ्या लाकडी भट्ट्या ते अद्ययावत यंत्रणांची ओळख कंपनीच्या ग्राहकांना करून देण्यापर्यंतच्या टप्प्यातच बराच काळ खर्च झाला होता. आजही ते आव्हान आहेच. मात्र, यातून मार्ग काढण्याचे धाडस आशिष यांनी ठेवले आहे. बेकऱ्यांसाठी लागणारे रॉटरी रॅक ओव्हन, डेक ओव्हन, स्पायरल (पीठ मळण्यासाठी लागणारी यंत्रणा), प्लानिटरी मिक्सर (बिस्कीट मिक्सिंग मशीन), ब्रेड स्लाईसिंग मशीन आदी प्रकारच्या मशिनरी आता आशिष यांच्या देखरेखीखाली तयार होत होत्या. याव्यतिरिक्त इतर यंत्रणांची निर्मिती आणि व्यापार करण्याचे काम 'नाईक ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग'मार्फत केले जाऊ लागले. प्रकाश वसंत नाईक यांच्यासह भागीदारी तत्त्वावर सुरू केलेला हा उद्योग सद्यस्थितीला स्थिरस्थावर झाला आहे.

 

सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे एक सूक्ष्म, मध्यम व लघु क्षेत्रातील उद्योजक म्हणून आशिष यांना सुरुवातीला लागणारे भागभांडवल उभारण्यास मदत झाली. विश्वास आणि अनुभव गाठीशी जोडून नाईक आणि सिरसाट यांनी 'नाईक ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग'च्या यशाची मुहूर्तमेढ रोवली. आजघडीला देशभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कंपनीला यश आले आहे. येत्या काळात हा पसारा आणखी विस्तारेल, असा विश्वास दोन्ही उद्योजकांना आहे. गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या जोरावर ग्राहकवर्ग जोडून ठेवणाऱ्या 'नाईक ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग'ने सरकारी कंत्राटांच्या क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसेच या सगळ्या पसाऱ्यात आशिष यांना कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले. या प्रवासात पत्नी पल्लवी सिरसाट यांची साथ मोलाची ठरली. आजही व्यावसायिक दौऱ्यावर असताना कुटुंबातील सर्व जबाबदारी सांभाळत आशिष यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे काम त्या करतात.

 

'नाईक ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग'च्या माध्यमातून आज दहा ते पंधरा जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळू शकला आहे. या सर्व कामगारांना मूलभूत सोयीसुविधा आणि गरजेनुसार लागणारी मदत उपलब्ध करून देण्याचे काम कंपनीतर्फे केले जाते. भविष्यात कामाचा पसारा वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या दीडपट वाढेल, अशी आशा ते व्यक्त करतात. बेकरी व्यवसायातील या नव्या तंत्रज्ञानाला देशाबाहेरूनही मागणी आहे. आफ्रिका खंडातील देश, दुबई, नायजेरिया आदी देशांतही कंपनीचे ग्राहक आहेत. तसेच ज्या दक्षिण आफ्रिकेतून हे तंत्रज्ञान आयात केले जाते, अशा ठिकाणीही आशिष यांनी भारतीय यंत्रणा पुरवली आहे. या सर्व ठिकाणांहून प्रतिसादही चांगला मिळाला आहे. 'ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन' अर्थात 'टिसा'च्या माध्यमातून या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना येणाऱ्या अडचणींना सरकारदरबारी मांडण्याचे काम आशिष यांनी केले आहे. या क्षेत्रातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कामही 'टिसा' सोबत केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून शिवणकामाचे प्रशिक्षण वर्ग, बेकरी उद्योग यंत्रणा निर्मिती प्रशिक्षण देण्याचे कामही कंपनीतर्फे केले जाते. आशिष यांच्या कामाची दखल ठाण्यातील अनेक नामांकित वृत्तपत्रे तसेच संस्थांनी घेतली आहे. मेहनत, हिम्मत आणि सचोटी असेल तर व्यवसाय करणे अशक्य नाही. इतर गोष्टी या दुय्यम आहेत, असे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवून देणाऱ्या या उद्यमीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

 
 
@@AUTHORINFO_V1@@