दिल्ली हिंसाचाराला वारिस पठाण कारणीभूत : वसिम रिझवी

    27-Feb-2020
Total Views |
DELHI_1  H x W:



शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांचा आरोप 
नवी दिल्ली : दिल्लीत हिंसक आंदोलने धुमसत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी या हिंसक आंदोलनाला वारिस पठाण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.


ईशान्य दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप वसिम रिझवी यांनी केला आहे. तसेच वारिस पठाण यांच्या ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी आहोत’ या वक्तव्याचे पडसादही दिल्लीत उमटत आहेत, असेही वसिम म्हणाले आहेत.


त्याचप्रमाणे, शाहीनबामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनावरही रिझवी यांनी टीका केली आहे. शाहीनबागमधील महिलांच्या अडाणीपणामुळे दिल्लीत हिंसा घडून येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकार, सीएए आणि देश आपलाच आहे. आपसात भांडू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे. काँग्रेसच्या विषाचा प्याला पिऊ नये. काँग्रेसच्या जाळ्यात अडकू नका, असेही ते म्हणाले आहेत.


दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकीच्या गोळ्या, ब्लेड्स, दगडं, टोकदार वस्तू, खिळे यांच्या लागण्यामुळे या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ३४ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू हा बंदुकीच्या गोळ्या लागल्यामुळे झाला आहे, अशी माहिती जीटीबी रुग्णालय आणि जग प्रवेशचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.