सुप्रजा भाग – २७ : आहार सेवनाचे नियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
supraja_1  H x




तान्हुलं जेव्हा रांगू लागतं, आधाराशिवाय बसू लागतं, आधार घेऊन उभं राहतं तेव्हा म्हणजे साधारण सहा ते आठव्या महिन्यात दुधाखेरिज अन्य आहार देण्यास सुरुवात करावी. ‘अन्न’ म्हटले म्हणजे लगेच घन आहार नाही, तर दुधापेक्षा दाट द्रवाहार या स्वरुपात सुरू करावे. यासाठी सर्वात प्रथम भाताची पेज देण्यास सुरुवात करावी.


भाताची पेज जुना तांदूळ, हातसडीचा असल्यास अधिक उत्तम. याला कुठलेही रसायन लावलेले नसावे (जसे डीडीटी पावडर इ.) हा तांदूळ हलका धुवून घ्यावा आणि पातेल्यामध्ये शिजविण्यास ठेवावा. तांदळापेक्षा चारपट पाणी घालून ते शिजवावे. मध्ये मध्ये ढवळावे. त्यावरती जो द्रवपदार्थ तयार होतो, तो पळीने काढून घ्यावा. त्यात थोडं लोणकढं साजूक तूप घालावे आणि किंचित सैंधव घालून बाळाला पाजावे. सुरुवातीस या पेजेत भाताचे शीत अजिबात नसावे. नवीन अन्नपदार्थ खायला देण्यास सुरुवात करतेवेळी ते दिवसा द्यावे. रात्री देऊ नये. भाताची पेज वर सांगितल्याप्रमाणे आधी द्यावी. रोज सलग चार-पाच दिवस दुपारच्या वेळेस याच पद्धतीने तयार करून द्यावी. ताजी पेज भरवावी. सकाळी तयार करून संध्याकाळी देऊ नये. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यातून अन्न शिजवू नये. कल्हई केलेल्या पितळ्याच्या पातेल्यात अन्न शिजवावे. असे भांडे उपलब्धनसल्यास स्टीलच्या जाड बुडाच्या भांड्यात शिजवावे. पण ‘टॅप्लॉन कोटिंग’ तत्सम केमिकल कोटिंग असणारी भांडी वापरू नये. कुकरमध्ये भात शिजवून त्यात राहिलेले पाणी पेज म्हणून पाजू नये. कुकरमध्ये अन्न शिजविल्यास ते पचायला जड असते.


साधी भाताची पेज पचू लागल्यावर मग त्यात कधी थोडं हिंग, कधी तूप-जिर्‍याची फोडणी, कधी लिंबाचा रस घालून, कधी मेतकूट घालून द्यावी. पेजेत काही नवीन जिन्नस घातल्यास तो पदार्थ तसाच पाच-सात दिवस द्यावा. असे केल्याने बाळाला त्याची चव लागते. त्याचे शरीर ते अन्न पचविण्यास सक्षम होते, पण एखादा बदल सोसला नाही तर बाळाचे पोट दुखू लागते. पोट कडक होते. शौचास घट्ट होते. आमांश पडल्यासारखा आंबूस वास येतो. असे झाल्यास पेजेतील तो घटक थोडे दिवस थांबवावा. तीन-चार आठवड्यांनी पुन्हा द्यावा.


भाताची पेज पचायला लागल्यास त्यात थोडी मुगाची डाळ घालावी. एखाद्या फळभाजीचा तुकडा भातात शिजताना घालावा. असे केल्याने मुगातील/भाजीतील सत्त्व भाताच्या पेजेत उतरते. ते खाण्यास उत्तम. लाल भोपळा, दुधी भोपळा, फरस बी, पालकाचे पान, सुरण, तोंडली, फ्लॉवर इ. चे छोटे काप करावे. एका वेळेस एका भाजीचा प्रकार या पद्धतीने खाण्यास द्यावे. हळूहळू एकाऐवजी दोन भाज्या, मग तीन असे क्रमाक्रमाने प्रमाणवाढवता येईल. जेव्हा डाळ अणि भात देणार असाल तेव्हा चवीला फक्त तूप आणि मीठ घालावे, अन्य काही घालू नये.


अशा पद्धतीने भाताची पेज पचू लागली की डाळीचे पाणी, भाज्यांचे सूप इ. सुरू करावे. फक्त दुधावर वाढत्या वयात अवलंबून राहू नये. वरील पद्धतीने हळूहळूएक-एक आहारघटक समाविष्ट करावा. पाच-सहा आठवडे आरामात उलटतात. दात सहाव्या-सातव्या महिन्यात येऊ लागतात. हिरडी कडक होते. हिरडी शिवशिवते तेव्हा हिरड्यांना मध लावावा. प्लास्टिकचे टिथर चावायला न देता गाजर, मुळा इ. द्यावे, पण मोठ्या व्यक्तीच्या देखरेखी खेरीज नाही. मोठ्यांच्या हातात खारीक द्यावी. ती त्या बाळाने चावावी. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात. जसजसे दात येऊ लागतील, तसतसे रात्रीचे स्तन्यपान थांबवावे. झोपेत प्यायलेले दूध तोंडात साठते आणि दात येतानाच किडलेले येतात. जसे स्तन्यपान देऊ नये, तसेच बाहेरचे दूधही बाटलीने झोपताना पाजू नये. लहानपणापासून साखरेचा वापर कमी ठेवावा. जिथे जिथे शक्य होईल, तिथे तिथे साखरेऐवजी गूळ घालावा. गोडाची सवय लहानपणी लावू नये तसेच, तिखटाचीही सवय लहानपणी लावू नये. तिखटही लहानपणी जास्त देऊ नये. एकदा आतड्यांमध्ये अतितिखटाने (stomach and small intestine) जखम झाली, तर आयुष्यभर त्याचा त्रास सोसावा लागतो. लहानपणी मिरचीऐवजी काळी मिरी, सुंठ, आलं किंवा ओवा वापरावा. वरील सर्व पदार्थ तिखट आणि पाचकही आहेत, म्हणजेच अन्न पचण्यासही मदत करतात.


फलाहार - प्रत्येक फळाची चव भिन्न भिन्न असते, काही फळे रसाळ असतात, तर काहींमध्ये गर(Pulp) अधिक असतो. काही गोड असतात, काही आंबट, तर काही आंबट-गोड! फळांचा एक नियम सर्वांनी (मोठ्या-छोट्यांनी) लक्षात ठेवावा, फळं जी सालीसह खाऊ शकतो, ती सालीसह खावीत. फळांचा चोथाही खावा, फक्त रस/ज्यूस घेऊ नये. फळांवर मीठ-मिरचीपूड पेरून, चाट मसाला लावून खाऊ नये. चिरल्या चिरल्या ताजी खावीत. फ्रिजमध्ये ठेवून गार करून खाऊ नयेत. एका वेळेस एकच प्रकारचे फळ खावे. ‘फ्रूट प्लेट’सारखे विविध प्रकार एकदम खाऊ नये आणि दुधात फळ घालून (मिल्कशेक) कधीच खाऊ नये. या वरील नियमांचे शास्त्रीय कारणही आहे. फळातील सालीमध्ये आतील गरापेक्षा (जसे सफरचंद, चिकू, पेरू इ.) अधिक सत्त्व असते. ते टाकून देऊ नये. फळाचा रस पचायला जड असतो. पण तो लगद्यासकट खाल्ला, तर शौचास साफ होण्यास मदत होते. फळं स्वाभाविकतः गोड असतात. त्यावर मीठ-तिखट घातल्याने त्यांच्या विपरीत गुणांमुळे त्रास होऊ शकतो. मिल्कशेकमध्ये दूध (सहसा कच्चे) घातले जाते. हे मिश्रण पचायला अत्यंत जड होते. आयुर्वेदशास्त्रानुसार मिल्कशेकचा अतिरेक झाल्यास विविध विकृती उद्भवतात. त्यामुळे अशी पेये घेणे टाळावे.


हल्ली काही फळांवर कीटकनाशकांचा थर दिसतो. विशेषतः सफरचंद, द्राक्ष इ. आणि ते पोटात जाऊन अपाय होईल, या भीतीमुळे त्याचे साल काढले जाते. सफरचंद अधिक काळ टिकावे, टवटवीत दिसावे म्हणून त्यावर मेणाचा थर लावला जातो. ही सर्व रसायने पोटात जाणे योग्य नाही. यावर उपाय म्हणजे पाणी गरम करावे आणि ही फळं गरम पाण्यात तीन-चार मिनिटे बुडवून ठेवावीत. वरील थर वितळून निघून जातो. मग ते फळ सालासकट खाल्ल्यास अपाय होणार नाही. फळे मध्ये भूक लागते तेव्हा खावीत. म्हणजेच सकाळी 11 नंतर आणि सायंकाळी 6च्या आधी. जेवणानंतर फ्रूट प्लेट, फ्रूट सॅलड, फ्रूट ज्यूस, मिल्कशेक घेऊ नये. फळं उपाशीपोटी खावी, भरल्यापोटी नाही. लहान मुलांनाही वरील नियमांप्रमाणे फळे द्यावीत. कुठलेही फळ दिल्यावर नवीन फळ आठवड्याभरानंतर समाविष्ट करावे. फळांचा लगदा करून थोडा थोडा भरवावा. सफरचंद किसून दिले तरी चालेल. पुढील लेखात अन्य आहारातील नियम जाणून घेऊया...
(क्रमशः)


- वैद्य कीर्ती देव
@@AUTHORINFO_V1@@