शरद पवार यांचीही साक्ष होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

sharad pawar _1 &nbs


कोरेगाव भीमा-प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी हजर रहावे लागणार



पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरणातील हिंसाचाराची विशेष चौकशी पथक (एसआयटी)स्थापन करून चौकशी करण्याची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात आता साक्षीसाठी शरद पवार यांना बोलावण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने याबाबत सोमवारी महत्वाचा निर्णय घेतला. या प्रकरणाचे अर्जदार आणि ‘विवेक विचार मंच’चे सागर शिंदे तसेच त्यांचे वकील अॅड. प्रदीप गावडे यांनी ही माहिती ‘दै. मुंबई तरुण भारत’ला सोमवारी दिली. या प्रकरणात पवारांकडे असलेली अतिरिक्त माहिती चौकशी आयोगाला मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत शिंदे यांनी याबाबत रीतसर विनंती अर्ज केला होता. कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या दंगलीनंतर ‘एल्गार परिषद’ आणि शहरी नक्षलवादासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते.



या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच या आयोगासमोर शरद पवार यांनी याबाबत एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषदेत पवारांनी केलेल्या वक्तव्याची दखल ‘विवेक विचार मंचा’चे सागर शिंदे यांनी घेतली होती. पवारांकडील अतिरिक्त माहिती चौकशी आयोगाला मिळाली पाहिजे व त्याकरिता शरद पवारांच्या नावे समन्स काढण्यात यावेत, असा विनंती अर्ज चौकशी आयोगाला देण्यात आला होता. या अर्जाची दखल घेत चौकशी आयोगाने या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनीही साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे.



आयोगाचं चौकशीचं वेळापत्रक ठरलेलं नसलं, तरी शरद पवार यांना लवकरच साक्षीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. कारण चौकशी आयोगाला अल्पमुदतवाढ मिळाली आहे. केवळ तीन महिन्यांच्या मुदतवाढीपैकी आयोगाचा एक महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचं कामकाज होऊ शकतं. शरद पवार यांची साक्ष पुण्यात होणार असल्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये ही सुनावणी होईल. मोठा काळ ही सुनावणी चालेल. याच दरम्यान शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी आगामी काही दिवसांमध्येच आयोगाकडून शरद पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येईल.
@@AUTHORINFO_V1@@