नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्याच्या नावाखाली हिंसाचार भडकवणाऱ्यांकडून दहशत पसरवली जात असतानाच केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नेते ताहीर हुसैन यांच्या इमारतीच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब, पिस्तुल आणि मोठ्या गोण्यांमध्ये भरलेले दगड आढळले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह गुप्तचर विभागीय अधिकारी अंकित शर्मा यांचीही निघृण हत्या करण्यात आली आहे.
पत्रकारांनी केलेल्या दाव्यानुसार, दिल्ली हिंसाचाराचे याआधी अनेक व्हिडियो समोर आले आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये ताहिर हुसैन यांच्या घरावरून काही लोक दगड फेकत आहेत. तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकताना दिसत आहेत. तर ताहीर हुसैनच्या हातामध्ये रॉड घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबाने या घरावर असलेल्या लोकांनाच जबाबदार धरले आहे. मात्र, आपचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आता ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली असून याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.