राज्य सरकारची कर्जमाफी फसवी : विरोधी पक्षनेते

    25-Feb-2020
Total Views |

vidhimandal_1  




मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपने शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला घेरले आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला.



शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार हे सरकारने सांगावे
, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाने शेतकरी कर्जमाफी व महिलांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी घोषणाबाजी भाजपाकडून करण्यात आली. विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळातच सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली.




यापूर्वी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी
देखील सरकारची यादी फसवी असल्याचा आरोप केला होता. सरकारने शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांमधील अनेकांची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी कर्जमाफीबद्दल आम्ही सरकारला विचारणा केली. त्यानंतर सोमवारी सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ही आकडेवारी फसवी आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे. ठाकरे सरकारकडून वचनपूर्वी झालेली नाही. सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही दरेकर म्हणाले.