थोडा उशीरच झाला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2020
Total Views |


MNP_1  H x W: 0



ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक मनोज कोटक भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते
. मात्र, २०१९च्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी तातडीने गटनेतेपदाचा राजीनामा देऊन दुसर्‍या अभ्यासू नगरसेवकाला संधी द्यायला हवी होती.



भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे
. एक व्यक्ती, एक पद अशी त्याची ख्याती आहे. परंतु, कधीकधी त्या ख्यातीलाही कलाटणी मिळते आणि कामात विस्कळीतपणा येतो. एका छोट्या राज्याप्रमाणे कारभार असलेल्या मुंबई महापालिकेचेच उदाहरण घेतले तर भाजप हा मोठी सभासद संख्या असलेला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे, तर शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. साहजिकच युतीत ठरल्याप्रमाणे जास्त सभासद संख्या असलेला शिवसेना पक्ष सत्ताधारी झाला आणि भाजप त्यांचा सहकारी पक्ष म्हणून त्यांना साथ देऊ लागला. प्रत्येक पक्षाचा गटनेता असतो. त्याप्रमाणे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक मनोज कोटक भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते. मात्र, २०१९च्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी तातडीने गटनेतेपदाचा राजीनामा देऊन दुसर्‍या अभ्यासू नगरसेवकाला संधी द्यायला हवी होती.



पण
, सत्ताधारी शिवसेनेचा भाजप सहकारी पक्ष असल्याने त्यांनी गटनेतेपद सोडण्याची घाई केली नसावी. मात्र, २०१९मध्ये विधानसभेच्या निवडणुका युतीद्वारे लढूनही मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत बिनसले आणि शिवसेनेने वेगळ्या विचारधारेच्या काँग्रेस-राष्ट्रवादीची कास धरून मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यामुळे महापालिकेत एकत्र बसत असले तरी शिवसेना-भाजपमध्ये मनोमिलन नव्हते. त्याचेच प्रतिबिंब स्थायी समितीत उमटत होते. अशावेळी गटनेत्याची आवश्यकता होती. पण, खासदारकीमुळे कोटक यांना ते शक्य होत नव्हते. स्थायी समिती आठवड्यातून एकदा होते आणि खासदार मनोज कोटक गेल्या नऊ-दहा महिन्यांत चार ते पाचवेळाच सभागृहात उपस्थित राहू शकले. रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या बाहेर कंत्राटदारांसोबत घेतलेल्या मीटिंगमध्ये भाजपने न घेतलेला सहभाग, त्यानंतर स्थायी समितीतून केलेला सभात्याग, इतरही कारणास्तव भाजपने केलेला सभात्याग अशावेळी जबाबदारी घेण्यासाठी गटनेत्याची आवश्यकता असते. पण भाजपचा कारभार गटनेत्याविना चालला होता. त्यामुळे त्यात खंबीरपणा नव्हता. केवळ कर्तव्य पार पाडल्याचेच दिसत होते. नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच गटनेत्याची नियुक्ती करण्यात आली असती तर महापालिकेत भाजप अजून खंबीर दिसली असती. पण उशिरा का होईना, चूक लक्षात आली आणि ती सुधारली, हेही नसे थोडके.



शिंदे यांच्यापुढे आव्हान



मुंबई महापालिकेत
‘पहारेकर्‍या’ची भूमिका बजावणार्‍या भाजपने आता विरोधी नेतेपदासाठी दावा केला असून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची शिफारस केली आहे. एका कठीण प्रसंगी शिंदे यांच्याकडे पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. कारण, महापालिकेत ‘कमळ’ फुलवायचे भाजपचे लक्ष्य आहे, तर शिवसेनेला भगवा फडकवत ठेवायचा आहे. प्रभाकर शिंदे हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत. ते सभागृह नेताही होते. मात्र, भाजपमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे तेज अधिकच झळाळत आहे. सध्याचे गटनेते खासदार मनोज कोटक यांच्या गैरहजेरीत त्यांनी गैरव्यवहाराविरोधात भाजपचा वैचारिक आणि तात्विक लढा चालूच ठेवला. मुद्देसूद बोलणे आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या मोठा गुण. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपची प्रतिमा महापालिकेत उंचावर नेणे आणि महापालिकेत ‘कमळ’ फुलवणे हे त्यांच्यापुढे आव्हान आहे.



मात्र
, हे विरोधी पक्षनेते पद त्यांना सहजासहजी मिळेल असे सध्या तरी दिसत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेत भाजपचे संख्याबळ ८३ असूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा न सांगता केवळ ‘पहारेकर्‍या’ची भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली. त्यामुळे मुंबई महापालिकेतही राजकीय समीकरणे बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मात्र, पालिकेच्या नियमानुसार एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिल्यास तो पक्ष जोपर्यंत विरोधी पक्षनेतेपदावरील आपला दावा सोडत नाही, तोपर्यंत इतर पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा विरोधी पक्षनेते पदावरून दावा सोडावा लागेल. मुंबई महापालिकेत चार वैधानिक समित्या, सहा विशेष समित्या आणि १७ प्रभाग समित्या आहेत. एप्रिल महिन्यात त्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांनी एकत्र येऊन लढल्यास भाजपला आपोआप विरोधी पक्षनेतेपद मिळेलच. मात्र, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@