तेव्हा तुम्ही कुठे होता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020   
Total Views |


vedh_1  H x W:



दिल्लीच्या दंगलीवरून भाजपवर दोषारोपण करण्यापूर्वी काँग्रेसने जरा इतिहासात डोकावून बघावे
. १९८४ सालच्या दिल्लीतल्याच शीखविरोधी दंगली आज किती काँग्रेसींना आठवतात? सोनिया गांधींनी या दंगलीचे किस्से त्यांच्या सुकन्या आणि सुपुत्राला कधी सांगितले असतील का?


धी नव्हे ते बर्‍याच दिवसांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी पत्रकार परिषदेत उपस्थिती दर्शविली. यावेळी दिल्लीतील दंगलसदृश्य परिस्थितीवर बोट ठेवत सोनिया गांधी चक्क गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीच मागणी करून मोकळ्या झाल्या. एवढेच नव्हे तर सहा सवाल उपस्थित करत ‘मॅडम’नी केंद्र सरकारला त्यांच्या खास हिंदी शैलीत जाबही विचारला. खरं तर यावेळी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. पण, माजी अध्यक्ष, युवराज राहुल गांधी यांची अनुपस्थिती खटकण्यासारखीच! एरवी सरकारवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानणारे हे गांधी म्हणे सवयीप्रमाणे परदेश दौर्‍यावर आहेत. आता यात काही नावीन्य वाटण्याजोगेही नाही. पण, जेव्हा सोनिया गांधी अमित शाह यांना उद्देशून ‘तुम्ही रविवारी कुठे होता?’ असा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा निश्चितच सोनिया गांधी आणि राहुल गांधींनीही ते स्वत: कुठे होते, या प्रतिप्रश्नाचे उत्तरही जनतेला द्यावे. पण, सोनिया गांधींची म्हणा काय चूक? जे काही पक्षाच्या नेत्यांनी कागदावर खरडून दिले, ते त्या वाचून मोकळ्या झाल्या. पण, काँग्रेस पक्ष हे साफ विसरला की, रविवारीच दिल्लीतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही हजर होते. पण, त्या बैठकीला काँग्रेसतर्फे एकही नेता फिरकला नाही.



याचाच अर्थ
, दंगलीचा थेट निषेध नोंदवणे तर सोडाच, साधी दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून काँग्रेसनेही ‘हाता’ची घडी घालून तमाशाच बघण्यात धन्यता मानली. जेव्हा दिल्ली जळत होती, तेव्हा सोनिया गांधी ‘१०, जनपथ’वर होत्या, तर राहुल कुणीकडे उडाले, हे त्यांच्या आईला ठाऊक असले तरी नशीब म्हणायचे! सद्य परिस्थितीचे एवढेच गांभीर्य काँग्रेसला असते, तर त्यांनी ‘सीएए’ विरोधकांना, शाहीनबागवाल्यांच्या आंदोलनालाही वेळोवेळी हवा दिली नसती. दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी मुस्लीम मतांच्या लांगूलचालनासाठी थरूरसारख्या नेत्यांनी शाहीनबागेचे उंबरठे झिजवले नसते. पण, मुळात ‘राष्ट्रहित’ म्हणजे नेमके काय, याचा विसरच काँग्रेसला पडलेला दिसतो. त्याचे सकृतदर्शनी परिणाम नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही दिसून आलेच. त्यामुळे या दंगलीच्या आगीत तेल ओतणार्‍या काँग्रेस पक्षाने आता नामानिराळे राहून या मुद्द्याचे राजकीय लाभ लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न न केलेलाच बरा...



‘१९८४’ची दिल्ली आठवते का?


दिल्लीच्या दंगलीवरून भाजपवर दोषारोपण करण्यापूर्वी काँग्रेसने जरा इतिहासात डोकावून बघावे
. १९८४ सालच्या दिल्लीतल्याच शीखविरोधी दंगली आज किती काँग्रेसींना आठवतात? सोनिया गांधींनी या दंगलीचे किस्से त्यांच्या सुकन्या आणि सुपुत्राला कधी सांगितले असतील का? पण, स्वत:च्याच पक्षाच्या इतिहासाची थोडी तसदी घेऊन जरी आजच्या गांधींनी माहिती करून घेतली, तर १९८४ साली काँग्रेसने केलेले शिखांचे शिरकाण त्यांची आजही झोप उडवल्याशिवाय राहणार नाही. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नंतर चार महिन्यांनी, ३१ ऑक्टोबर १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख सुरक्षारक्षकांनीच गोळ्या झाडून हत्या केली. अमृतसरच्या सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून खलिस्तानी भिंद्रनवालेेला यमसदनी धाडणार्‍या इंदिरा गांधींची म्हणूनच शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केली.



त्यानंतर अवघ्या काही तासांत काँग्रेसचा शीखविरोधी आक्रोश उफाळून आला
. ‘एकही शीख जिवंत राहता कामा नयेयांसारख्या काँग्रेस नेत्यांच्या भडकाऊ भाषणामुळे दिल्लीत शीखविरोधी आंदोलनाने पेट घेतला. शिखांची घरे, गाड्या, वस्त्या, गुरुद्वारा मोठ्या संख्येने लक्ष्य करण्यात आले. लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्या, चाकू, पेट्रोल-केरोसीनची रसद काँग्रेसतर्फेच पुरवण्यात आली. कार्यकर्त्यांना शिखांच्या हत्येची सुपारी देण्यात आली. शीख पुरुषांना घराबाहेर काढून भररस्त्यात पेटवण्यात आले. त्यांच्या बायकांची अब्रूही याच रक्ताळलेल्या हातांनी अगदी कुस्करून टाकली. राजधानी दिल्ली तेव्हाही पेटली होती, उद्ध्वस्त झाली होती. जगदीश टायटलर, एच. भगत यांसारखे बरेच काँग्रेस नेते तर या दंगलीत आघाडीवर होते. पोलीस, गृहमंत्रालयानेही केवळ बघ्याची भूमिका घेत एकाप्रकारे शिखांच्या या सामूहिक हत्येला मूकसंमतीच दिली. राष्ट्रपतींच्या गाडीवरही दगडफेक करण्यापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मजल गेली. अधिकृत आकडेवारीनुसार एकट्या दिल्लीत २८०० शीख बांधवांना जीव गमवावा लागला. त्यानंतर चौकशा, आयोगांच्या फेर्‍या रंगल्या व त्यातही काँग्रेसच्या या दंगलीतील सहभागावर ताशेरे ओढण्यात आलेच. त्यामुळे दिल्लीतील दंगलीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी काँग्रेसने ‘१९८४’च्या शीख दंगलीची अमानुषता एकदा आठवून पाहावी आणि दिव्याखाली नेहमी अंधारच असतो, हे विसरु नये.

@@AUTHORINFO_V1@@