येणे राहे समाधान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |


samarth ramdas_1 &nb



दुराचारी पापी लोकांना मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागतात हे निश्चित, असे समर्थ म्हणतात. समर्थांच्या काळी दिल्लीतील औरंगजेबाने केलेला हिंदू प्रजेचा छळ समर्थांनी पाहिला होता आणि त्यासंबंधी विश्वासू लोकांकडून ऐकले होते.


समर्थांनी दासबोध ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की
, “जे लोक अन्यायाने, अनीतीने वागतात व दुसर्‍यांचा अकारण छळ करतात, त्यांना त्यांच्या कर्माची फळे या जन्मात नाहीतर मृत्यूनंतर भोगावी लागतात, कारण त्यांची दुष्कृत्ये सूक्ष्म जीवात साठवली जातात. मृत्यूनंतरच्या यमयातनांतून त्यांची सुटका नसते.” हे आपण मागील लेखात पाहिले. त्या पापी जीवांना मिळणारा फळभोग अतिंद्रिय असल्याने तर्कशास्त्राने त्याचा उलगडा करता येत नाही. पण, दुराचारी पापी लोकांना मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागतात हे निश्चित, असे समर्थ म्हणतात. समर्थांच्या काळी दिल्लीतील औरंगजेबाने केलेला हिंदू प्रजेचा छळ समर्थांनी पाहिला होता आणि त्यासंबंधी विश्वासू लोकांकडून ऐकले होते. समर्थांच्या तीर्थाटन काळात शहाजहाँच्या हुकूमाने काशीक्षेत्रातील पाऊणशे मंदिरांचा विध्वंस करण्यात आला होता.


गझनीच्या महंमदाने सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले होते
. ते तेथील लोकांनी पुन्हा बांधले. पण, नुसरतखानाने तेसुद्धा पाडून टाकले व त्यातील मूर्तीचे तुकडे करून ते तो दिल्लीला घेऊन गेला. ते त्याने मशिदीच्या बांधकामासाठी पाया भरताना वापरले. अशी अनेक अत्याचाराची उदाहरणे शंकरराव देवांनी लिहिलेल्या ‘समर्थावतार’ या ग्रंथात वाचायला मिळतात. तसेच त्याकाळी काही परदेशी प्रवासी भारतात येऊन गेले. त्यांनी प्रवासवर्णने लिहून हे अत्याचार त्यात सांगितले आहेत. इटलीचा मनूची (ारर्पीललळ) हा प्रवासी इ.स. १६५६ ते १७०८ पर्यंत म्हणजे ५२ वर्षे भारतात होता. औरंगजेबाची कारकीर्द त्याने जवळून पाहिली होती. फ्रान्सचे ट्रॅव्हरनियर व बरनियर हेही त्या काळात भारतात येऊन गेले. जर्मनीचा मॅन्डेलस्लो हाही प्रवासी इ.स. १६३८ ते १६४०च्या दरम्यान भारतात आला होता. या सर्वांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनातून लहरी म्लेच्छांचे अत्याचार वाचायला मिळतात. श्री. देवांनी ‘समर्थावतार’ ग्रंथात यासंबंधी सविस्तर लिहिले आहे.



तत्कालीन हिंदू प्रजा राजाला विष्णूचा अवतार मानत
. प्रजेवर अन्याय झाला तर राजाकडे दाद मागता येत होती. पण, येथे तर राज्यकर्तेच अनीतीने वागून अन्याय करीत होते. हिंदू प्रजेचा छळ करून ते मात्र चैन करत होते. तेव्हा अशा अनीतीने, दुष्टपणे वागणार्‍यांना देव शिक्षा का करीत नाही? असा तत्कालीन लोकांचा समज होणे स्वाभाविक होते. तो समज दूर होण्यासाठी समर्थांनी दासबोधात स्पष्ट सांगितले की,


राजा न करिता नीतिन्यावो ।

म्हणौनि यमयातना ।


म्लेंच्छ पापी राजांना त्यांच्या दुष्कृत्याची फळे भोगावी लागतील. असल्या पापी जीवांच्या मृत्यूनंतरच्या यमयातनांची, नरकातील अवस्थांची वर्णने शास्त्रात दिलेली आहेत. ती वर्णने काल्पनिक आहेत, असे समजू नका. लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा व सन्मार्गाने, नीतीन्यायाने वागावे. समर्थांच्या या निवेदनाने लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या असतील. शास्त्रात सांगितलेल्या यमयातनांचे थोडक्यात वर्णन समर्थांनी दासबोधाच्या दशक ३ समास ८ मध्ये दिले आहे. अनीतीने वागणार्‍या, अत्याचार करणार्‍या माणसाला यमयातनेचे भोग चुकत नाहीत. यमलोकातील वेगवेगळे नरक कसे असतात, ते या समासात सांगितले आहे. पापी जीवांना हातपाय बांधून ‘अक्षोभ’ नावाच्या नरकात फेकतात. तेथे असंख्य जीव व किडे वळवळत असतात. ‘कुंभपाक’ नावाचाही एक नरक आहे. तेथे लहान तोंड असलेले एक कुंड असते. त्यात प्रचंड उकाडा व दुर्गंधी पसरलेली असते. त्यात पापी जीवाला टाकतात. तापलेल्या भूमीवर प्रथम पापी जीवाला भाजतात आणि नंतर जळता खांब त्याच्या पोटावरून फिरवतात. यमाकडे पापी जीवाला क्लेश देणार्‍या शिक्षेचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एका प्रकारात पापी जीवाला चारजण चार बाजूंनी खेचतात, ताणतात आणि नंतर झोके देऊन खाली आपटतात. यमयातना फार भयानक आहेत. त्या टाळायच्या असतील तर लोकांनी आपल्या जीवनात सन्मार्गाने चालले पाहिजे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.



यासाठी माणसाने जीवनात फार विचाराने वागले पाहिजे
. जीवनात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधले, तरच जीवन सुखी आणि यशस्वी करता येईल. हे जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी काय करता येईल, यासंबंधीचे मार्गदर्शन दासबोधातून मिळते. सर्वप्रथम आळस सोडून शिस्त व नियम पाळायला शिकले पाहिजे.

आळस उदास नागवणा ।

आळस प्रेत्न बुडवणा ।

आळसे करंटपणाच्या खुणा ।

प्रगट होती ॥ (११.३.१२)

आळसामुळे जांभया येऊन माणसाला झोप येऊ लागते. माणूस सुस्तावतो, आळशाला झोप प्रिय असते. त्यामुळे त्याच्या ठिकाणी उत्साह राहत नाही. तो निरुत्साही होतो. आळसामुळे माणसाचे नुकसान होते. आळशीपणा हे दुर्भाग्याचे लक्षण आहे. उद्योगी माणूस कष्ट करतो. कालांतराने त्या कष्टाचे फळ त्याला मिळते, तो सुखी होतो.



सामान्य माणसाचे जीवन सुखी व यशस्वी कसे करता येईल, यासाठी समर्थांनी तत्कालीन लोकांसाठी एक दिनक्रम सांगितला आहे. तो दिनक्रम आज आपण जशाच्या तसा अमलात आणू शकत नाही, परंतु त्यात सांगितलेली तत्त्वे आपण आचरणात आणली तर माणसाला सुखी-समाधानी आणि यशस्वी जीवन अनुभवता येईल. समर्थांनी तत्कालीन सामान्य माणसासाठी सांगितलेली दिनक्रमाची रूपरेषा थोडक्यात अशी आहे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे नंतर देवाचे स्मरण करावे. मग लांब कोठेतरी शौचास जावे. स्वच्छ पाण्याने हातपाय धुवावे, आचमन करावे. मग स्नान-संध्या, पितृतर्पण व वैश्वदेव हे विधी यथासांग करावे. देवाची पूजा करावी. नंतर काहीतरी खाऊन घ्यावे आणि प्रपंचाच्या उद्योगाला लागावे. उद्योगात संबंधित लोकांना गोड शब्द बोलून राजी राखावे. प्रत्येकाने आपल्या व्यवसायात सावध असावे. बेसावधपणे वागल्यास कुणीही फसवून जाईल. मन एकाग्र करावे, जेवण झाल्यावर थोडे वाचन, चर्चा करावी. एकटे बसून निरनिराळ्या ग्रंथांचा नीट अभ्यास करावा.



समर्थांनी सांगितलेल्या दिनचर्येतील तत्त्वे आजही आवश्यक आहेत. जीवनात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळावे. प्रातःकाळी उठावे. आजच्या जीवनशैलीत माणसे उशिरापर्यंत जागतात व दुसर्‍या दिवशी आळसावलेल्या अवस्थेत उशिरा उठतात. त्यांचा सारा दिवस बिघडतो. माणसाने व्यवसायात संबंधितांशी गोड बोलावे. त्याने सकारात्मक ऊर्जा मिळून काम करायला उत्साह वाटतो. असे न करता तुसडेपणाने संबंधितांशी वागले तर मिळणार्‍या नकारात्मक उर्जेने दिवस खराब जातो. व्यवयाय नीट होत नाही. आपल्या उद्योगव्यवसायात नेहमी सतर्क म्हणजे खबरदार असावे.



ज्या ज्याचा जो व्यापार ।

तेथे असावे खबर्दार।

दुश्चितपणे तरी फेर । वेढा लावी॥

उद्योगात जागरूक राहिले नाही तर साधे पोरही केव्हा फसवून जाईल, ते कळणार नाही. तेथे एकाग्र मनाने काम करावे. व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे. वेळ वाया न घालवता कमवावे आणि खावे. दुसर्‍यासाठी थोडेतरी कष्ट करावे. अडचणीत सापडलेल्यांना मदत करावी. त्याचप्रमाणे आपण विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. त्याने आपल्या विचारांची वाढ होते. लोकांत धर्मचर्चा करावी, पुराण ऐकावे, हरिकथा निरूपणे ऐकावी, प्रपंंच आणि परमार्थ करत असताना एक क्षणही वाया घालवू नये. हे करीत असताना लक्षात ठेवावे की,


आहे तितुके देवाचे ।

ऐसे वर्तणें निश्चयाचें ।


हे सर्व देवाचे असल्याने आपण विश्वस्त म्हणून सारी कामे करायची आहेत. हाच खरा समाधानाचा मार्ग आहे. तरीही आपला प्रपंच चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, तेव्हा योग्य मार्गाने तो अवश्य मिळवावा. त्याचबरोबर ज्ञानही संपादन केले पाहिजे. प्रपंचासाठी पैसा, तसे परमार्थासाठी विश्वातील तत्त्वाचे ज्ञान लागते. जीवन सुखी - समाधानी होण्यासाठी समर्थ थोडक्यात सांगतात-


कर्म उपासना आणि ज्ञान ।

येणे राहे समाधान ।



-सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@