साहित्यिक सावरकर - स्वा. सावरकर : कृतज्ञता स्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Veer Savarkar _1 &nb
 
 


दि. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी आत्मार्पण करुन जगाचा निरोप घेतला. सावरकर म्हणजे प्रखर तेज, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीची जाज्वल्य प्रतिमा! त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते देशभक्त, समाजसुधारक, उत्तम वक्ता, उच्च कोटीचे साहित्यिक होते. त्यांच्या गुणकौशल्यावर स्वतंत्र संशोधन व्हावे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 


सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त म्हणून परिचित आहेतच
, शिवाय ते प्रगल्भ साहित्यिकसुद्धा होते. अगदी शब्दांपासून ते कथा, लेख, ग्रंथ, कविता, पोवाडे, आरत्या आणि नाटकं एवढी प्रचंड साहित्यसंपदा त्यांनी बहाल केली. सावरकरांची प्रत्येक कविता, फटका, आरती ही मनाला भिडते. कारण, ती त्या प्रसंगाला अनुसरून असते.अगदी उदाहरण घ्यायचे झाले तर चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकर भारावले होते तेव्हा त्यांनी चापेकर बंधू आणि रानडे यांच्यावर 'फटका' लिहिला. क्रांतिवीर दामोदर हे फाशी जाताना त्या प्रसंगाचे सावरकरांनी केलेले वर्णन-

 

"दामोदर फाशी जात नव्हता, तर जणू लग्नाला चालला होता. न्यायाधीश हा लग्न लावणारा जोशी होता. त्याने पहाटेचा मुहूर्त काढला होता. सत्य, देशहित हे वर्‍हाड जमले होते. कीर्ती व नीती या वर्‍हाडीनी होत्या. लोकमान्य टिळक हे गणपती. त्यांना नमन केले. फाशीचा कट्टा हेच बोहले होते. दामोदराने गीता मंत्र स्मरले व मुक्ती (मरण) या नवरीला माळ घातली. पण अरेरे! ती नवरी मायावी होती. तिने वर कुठे पळविला? सारे वर्‍हाड कुठे हरपले? अंगाला कापरे सुटले."

 

करुणरसाने ओसंडणारे हे काव्य डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकर छत्रपतींच्या प्रतिमेची नियमित पूजा व आरती करत.

 

जयदेव जयदेव जय जय शिवराया ।

या या अनन्य शरणा आर्या ताराया ॥

 

त्यानंतर १९०३ साली त्यांनी भारतमातेवर एक अजरामर स्तोत्र रचले,

 

जयोऽस्तुते जयोऽस्तुते...

श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे ।

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे ॥

 

तिकडे इंग्लंडमध्ये असताना निरंजन पाल व सावरकर एकदा ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर फिरण्यास गेले. तिथे सागराकडे बघून त्यांना मातृभूमीची तीव्र आठवण आली. त्यांच्या मातृभूमीबद्दलच्या भावना दाटून आल्या व त्या भावना सागराशी एवढ्या एकरूप झाल्या आणि त्या भावमंथनातून मराठी भाषेला एक अद्भूत कवितारत्न मिळाले.


ने मजसी ने परत मातृभूमीला ।

सागरा प्राण तळमळला ।


तद्नंतर क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्थान म्हणून ठरलेला ग्रंथ म्हणजे '१८५७ चे स्वातंत्र्यसमर.' १८५७च्या युद्धाचा स्मृतिदिन सावरकरांनी १९०७ साली इंग्लंड येथे साजरा केला. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, १८५७ चे युद्ध हे बंड नसून ते एक 'स्वातंत्र्यसमर' आहे आणि त्याचा इतिहास लिहावा म्हणून त्यांनी सुमारे दीड वर्षांच्या अथांग प्रयत्नातून आणि जवळपास १५०० संदर्भांच्या आधारे वयाच्या फक्त २४व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला. पुढे या ग्रंथाने जो इतिहास घडवला तो वेगळाच...

 

ग्रीकांचा पराभव करणारा चंद्रगुप्त, त्यांचा धुव्वा उडविणारा पुष्यमित्र शुंग, शकांना धूळ चारणारा विक्रमादित्य, शकांचा पूर्ण नि:पात करणारा यशोवर्मन तसेच दिल्लीच्या तख्ताला हादरे देणारे भाऊसाहेब पेशवे व भारतीय इतिहासात इंग्रजांना पिटाळून लावून या भारतमातेला स्वतंत्र करणार्‍या राष्ट्रवीरांवर सावरकरांनी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने.' सावरकरांनी स्पृश्य-अस्पृश्य ही प्रथा मोडीत काढली आणि त्यास छेद देत त्यांनी 'संगीत उ:शाप' हे नाटक लिहिले. एवढ्या वरच न थांबता, त्यांनी सदर नाटकाची तिकिटे अस्पृश्यांना मोफत दिली. याचा प्रभाव पुढे एवढा झाला की नाट्यगृहातील अस्पृश्यता नाहीशी झाली.

 

सावरकरांना त्यांच्या लिखाणापासून कोणीही वंचित ठेवू शकलं नाही. मग तिथे दस्तूरखुद्द इंग्रज का असेना... त्यांचे लिखाण तर अंदमानच्या भिंतीसुद्धा बंदिस्त करू शकल्या नाही. इतकेच काय तर सावरकरांच्या लिखाणाने तेथील भिंतींनी स्वतःला गोंदून घेऊन सावरकरांना म्हणावं, "हे विनायका, माझा एक हात (म्हणजे एक भिंत) तू लिहिलेल्या 'फटक्या'नेगोंदला आहे. आता दुसरा हात तू एखाद्या कवितेने भरून टाक बरे." इतके साजरे होते ते सगळे. सावरकरांनी मराठी भाषा समृद्धीसाठी खूप प्रयत्न केले आणि मराठी भाषेला काही शब्द दिले. उदादाखल त्यापैकी काही- अर्थसंकल्प (बजेट), उपस्थित (हजर), क्रमांक (नंबर), क्रीडांगण (ग्राऊंड), गणसंख्या (कोरम), गतिमान, चित्रपट (सिनेमा), झरणी (फाऊंटनपेन), टपाल (पोस्ट), तारण (मॉटर्गेज), त्वर्य/त्वरित (अर्जंट), दिग्दर्शक (डायरेक्टर), दिनांक (तारीख)विश्वस्त (ट्रस्टी), वेतन (पगार), वेशभूषा (कॉश्युम), शस्त्रसंधी (सीझ फायर), शिरगणती (खानेसुमारी), शुल्क (फी), संचलन (परेड), सार्वमत (प्लेबिसाइट), सेवानिवृत्त (रिटायर), स्तंभ (कॉलम), हुतात्मा (शहीद) इ. बरं फक्त मराठी भाषेवरच सावरकरांचे प्रभुत्व होते असे नव्हते, तर उर्दू भाषेचासुद्धा त्यांचा उत्तम अभ्यास होता.

 

'काळ्या पाण्याची' शिक्षा भोगत असताना तर त्यांनी चक्क उर्दू गझल लिहिल्या होत्या. जुलै २०१३ मध्ये त्या सापडल्या. पुढे शंकर महादेवन यांनी त्या संगीतबद्ध करून अमिताभ बच्चन यांच्या आवाजात प्रकाशित करण्यात आल्या. सावरकरांचे साहित्य म्हणजे एक अनमोल भेटच. मग ते फक्त मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता हिंदी आणि इंग्रजीमध्येसुद्धा अनुवादित करण्यात आले आहे. सावरकर हे एकमेवद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते आणि त्यातीलच एक पैलू म्हणजे 'साहित्यिक!' असा साहित्यिक आता न होणे...

- तन्मय महाजन

@@AUTHORINFO_V1@@