एकतर्फी लक्षणांचे आजार (भाग ३)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
homeopathy_1  H


एकतर्फी लक्षणांच्या आजारांचे उपचार करत असताना चिकित्सकाला फार काळजी घ्यावी लागते. कारण, बर्‍याच वेळा ‘सम’ असे औषध न मिळता ‘अंशत: संलग्न’ असे औषध दिले जाण्याचा संभव असतो. अशामुळे आजाराचे दमन होऊ शकते, पण आजार बरा होत नाही. एकतर्फी लक्षणांचे आजार शरीरावर पूर्णपणे दृश्य होत नसल्यामुळे बरे होण्यास कठीण असतात व त्यांना बरे होण्यास खूप कालावधी लागतो.


अशा आजारांवर उपचारकरताना बहुतांश वेळा ‘अंशत: संलग्न’ औषधेच घ्यावी लागतात. कारण, आजाराचे चित्र स्पष्ट नसते. एकदा का ही औषधे दिली गेली की मग ही औषधे शरीरावरपरिणाम करून आणखीन काही नवीन लक्षणे निर्माण करत असतात. समचिकित्सेच्या तत्त्वावरून दिल्या गेलेल्या या औषधांमुळे जी नवीन लक्षणे येतात ती शरीराने औषधाला दिलेल्या वैयक्तिक प्रतिक्रियेमुळे येत असल्या कारणाने उपयुक्त ठरतात. ही लक्षणे प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अशा संवेदनशीलतेनुसार देत असल्या कारणाने ही लक्षणेसुद्धा विशेष असतात. म्हणून या नवीन आणि विशेष लक्षणांना मूळ आजाराच्या लक्षणांबरोबर जोडले असता रोगाचे अर्धवट व एकतर्फी असणारे चित्र पूर्ण होण्यास मदत होते. म्हणून ही लक्षणे रोगाची लक्षणे असल्याप्रमाणे धरली जातात.


म्हणजेच काय तर इतर वेळी घातक ठरणारी ‘अंशत: संलग्न’ (partially indicated remedy) औषधे ही एकतर्फी लक्षणांच्या आजारात मात्र महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता चिकित्सकाने पुढील टप्प्यात जाऊन काम करायचे असते, ज्याने हे आजार बरे होण्यास मदत होते.


आता तयार झालेल्या या नवीन लक्षणांच्या समूहाला उपचार देण्यासाठी चिकित्सक त्या रुग्णाची पुन्हा नव्याने चिकित्सा करतात (case taking).सर्वप्रथम उपलब्ध लक्षणांवरून जे औषध दिले जाते ते मुद्दामच अतिशय कमी शक्तीचे दिले जाते. त्यामुळे जी नवीन लक्षणे तयार होत असतात, ती घातक नसतात व उपचाराला सोपी असतात. आता आजाराचीपूर्वीची लक्षणे व औषधाने तयार झालेली लक्षणे जोडून एक नवीन लक्षणांचा जो समूह तयार होतो, त्या लक्षणांना अनुसरूनच एक दुसरे नवीन होमियोपॅथीक औषध शोधले जाते.


जुनी अवगत असलेली आजाराची लक्षणे + औषधाने तयार केलेली लक्षणे = नवीन लक्षणांचा समूह



‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथातील १८३/१ या परिच्छेदात हॅनेमान सांगतात की, काही आजारात जे मुख्यत्वे अचानक उद्भवणारे (Acute disease)असतात. त्यात बर्‍याचदा अतिशय कमी लक्षणे दिसून येतात व ही कमी लक्षणे मुख्यत्वे करून शरीराच्या मज्जासंस्थेच्या नसांच्या बधिरत्वामुळे दिसून येतात. या बधिरपणामुळे लक्षणे नीट दिसून येत नाही. अशावेळी ही बधिरता जाण्यासाठी ‘ओपियम’ ‘सदृश्य संलग्न’ व ‘सम’ असे औषध देऊन ती स्थिती बरी करावी लागते व त्यानंतर नवीन लक्षणांच्या अनुसार नवीन औषध निवडावे लागते. अशाच प्रकारे नवीन लक्षणांना बरे करत करत या एकतर्फी लक्षणांच्या आजारांवर उपचार करावा लागतो.
क्रमश:


- डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@