नकळत मनात डोकावताना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
human pyschology_1 &

सार्‍यांना आपला इतका का राग येतो? त्यांना आपण का आवडत नाहीत? ते आपल्याला का धिक्कारतात? याचा खूप उहापोह करतो, पण लक्षात ठेवायला पाहिजे की, आपल्यासमोर एखादी गाडी चिखलातून निघून जाते तेव्हा चिखल तिच्याजवळ असणार्‍यावर उडतो. तिच्यापासून दूर असलेल्या लोकांवर नाही. साहजिकच आपण त्या ठिकाणी असलेल्या चिखलाला दोष देऊ शकत नाही. शिवाय त्या गाडी चालविणार्‍या ड्रायव्हरला एक-दोन शिव्याशाप देण्यापलीकडे फार काही करू शकत नाही. कारण, ना दोष तसा त्या कारचा ना तिच्या ड्रायव्हरचा. याचा अर्थ थोडासा दोष नकळत का होईना आपल्याकडेच जातो. तसेच काहीसे सामान्यत: माणसाच्या आयुष्यात घडत असते. कधी जाणूनबुजून तर कधी अजाणताआपण ‘आ बैल मुझे मार’ असा काहीसा पवित्रा घेत असतो. या ना त्या कारणांनी आपणही लोकांना आपल्या विरोधात जाण्यास भाग पाडतो. किंबहुना त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना आपला तिरस्कार करायला लावतात त्या तशा खूप करमणुकीच्या तरी आहेत किंवा बिघडवणार्‍यासुद्धा आहेत.


बर्‍याच वेळा आपल्याला लोकांच्या ‘गुडवील’ची इतकी सवय होते की ती आपली गरज बनून जाते. त्यासाठी आपण आपल्या अनेक गुणांची वा कृतीची त्यांच्यावर छाप टाकण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. आजच्या व्यावसायिक जगात सगळ्यात मोठा बिझनेस आहे तो म्हणजे, दुसर्‍यावर प्रभाव टाकण्याचा. यात प्रचंड चढाओढ आहे. आपण कोणापेक्षा किती पायर्‍या वर चढून जातो, त्याहीपेक्षा कोणाला किती खाली खेचतो हे जास्त महत्त्वाचे आहे. या सगळ्या उपद्व्यापात आपण आपले शत्रू मात्र निर्माण करतो. हा तसे पाहिले तर एखाद्या व्यक्तीच्या असुरक्षित आणि अस्थिर मनाचा परिपाक आहे. ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ अशी अभिव्यक्ती आहे. यातूनच आपण माणसातील नैसर्गिक अशा चांगुलपणालाच चक्क तिलांजली देतो. आजच्या डिजिटल युगात तर काय सगळेच सोपे... एक बटण दाबायचे काय ते कष्ट घ्यावे लागतात. मग काय आपण हव्या-हव्या त्यापेक्षा नको नको त्या गोष्टी सोशल मीडियावर टाकत राहतो. पूर्वी डिजिटल सोशल मीडिया नव्हते, पण अनेक सोशल ग्रुप होते. मंडळे होती व क्लब होते. म्हणजे आजही आहेत. अशा ठिकाणी आपण मित्रमंडळींना स्वतःच्यासहलीबद्दल, खरेदीबद्दल, हॉटेलिंगबद्दल असे काही भंडावून सोडायचो की काही विचारुच नका. आजतर आपण इतके फोटो टाकतो. मग ते कुटुंबाचे असो वा मित्रमंडळींचे असो. यामुळे बर्‍याच जणांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. त्यांना कंटाळवाणे वाटते. काही तर या व्यक्ती आपलीच स्तुतिसुमने गात आहेत, हे जाणूनच व्यथित होतात व आपोआप दूर होतात. अनेक वेळा आपण जेमतेम झालेल्या थोड्याशा ओळखीतलोकांना आपली इत्थंभूत माहिती देतो. त्यात खरे तर लोकांना फारसा ‘इंटरेस्ट’ नसतो. पण कधी त्यामुळे लोक कंटाळतातसुद्धा. यात आपण आपल्या सामाजिक भानाची जाणीव ठेवत नाही. त्यामुळे ओळख तशी दृढ झाली नाही, मैत्री अजून गाढ झाली नाही, अशावेळी उगाचच आपण आपलीच गाणी गात बसू नये. थोडी दुसर्‍यांनी गायलेलीसुद्धा ऐकावीत. काही वेळा आपण दुसर्‍यांची माहिती ऐकत असतो. आपल्याबद्दल दुसर्‍यांना काही कळू देत नाही. असा लोकांच्या मनात या मैत्रीबद्दलच संशय उभा राहतो. ती मंडळी आतल्या गाठीची असावीत. असा कयास बांधून लोक त्यांच्यात गुंतायला बघत नाहीत. किंबहुना त्यांच्यापासून दूरच पळतात.


आपल्याला लोकांशी जुळवून घ्यायचं असेल किंवा त्यांनी आपल्याला आवडून घ्यावं, अशी आपली इच्छा असेल तर भावनांची पारदर्शकता महत्त्वाची आहे. स्वतःचे विचार व भावना व्यक्त करणार्‍या व्यक्ती लोकांना नक्कीच आवडत नाही. परस्पर देवघेव करणे वा एखाद्याच्या भावनांना वा विचारांना प्रतिसाद देणार्‍या व्यक्ती लोकांना आवडतात. आपल्या भावना दुसर्‍यांपासून लपविणार्‍या व्यक्तींपासून लोक थोडे दूरच पळतात.


काही लोकांचा असा होरा असतो की, आपण खूप दयाळू वा सौहार्दपूर्ण वागलो की, इतर लोकांना जिंकू शकतो, तसे चांगुलपणाचा आभास घेऊन वावरणारे अनेक आहेत या जगात. ते कदाचित खरेच चांगले असू शकतील किंवा त्यांच्या चांगुलपणाचे काही अदृश्य कारण असू शकेल. पण, अशा व्यक्तींशी कुणाला जोडून घ्यायला आवडत नाही. त्यांच्या नात्यात कुठेतरी एक न दिसणारी दरी जाणवते.


माणसं स्वार्थी असतील, दुष्ट असतील, हिटलरच्या घराण्यातली असतील तर ती जवळजवळ सगळ्यांनाच आवडत नाहीत. पण तथापि आपल्यातल्या काही उणिवा वा काही चुका भरून काढता येऊ शकतात. आपण इतरांना का आवडत नाही, याची कारणमीमांसा चांगल्या माणसांनी अधूनमधून करून पाहावी. शेवटी माणसाचे माणूसपण जितके नैसर्गिक आहे, तितकीच त्यात नवनिर्मितीही आहे.
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@