२६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रस्तावाचे स्मरण हवेच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020   
Total Views |



vichar_1  H x W


जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगाला ठणकावून सांगणारा एक प्रस्ताव संसदेने २२ फेब्रुवारी, १९९४ रोजी केला होता, हे किती जणांच्या स्मरणात आहे? तीन दिवसांपूर्वी त्या घटनेस २६ वर्षे पूर्ण झाली. तो प्रस्ताव संमत झाला तेव्हा देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते.


जम्मू
-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे अनेकदा स्पष्टपणे सांगण्यात आले असतानाही पाकिस्तान या मुद्द्यावरून जागतिक पातळीवर कागाळ्या करीत आहे. त्यास बळी पडून किंवा आपले हितसंबंध जपण्यासाठी काही देश मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवित आहेत. पण त्या सर्वांना, काश्मीरप्रश्नी नाक न खुपसण्याचा सल्ला भारताने स्पष्टपणे दिला आहे. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतर केल्यानंतर काहींच्या भुवया उंचावल्या. पण आमच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे भारताकडून त्यांना ठणकावून सांगण्यात आले. आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. कालच्या सोमवारपासून काश्मीरमधील विद्यालये सुरू झाली आहेत. तेथील राजकीय वातावरण सुरळीत करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश आले की, तेथे राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू होतील.



जम्मू
-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सर्व जगाला ठणकावून सांगणारा एक प्रस्ताव संसदेने २२ फेब्रुवारी, १९९४ या दिवशी केला होता, हे किती जणांच्या स्मरणात आहे? तीन दिवसांपूर्वी त्या घटनेस २६ वर्षे पूर्ण झाली. तो प्रस्ताव संमत झाला तेव्हा देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते. या प्रस्तावामध्ये, संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला होता. सदर प्रस्ताव संमत करून काश्मीरच्या विलीनीकरणावर भारतीय संसदेने पुन्हा शिक्कामोर्तब केले होते. या प्रस्तावाचा दुसरा स्पष्ट अर्थ म्हणजे पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरही भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पाकिस्तानच्या लक्षात आणून देण्यात आले. त्या भागात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे जे उद्योग पाकिस्तानकडून केले जात होते, ते थांबविण्याचा इशारा या प्रस्तावात देण्यात आला होता.



अमेरिकेचे काही वरिष्ठ अधिकारी १९९३ मध्ये भारतभेटीवर आले होते
. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानची तळी उचलणारी भाषा बोलण्यास प्रारंभ केला होता. पण या संदर्भात पी. व्ही. नरसिंह राव यांनी बघ्याची भूमिका घेतली नाही. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा भाग असल्याचा प्रस्ताव त्यांनी संसदेत एकमताने संमत केला. संसदेने संमत केलेल्या त्या प्रस्तावामध्ये, जम्मू-काश्मीर हा सध्या आणि पुढेही भारताचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच देशापासून त्या भागास वेगळे करण्याचे प्रयत्न सर्व शक्तीनिशी हाणून पाडण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. भारताचे ऐक्य, सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय एकात्मता यांना धक्का लावण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची क्षमता आणि मनोबल भारताकडे असल्याचा उल्लेख त्या प्रस्तावामध्ये करण्यात आला होता.त्याच प्रस्तावामध्ये, जम्मू-काशीरचा जो भूभाग पाकिस्तानने आक्रमण करून आपल्या ताब्यात ठेवला आहे, तो पाकिस्तानने त्वरित मुक्त करावा, असे म्हटले होते. तसेच भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे सर्व प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडले जातील, असेही म्हटले होते.



काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत करण्यात आलेल्या या प्रस्तावाचा खरे म्हणजे कोणालाही विसर पडायला नको
. पण दुर्दैवाने काही आपमतलबी पक्षांना याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. काही राजकीय पक्षांना जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याची कृती अयोग्य वाटत आहे! जम्मू-काश्मीरच्या घटनेच्या प्रस्तावनेतही, संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. संयुक्त राष्ट्रांमध्येही भारताने आपली ही बाजू व्ही. के. कृष्ण मेनन यांच्याद्वारे ठामपणे मांडली होती. १९६३ मध्ये पाकिस्तानने आपल्या ताब्यातील काही भूभाग चीनला देण्याच्या कृतीस भारताने आक्षेप घेतला होता.



जम्मू
-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताकडून सातत्याने सांगण्यात येत असतानाही पाकिस्तान त्या भागावरील आपला अधिकार सोडत नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी पार्लमेंटने ९ फेब्रुवारी, १९९० रोजी एक ठराव संमत करून काश्मीरसंदर्भातील भारताचा दावा खोडून काढला होता. या संदर्भात संयुक्त राष्ट्राने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पाकिस्तानने केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत जो प्रस्ताव संमत झाला, त्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानने केवळ जम्मू-काश्मीरचा भाग ताब्यात ठेवलेला नाही, तर लडाखचा काही भागही गिळंकृत केला आहे. तसेच काही भाग चीनला आंदण देऊन टाकला आहे. हे सर्व लक्षात घेता आपला हा सर्व भूभाग मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा संसदेने एकमताने संमत केलेला प्रस्ताव लक्षात घेऊन त्या दिशेने पावले टाकायला हवीत. त्यावर देशातील सर्वांचे मतैक्य राहायलाच हवे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर, पाकिस्तानव्याप्त लडाख आणि चीनव्याप्त लडाख हा सर्व भूभाग भारताचाच असून तो आपण मिळवायलाच हवा.



पण आपल्या देशातील काही राजकारण्यांना पाकिस्तानची बाजू घेतल्याशिवाय राहवत नसल्याचे दिसून आले आहे
. त्यामध्ये काँग्रेस पक्षातील मणिशंकर अय्यर यांच्यापासून अनेक नेत्यांचा समावेश आहे. अन्य काही नेतेही काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे. हे महाशय काँग्रेसच्या वळचणीला गेल्यापासून त्या पक्षाचीच भाषा बोलताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी लाहोरमध्ये पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरिफ अल्वी यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यावर त्या दोघांनी चर्चा केली म्हणे! इथपर्यंत ठीक होते. पण त्यापुढे शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या सुरात सूर मिसळून आपली लायकी दाखवून दिली. काश्मीरमध्ये गेल्या २०० दिवसांपासून जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी जी चिंता व्यक्त केली, त्याची री या महाशयांनी ओढली. खरे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना तिथल्या तेथे ठणकावयास हवे होत. काश्मीर हा भारताचा भूभाग असल्याने त्या विषयावर त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याचा त्यांनी तीव्र निषेध करायला हवा होता. त्या वक्तव्याबद्दल दौरा रद्द करून ते मायदेशी परतले असते तर सर्व देशवासीयांनी त्यांचे कौतुक केले असते. पण पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या मताशी त्यांनी जी सहमती दर्शविली आहे, त्यामुळे या अभिनेत्याची छी थू झाली आहे! शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे अनेक महाभाग आपल्या देशामध्ये आहेत. त्या सर्वांना, भारतीय संसदेने २२ फेब्रुवारी १९९४ या दिवशी केलेल्या प्रस्तावाचे स्मरण करून द्यायला हवे. ते करून दिल्यास त्यांच्या तोंडी पाकिस्तानसारखी भाषा येणार नाही. २६ वर्षांपूर्वी संसदेने संमत केलेला प्रस्ताव सर्वांनीच पक्का लक्षात ठेवायला हवा!

@@AUTHORINFO_V1@@