भीष्मांची राजनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020
Total Views |


bhisma pitamah_1 &nb



खरा मित्र कोण व शत्रू कोण हे ठरवणे कठीणच असते. ज्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही व फक्त आपला फायदाच होईल, अशाच माणसाची मित्र म्हणून निवड करावी.’’ ‘‘शत्रूशी केव्हा तह करावा, हे पण राजाला कळले पाहिजे.



‘‘कोणाशीही मैत्री करण्यापूर्वी राजाने त्या माणसाची कसून चौकशी करावी, त्याच्याविषयी बारीकसारीक माहिती मिळवावी. कारण, खरा मित्र कोण व शत्रू कोण हे ठरवणे कठीणच असते. ज्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका नाही व फक्त आपला फायदाच होईल, अशाच माणसाची मित्र म्हणून निवड करावी.’’ ‘‘शत्रूशी केव्हा तह करावा, हे पण राजाला कळले पाहिजे. आपण जेव्हा एखाद्याला भीत असतो, तेव्हा त्याला आपण मुळीच भीत नाहीय, असंच दाखवायचं. ज्याच्यावर आपला काडीचाही विश्वास नाही, त्याला आपण पूर्ण विश्वास ठेवत आहोत, असं वाटलं पाहिजे. राजाला ही सोंगे वठवणे आवश्यक आहे. काही कारणास्तव तुम्ही शत्रूशी शांतता प्रस्थापित केली असेल तर पहिली संधी मिळताच युद्धही पुकारावं.’’ युधिष्ठिर विचारता झाला, ‘‘पितामह, पापाचं मूळ कशात आहे? ते कशाच्या पायावर उभे राहतं?’’ भीष्म म्हणाले, ‘‘लोभ हेच सर्व पापांचे मूळ होय. पाप सारे गुण आणि चांगुलपणा नष्ट करतं. लोभ हा लबाडी व दांभिकता यांचा वाहता अखंड झराच जणू. अनेक दुर्गुण लोभातून उत्पन्न होतात. लोभ हा पापाचा कारक आहे.’’



युधिष्ठिर म्हणाला
, ‘‘अज्ञान म्हणजे काय?’’ भीष्म म्हणाले, ‘‘अज्ञान पण लोभातून निर्माण होतं. जसजसा लोभ वाढतो, तसे अज्ञान वाढते.’’ युधिष्ठिराने विचारले, ‘‘मानवी कर्तव्यात प्रथम प्राधान्य कुणाला द्यावे?’’ भीष्म म्हणाले, ‘‘स्वत:वरती नियंत्रण ठेवणे, हे तुमचे सर्वात पहिले व श्रेष्ठ कर्तव्य होय. नियंत्रण हे सर्व गुणांची प्राप्ती करून देते. क्षमा, संयम, दया, नम्रता, औदार्य, स्थिरबुद्धी, क्रोधावर विजय, समाधान, मधुरता, द्वेषापासून मुक्ती, हे व असे अनेक गुण नियंत्रणामुळे मिळतात.’’ युधिष्ठिर म्हणाला, ‘‘सत्य म्हणजे?’’ भीष्म म्हणाले,’’सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य. ते शाश्वत असतं. सत्य हा माणसाचा सर्वात श्रेष्ठ आधार. सत्य हे श्रेष्ठ तप आहे. सगळ्या यज्ञांपेक्षा सत्य हा सर्वश्रेष्ठ यज्ञ. हे तीनही लोक सत्याच्या आधारावर उभे आहेत. सत्याचे तेरा आविष्कार आहेत, ते असे नि:पक्षपातीपणा, आत्मसंयम, क्षमा, नम्रता, सहनशीलता, सौजन्य, संन्यास, चिंतन, आत्मप्रतिष्ठा, धैर्य, करुणा, अहिंसा, शाश्वतता.’’



युधिष्ठिराने विचारले
, ‘‘माणसाने कशाचा ध्यास धरावा?’’ भीष्म म्हणाले, ‘‘या जगात सर्वात जास्त भय मृत्यूचे. तो अचानकच झडप घालतो, म्हणून जे तुम्ही उद्या करायचं ठरवलं आहे, ते आजच करा. ऐन उमेदीत तुम्ही सद्गुणांचे आचरण ठेवा. त्यांच्यामुळेच लोक तुम्हाला नावाजतील. अनेक इच्छा-आसक्ती यांचे जाळे फक्त सत्यच तोडू शकते. क्षणभंगुरतेचा साक्षात्कार व्हायला हवा. एकाच देहात ‘मृत्यू’ व ‘अमरत्व’ ही दोन्ही बिजे असतात. यातले कोणते वाढवायचे, ते तुम्ही ठरवायचे. आसक्तीचे दुसरे नाव मृत्यू! जो शहाणा असतो, तो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवतो. सुख व दु:ख जो समान समजतो, त्यालाच शांती लाभते व अमरत्व मिळते. सत्य हे ज्ञानाच्या नेत्रांनी दिसते. सत्य हे एक तप आहे. आसक्ती हे सर्वात मोठे दु:ख तर त्याग हाच सर्वश्रेष्ठ आनंद.’’



युधिष्ठिर म्हणाला
, ‘‘कोणता माणूस सर्वांना प्रिय असतो?’’ ‘‘जो विद्वान आहे, सौजन्यशील आहे, पवित्र आहे, ज्याला गर्व नाही, असमाधान व क्रोध नाही आणि ज्याने आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवला आहे, असा माणूस सर्व प्रिय असतो.’’ युधिष्ठिराने विचारले, ‘‘माणूस पापी कसा होतो? सदाचरणी कसा व त्याला मोक्ष केव्हा मिळतो? भीष्म म्हणाले, ‘‘वासना हेच सर्व पापांचे मूळ आहे. इंद्रियसुखाच्या सार्‍या गोष्टी वासनेला हव्या असतात. त्यातूनच आसक्ती निर्माण होते. मग लोभ व चुकीचे निर्णय ही फळे मिळताताच. वासनेमुळे मन भरकटते व गोंधळून जाते. माणूस सदाचरण सोडून वागू लागतो. मात्र असा माणूस आपण सदाचरणीच आहोत, याचे नाटक करू लागतो. हितचिंतक व वडीलधार्‍या माणसांचा सल्ला नाकारून पाप करू लागतो. अशा पापी माणसाला मोक्ष मिळत नाही.’’



‘‘सदाचरणी माणूस सर्वांच्या हितासाठी दक्ष असतो. त्यातून त्यालाही सुखाची प्राप्ती होते. तो मार्गातले अडथळे, आसक्ती, इंद्रिय सुखे टाळू शकतो. त्याचं आपल्या इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण असतं. म्हणून त्याला लोक ‘सद्गुणी’ म्हणतात. परंतु, असा सद्गुणी माणूससुद्धा असमाधानी असतो, जोवर तो संन्यास घेत नाही, तोवर त्याला मन:शांती लाभत नाही. त्यासाठी मोक्षाची साधना करणे आवश्यक आहे.’’ युधिष्ठिराने विचारले, ‘‘पितामह आसक्तीचा त्याग करून मोक्ष प्राप्त करण्यासाठी कोणते गुण अंगी असावे लागतात?’’ भीष्माचार्य म्हणाले, ‘‘मोक्षाची साधना ज्याला साध्य झालीय, तो इंद्रिय सुखाच्या पलीकडे गेलेेला असतो. त्याच्यावर भूक, तहान वा कोणत्याही शारीरिक अवस्थांचा अंमल चालत नाही. त्याला बांबूची झोपडी व राजप्रासाद यात फरक वाटत नाही. तो सुखदु:खापासून दूरच असतो. सुख व दुःख या कल्पना भ्रामक आहेत, असेच त्याला वाटते. तो नफा, तोटा, जय-विजय सारे समान असतात, असा विचार करतो. या पृथ्वीवर सर्व काही नश्वरच आहे, हे त्याला पक्के माहिती असते. असा माणूस मोक्षपदाला पात्र असतो. मग तो घरात राहो वा वनात राहो.’’



युधिष्ठिर म्हणाला
, ‘‘माझा गोंधळ होतो आहे, घरात राहणारा माणूस कसा मोक्ष मिळवू शकेल?’’ भीष्म म्हणाले, ‘‘राजाने मोक्ष मिळविण्यासाठी राजपद सोडायची मुळीच गरज नाही. आवश्यकता आहे ती आसक्ती सोडण्याची. तुमची संगत, सभोवताल कसाही असो, ध्यास मात्र मोक्षाचाच असावा!’’ युधिष्ठिर म्हणाला, ‘‘समृद्धीची देवता कुठे असते?’’ भीष्म म्हणाले, ‘‘ज्याला वक्तृत्व येते, जो कार्यशील आहे, कर्तव्यदक्ष आहे, असा माणूस म्हणजेच समृद्धीचे घर! तो क्रोधापासून मुक्त असतो. तो वासनांवर विजय मिळवतो. मोठ्या मनाचा असतो. समृद्धी क्षीण माणसाला, चैतन्यहीन, रागीट व आत्मविश्वास नसलेल्या माणसाला झिडकारते.’’ युधिष्ठिर म्हणाला, ‘‘या लोकांत व परलोकी सुख मिळविण्यासाठी कोणते गुण अंगी असावे?’’ भीष्म म्हणाले, ‘‘इतर प्राण्यांच्या जीवाचा नाश न करणे, जे इतरांचे आहे, ते चोरी न करणे, व्यभिचार न करणे, हेच गुण इहलोकी व परलोकी सुख मिळवून देतात.’’युधिष्ठिराने विचारले,’’ब्रह्मचर्याचे पालन याहूनही मोठी गोष्ट कोणती?’’भीष्म म्हणाले, ‘‘मांसाहार व मद्यपान यांच्यापासून दूर राहणे, हे ब्रह्मचर्याहूनही श्रेष्ठ आहे. सदाचरण हाच सर्वश्रेष्ठ गुण आहे.’’ युधिष्ठिराने विचारले, ‘‘धर्म, अर्थ व काम या पुरुषार्थांचे आचरण केव्हा करावे?’’



भीष्म म्हणाले
, ‘‘आयुष्याच्या प्रथम भागात अर्थप्राप्ती करावी, दुसरा क्रमांक धर्माचरणाचा व तिसरा सुखोपभोगांचा. परंतु या तीन गोष्टी म्हणजेच जीवनाचे सार, असे मानू नये. शेवटी मोक्ष हेच आपले अंतिम उद्दिष्ट ठेवावे.’’ युधिष्ठिराने विचारले, ‘‘ सर्वात शुद्ध तीर्थ कोणते?’’ भीष्म म्हणाले, ‘‘मानवाला शुद्ध करण्याची शक्ती सर्वच तीर्थांमध्ये आहे, पण शेवटी सत्य हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे.’’ युधिष्ठिर म्हणाला, ‘‘माणसाचा खरा मित्र कोण? पिता, माता, पुत्र, गुुरू की सोबती? परलोकातही जो सोबत करेल, असा मित्र कोण?’’ भीष्म म्हणाले,’’माणूस एकटाच येतो व एकटा मरण पावतो. तू ज्या ज्या व्यक्तीचा उल्लेख केला, ते सारे तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला सोडून जातात व आपापल्या कामाला लागतात. तुमचा मागे उरलेला मृतदेहपण कोणालाच नको असतो. तुमच्यासोबत येते, ते फक्त तुमचे सदाचरण! म्हणून सदाचरण हाच तुमचा खरा मित्र!’’



युधिष्ठिर म्हणाला
, ‘‘ज्याचे नाव घेता येईल असा खरा देव कोणता? कोणाची उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते? सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? कोणता मंत्र म्हटल्यास जन्म-मृत्यूच्या बंधनातून माणूस मुक्त होतो? भीष्म म्हणाले,’’ या विश्वाचा देव श्रीकृष्ण. तो देवांचाही देव आहे. त्याने सर्व विश्व व्यापून टाकले आहे. कृष्णाचे व त्याच्या अनेक नावांचे स्मरण केले म्हणजे दु:खापासून मुक्ती मिळते. सर्वश्रेष्ठ धर्म कृष्ण हाच. कृष्ण हे सर्वश्रेष्ठ चैतन्य, सर्वश्रेष्ठ तप व सर्वश्रेष्ठ आधार! त्याच्याहून पवित्र कुणीच नाही. तोच सर्वांचा आरंभ व सर्वांचा अंतही आहे. तो शाश्वत ब्रह्म आहे. भूत, वर्तमान व भविष्य यांचा स्वामी कृष्णच आहे, जो परमात्मा आहे. अशा या कृष्णालाच तू शरण जा व त्याच्याशी एकरूप हो.’’ अशा रितीने भीष्मांचे ज्ञानदान पूर्ण झाले. ते म्हणाले, ‘‘वत्सा, जे जे काही शिकण्यासारखे होते, ते मी तुला सांगितले, शिकवले. आता तू परत जा व राज्यकारभार करायला आरंभ कर, जसे हरिश्चंद्र आणि ययाती यांच्या राज्यात लोक सुखी होते, तसेच तुझ्या राज्यात होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत. उत्तरायणाला सुरुवात झाली की, मला पुन्हा भेटण्यासाठी ये.’’ युधिष्ठिराने भीष्माचा भावपूर्ण निरोप घेतला व सारे पांडव हस्तिनापुरात परत आले.




- सुरेश कुळकर्णी
@@AUTHORINFO_V1@@