दिल्लीतील हिंसाचाराचा विद्यार्थ्यांनाही फटका
नवी दिल्ली : दिल्लीच्या विविध भागात नागरिकत्व कायद्यावरून हिंसक आंदोलने सुरू आहेत. गेल्या रविवारपासून या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य भागात या आंदोलनांची तीव्रता अधिक आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३५ जणांचा बळी गेला आहे. या अशांततेमुळे सीबीएसई बोर्डाने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार २८ आणि शनिवार २९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षाही या भागातल्या परीक्षा केंद्रापुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दंगलग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडली असेल त्यांनी ताण घेऊ नये, निश्चिंत रहावे, असे आवाहन सीबीएससी बोर्डाने केले आहे.
गुरुवारी सीबीएसई बोर्डाने परिपत्रक काढून २८ आणि २९ च्या ईशान्य दिल्लीतील केंद्रांवरील परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली. अन्य सर्व केंद्रांवरील परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहेत. ईशान्य भागातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हुकल्या आहेत, त्यांना परीक्षेची पुढील तारीख कळवण्यात येणार आहे. कोणकोणत्या परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द केल्या आहेत, याची माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.