माकड-निलगाय हल्लातील जखमींनाही आर्थिक भरपाई; वन विभागाचा आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |

tiger_1  H x W:

 

 
१० लाख ते २० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - माकड आणि निलगायीच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला १० लाख रुपये आणि जखमींना ५ लाख ते २० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय वन विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यांमुळे मनुष्य हानी किंवा पशुधनाचा मृत्यू झाल्यास दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याच्या योजनेमध्ये या दोन प्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जंगलानजीकच्या शहरी आणि ग्रामीण भागात या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे बाधित होणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे.
 
 
 
 
वाघ,बिबट्या, अस्वल,गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती आणि रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मृत वा जखमी होणाऱ्या व्यक्तीस वन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेमध्ये आता माकड/वानर आणि निलगायीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार मृत व्यक्तीच्या वारसाला १० लाख आणि जखमींना ५ लाख ते २० हजारांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माकड आणि निलगायींच्या हल्ल्यात मनुष्य मृत, अपंग आणि जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, यासंबंधीच्या घटनांसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक भरपाईच्या योजनेत माकड आणि निलगायीचा समावेश नव्हता. अशा घटनांवेळी हल्ला झालेल्या व्यक्तीच्या वा त्याच्या वारसाच्या मनात वन्यजीवांप्रती असंतोष राहतो. त्यामुळे जनतेमध्ये वन विभागासंबंधी नकारात्मक निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
 
 
 
 
वास्तविक पाहता माकड / वानर आणि निलगायींचा वावर हा इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य वस्तीनजीक अधिक असतो. या दोन प्राण्यांनी मनुष्यावर हल्ला करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केल्याचा घटना वारंवार समोर येतात. यापूर्वी या दोन प्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास आर्थिक भारपाई देण्याची तरतूद होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्यजीव हल्ल्याच्या अर्थसहाय्य योजनेमध्ये या दोन प्राण्यांचा समावेश करण्याची मागणी होत होती. ही मागणी आता मान्य झाली आहे. यापूर्वी इतर वन्यजीवांबाबत अर्थसहाय्याचे जे धोरण ठरविण्यात आले आहे, त्यानुसार निलगाय व माकडाच्या हल्ल्यात मृत, अपंग, गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
 
जंगलानजीकच्या शहरी आणि ग्रामीण भागात माकड आणि निलगायींनी मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा परिस्थितीत पूर्वीच्या योजनेमध्ये या प्राण्यांमुळे होणाऱ्या हल्ल्यात आर्थिक भरपाई देण्याची तरतुद नव्हती. मात्र, नव्या निर्णयामुळे हल्ला होणाऱ्या व्यक्तीला दिलासा तर मिळणारच आहे. शिवाय त्यामुळे जखमी व्यक्तीच्या मनात वन्यजीव आणि वन विभागाप्रती नकारात्मक भावना राहणार नसल्याची माहिती ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.
 
 
 
 
मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास दिले जाणारे अर्थ सहाय्य :
 
व्यक्ती मृत झाल्यास - १०,००,०००/- (रु. दहा लाख फक्त)
व्यक्ती कायम अपंग झाल्यास - ५,००,०००/- (रु. पाच लाख फक्त)
व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास - १,२५,०००/- (रु. एक लाख पंचवीस हजार फक्त)
व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास - औषधोपचारासाठी येणारा खर्च . मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा २०,००० रुपये (रु. वीस हजार फक्त) व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.
 
 
शेतीचे नुकसान झाल्यास :
नुकसान रु.२०००/- पर्यंत झाल्यास - पूर्ण परंतु किमान रु.५००/-
नुकसान रु.२,००१/- ते १०,०००/- पर्यंत झाल्यास - रु.२०००/- अधिक त्यापेक्षा जास्तीच्या नुकसानीच्या ५०% रक्कम (रु.६,०००/- चे कमाल मर्यादेत)
नुकसान रु.१०,०००/- पेक्षा जास्त झाल्यास - रु.६०००/- अधिक रुपये १०,०००/- पेक्षा जास्त नुकसानीच्या ३०% रक्कम (रुपये १५,०००/- चे कमाल मर्यादेत)
 ऊस - रु.४०० प्रति मे. टन
 
 
हत्ती व रानगवे यांनी फळबागांच्या केलेल्या नुकसानीबाबत भरपाई पुढीलप्रमाणे आहे.
फळझाडे - नारळ -   रु.२,०००/- प्रति झाड
सुपारी -  रु.१,२००/- प्रति झाड
कलमी आंबा -  रु.१,६००/- प्रति झाड
केळी -  रु.४८/- प्रति झाड
इतर फळझाडे - रु.२००/- प्रति झाड
@@AUTHORINFO_V1@@