शोभे देश ब्रह्म-क्षत्र तेजाने...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |



शोभे देश ब्रह्म-क्षत्र ते


देश किंवा राष्ट्र केवळ ज्ञान-विज्ञानानेच चालत नाही, तर त्यासोबतच शक्ती व सामर्थ्याची गरज  असते. विद्वत्तेच्या किंवा ज्ञानाच्या दृष्टीने देश प्रगत असेल आणि अंतर्बाह्य रक्षणाच्या दृष्टीने तो शक्ती व बळविरहित असेल, तर तो कधीच सुखी व आनंदी राहू शकणार नाही. यासाठी प्रत्येक राष्ट्रात ब्रह्मशक्ती व क्षात्रशक्ती या दोन्हींची अत्याधिक आवश्यकता असते.





 इदं मे ब्रह्म च क्षत्रं, चोभे श्रियमश्नुताम्।

मयि देवा दधतु श्रियमुत्तमां

तस्यै ते स्वाहा॥

(यजुर्वेद-32/16)

अन्वयार्थ


(मे) माझे (इदं) हे (ब्रह्म च क्षत्रं च) ब्राह्मण धर्म आणि क्षत्रिय धर्म (उभे) दोन्ही (श्रियं) उत्कर्षाला, उत्तम शोभेला (अश्नुताम्) प्राप्त होवोत. (देवा:) दिव्योत्तम असे विद्वान व राजे लोक (मयि) माझ्या अंत:करणात (उत्तमां श्रियं) सर्वोत्तम लक्ष्मी, श्री व शोभेला (दधतु) स्थिर करोत.(तस्यै ते) त्या तुमच्या धनैश्वर्य व लक्ष्मीकरिता आमची ही (स्वाहा=सु+आहा) स्वागतवचने आहेत.


विवेचन


देश किंवा राष्ट्र केवळ ज्ञान
-विज्ञानानेच चालत नाही, तर त्यासोबतच शक्ती व सामर्थ्याची गरज असते. विद्वत्तेच्या किंवा ज्ञानाच्या दृष्टीने देश प्रगत असेल आणि अंतर्बाह्य रक्षणाच्या दृष्टीने तो शक्ती व बळविरहित असेल, तर तो कधीच सुखी व आनंदी राहू शकणार नाही. यासाठी प्रत्येक राष्ट्रात ब्रह्मशक्ती व क्षात्रशक्ती या दोन्हींची अत्याधिक आवश्यकता असते. या दोन्ही शक्ती सदैव उत्कर्षाला प्राप्त होवोत. ही दोन्ही तत्त्वे देशामध्ये सुशोभित होत राहोत. देशाला सद्विद्येने, उत्तम ज्ञानाने व सच्चरित्राने परिपूर्ण असलेल्या शिक्षकांची, विद्वानांची म्हणजेच ब्राह्मणांची खूपच गरज आहे. कारण, ज्ञानी ब्राह्मण गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले, तर देशाचा विद्यार्थीवर्ग व तरुण पिढी सुसंस्कारित होऊ शकते. आदर्श गुरुजनांचा योग्य दिशाबोध लाभल्यानेच त्या-त्या देशातील विद्यार्थी ज्ञान व चारित्र्याने परिपूर्ण होऊन त्या राष्ट्राला प्रगतिपथावर नेऊ शकतात; अन्यथा योग्यतम गुरूच नसतील, तर नव्या पिढीला मार्गदर्शन कोण करणार आणि देशाची नवनिर्मिती कशी होणार? याकरिता ज्ञानी, सदाचारी, तपस्वी आणि विद्वत्तेचे वारिधी असलेले आचार्यवृंद म्हणजेच ब्रह्मशक्तीयुक्त गुरुजन हवेत. प्रामाणिक सद्विचारी ब्राह्मण, द्विजगण ही त्या राष्ट्राची खरी भूषणे असतात, त्यामुळे क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णांना ज्ञानाची अपार संपदा लाभू शकते आणि त्या देशातील व्यवस्था सन्मार्गाने चालण्यास समर्थ होते.



दुसरी शक्ती म्हणजे क्षत्र शक्ती
! देशाला क्षत-विक्षत होण्यापासून वाचविणारे क्षत्र बळ अत्यंत मोलाचे. वाईट प्रवृत्ती या नेहमीच उफाळून येत असतात. त्यांना पायबंध घालण्यासाठी शरीराने बलिष्ट, शूरवीर तेजस्वी अशा क्षत्रियांची फारच आवश्यकता असते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे, प्रजाजनांना क्रूरकर्म्यांच्या अत्याचारांपासून रोखून त्यांना सुखी ठेवणारे क्षत्रिय वीर सैनिक, पोलीस अधिकारी, राजकीय पुढारी, सत्ताधारी लोक असतील तर तो देश सुरक्षित समजला जातो. राष्ट्राला भीती असते ती दोन प्रकारच्या शत्रूंची. अंतर्गत आणि बाह्य शत्रूंमुळे देश असुरक्षित होतो. देशाच्या विविध भागांत या-ना त्या कारणाने माणसां-माणसांत संघर्ष, भांडणे उद्भवतात. दोन समूहातील संघर्ष विकोपाला जाऊन समाजमन अस्वस्थ होते. सामाजिक आरोग्य बिगडते तसेच चोर, लुटारू, भ्रष्टाचारी, लबाड, स्वार्थी व गुंड लोकांमुळे लोकांमध्येे भीतीचे व अशांततेचे वातावरण पसरते. म्हणूनच त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता क्षात्रधर्माने युक्त धैर्यसंपन्न अशा बलवान पोलीस अधिकार्‍यांची व शूरवीर युवकांची गरज भासते. त्याचबरोबर देशाच्या सीमेवर परकीय शत्रूसैनिकांशी झुंजणारे वीर जवान हवे असतात, जे की अहर्निश डोळ्यात तेल घालून प्राणपणाने देशरक्षणाच्या कामी सदैव तत्पर असतात. त्याचबरोबर देशावर अधिराज्य करणारी शासक राजेमंडळीदेखील क्षात्रधर्माने परिपूर्ण हवीत.



ब्रह्मधर्म ’ आणि ‘क्षात्रधर्म’ ही राष्ट्ररूपी रथाची दोन चाके आहेत. दोन्ही समान गतीने चालली पाहिजेत. मागे-पुढे किंवा खाली-वर होऊन जमणार नाही. दोन्ही बरोबरीने एकाच दिशेने गतिमान असावीत. केवळ ब्रह्मशक्ती आणि केवळ क्षात्रशक्ती काहीच कामाची नाही. वेदमंत्र म्हणतो- देशात या दोन्ही शक्ती सशक्त, समृद्ध व प्रगत ठरोत. या दोन्हींच्या समन्वयाने व परस्पर साहचर्याने राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साधू शकते; अन्यथा कितीही मोठा देश असला, तरी त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. यजुर्वेदात अन्य एके ठिकाणी म्हटले आहे -


यत्र ब्रह्म च क्षत्रं च सम्यत्र्घौ चरत
: सह।

तं लोकं पुण्यं प्रज्ञेषं यत्र देवा: सहाग्निना। (यजु. 20/25)


ज्या देशात ब्रह्मबळ आणि क्षात्रबळ हे दोन्ही संयुक्त होऊन सोबत
-सोबत क्रियाशील असतात, तेथील नागरिक राष्ट्रकल्याणाच्या भावनेने परिपूर्ण असतात, त्या देशात नेहमी सुखसमृद्धी, पावित्र्य, शांतता व आनंदाचे वातावरण निर्माण होते. भगवद्गीतेत संजयाने धृतराष्ट्राला याविषयी मौलिक सल्ला देताना म्हटले होते -

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।

तत्र श्रीर्विजयो भूतिध्रुवा नीतिर्मतिर्मम॥



अर्थात
, जेथे योगेश्वर कृष्ण म्हणजेच ज्ञान, विवेक, शक्तीने परिपूर्ण अशी ब्रह्मशक्ती आहे आणि धनुर्धारी अर्जुन म्हणजेच क्षात्रशक्ती आहे, तेथेच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्याची समृद्धी आणि न्याय या चार गोष्टी निश्चितपणे विद्यमान असतात, हे निश्चयपूर्ण स्पष्ट सांगणे आहे. सद्यकाळात या मंत्राशयाची फारच प्रासंगिकता आहे. जेव्हा ब्रह्मशक्तीपासून क्षात्रशक्ती फारकत घेते आणि क्षात्रशक्ती ही ब्राह्मशक्तीने विरहित बनते, तेव्हा तो-तो माणूस पराजयाच्या दिशेने वाटचाल करतो. भारताच्या इतिहासात या दोन गोष्टी घडल्याने समग्र विश्वाच्या गुरूस्थानी असलेला हा देश विदेशींकडून पादाक्रांत झाला आणि आजदेखील वैचारिकदृष्ट्या दीनवाणे जीवन जगण्याचे दुर्भाग्य पाहावयास मिळते. प्रत्येक मानव हा ज्ञानीही असावा आणि शूरवीरदेखील असावा. याकरिता शासनाने देशाची व्यवस्था तशा प्रकारे निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे. असा सुवर्णकाळ जेव्हा उदयास येईल, तेव्हा निश्चितच अज्ञान, अन्याय, अभाव या तीन दोषांचा नायनाट होऊन देश सर्वदृष्टीने सुविकसित होण्यास मदत मिळेल. आज देशातील विद्वान ब्रह्मवृंदांना क्षात्रतेजाची आवश्यकता आहे, तर शूरवीर क्षत्रिय मंडळींना ब्रह्मतेजाची म्हणजेच आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. या दोन्ही महान गोष्टी एकत्रपणे नांदतील, तेव्हा केवळ देशाचीच नव्हे तर समग्र विश्वाची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.



-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@