कंपन्यांची कर्मचारीकेंद्रित ध्येय-धोरणे आणि परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |


management_1  H


उद्योग-व्यवसाय कुठलाही असो, केवळ मोठ्या भांडवलाच्या जोरावर उद्दिष्टपूर्ती शक्य नाही. कुशल मानवी भांडवलाचाही आधार आणि पाठबळ व्यवसायवृद्धीसाठी तितकेच आवश्यक ठरते. म्हणूनच कंपन्यांनी कर्मचारीकेंद्रित ध्येय-धोरणांचा व्यवस्थापनात प्रकर्षाने अवलंब केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम ठळकपणे दिसून येतात.


परंपरागत स्वरुपात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारची ध्येय-धोरणे असतात. यामध्ये प्रामुख्याने भर असे तो कायदेशीर वा सरकारी पातळीवरील तरतुदींचे पालन, कंपनी वा उद्योग स्तरावर काही फायदे वा सुविधा उपलब्ध करून देणे, संघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या संघटनेची ताकद वा भूमिका यानुरूप पगारवाढ देणे इत्यादी. औद्योगिक क्षेत्रात 'उद्योग व परिसर' क्षेत्रात प्रचलित कर्मचारी धोरणे आणि सोयी-सुविधांचा अवलंब करण्याचा पायंडा पडला आणि त्यामुळे या मुद्द्याचा उपयोग पण 'मार्गदर्शक तत्त्व' म्हणून कंपनी व्यवस्थापन पाळू लागले, हा या संदर्भातील प्रचलित इतिहास आहे. मात्र, उद्योग क्षेत्रातील बदलते वातावरण व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजा-अपेक्षा, उद्योग-व्यवसायांच्या बदलत्या गरजा, वाढते शहरीकरण, वाहनांची गर्दी व कर्मचाऱ्यांना करावयाचा दररोजचा प्रवास, त्यासाठी लागणारा वेळ व होणारी शारीरिक दगदग यावर तोडगा म्हणून विविध कंपन्या कर्मचारी ध्येय-धोरणे केवळ लवचिकच ठेवत नाहीत, तर कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा-गरजांनुसार आपली धोरणे आखतात, असे प्रकर्षाने जाणवते. बदलते वातावरण आणि परिस्थितीनुरूप आज असे आढळून येते की, वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक व वयोमानानुरूप बदलत्या गरजांचाही सकारात्मक स्वरूपात विचार करून प्रतिसाद देत आहेत. उदाहरणार्थ - रिटेल क्षेत्रातील प्रमुख अशा बंगळुरूच्या एका कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तान्ह्या व लहान मुलांसह कंपनी बसमधून प्रवास करण्याची सोय स्वत:हून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कंपनीतील अशा गरजू महिला कर्मचाऱ्यांना आपल्या लहान मुलांना पाळणाघर वा शाळेत सोडून नंतर कंपनीच्याच बसने पुढे जाणे सहज शक्य झाले आहे. बंगळुरूसारख्या शहरातील प्रवासाचे अंतर व वाहतुकीमधील जटिलता या बाबी लक्षात घेता कंपनीच्या या विशेष सवलतीने महिला कर्मचाऱ्यांची गैरसोयकिती मोठ्या प्रमाणावर कमी झाली असेल, याची सहजगत्या कल्पना येते.

 

कर्मचाऱ्यांचे सतत पाळ्यांमध्ये काम करणे, रात्रपाळी करणे, कामाचे वाढीव तास व त्यामुळे येणारा मानसिक तणाव, शारीरिक व मानसिक ताण, खाण्याच्या बदलत्या वेळा व पद्धती या बाबी बऱ्याच कंपन्यांमध्ये अटळ असल्यातरी त्यावर कर्मचाऱ्यांना 'मार्गदर्शक उपक्रम' म्हणून काही कंपन्यांनी कामाच्या ठिकाणीच सल्ला मार्गदर्शक केंद्राची सुरुवात केली आहे. या मार्गदर्शक केंद्रांमध्ये गरजू कर्मचाऱ्यांसाठी आहारतज्ज्ञ, डॉक्टर्स, व्यायामतज्ज्ञ, योग-प्रशिक्षक आदींची व्यवस्था कंपनीतर्फे करण्यात येते व लक्षणीय संख्येने कर्मचारी या सोयीचे लाभान्वित होत असतात. याशिवाय काही कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांवर असणारा तणाव, त्यांचे भावनिक-मानसिक पैलू यावरसुद्धा काळजीपूर्वक विचार आणि कृती करताना दिसतात. उदाहरणार्थ - 'टार्गेट इंडिया' कंपनीच्या व्यवस्थापनाने या संदर्भात आपल्या विशेष धोरणात्मक निर्णयाद्वारे कर्मचाऱ्यांना सल्ला-मार्गदर्शनासाठी वैद्यकशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंतच्या विविध विषय तज्ज्ञांचे नियोजन केले आहे. याशिवाय कंपनीने कर्मचारी-व्यवस्थापकांच्या तणाव व्यवस्थापनावरही विशेष भर दिला आहे व त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत'जेनपॅक्ट' कंपनीने प्रसुती रजेहून परत आलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांना त्यांच्या सोईनुसार कामाची पाळी, कामाचे तास याची निवड करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. याशिवाय कंपनीने विशेषत: प्रथमच मातृत्वाचा अनुभव घेण्याऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाद्वारे कंपनीतील महिला कर्मचारी आपलेव बाळाचे आरोग्य आणि मातृत्वविषयक विविध मुद्द्यांवर आदानप्रदान व शंकानिरसन करीत असतात. सद्यस्थितीत व विशेषत: 'हम दो' स्वरूपाच्या कुटुंब पद्धतीत हा उपक्रम अनेकांसाठी फायदेशीर ठरला आहे. स्वीडनच्या 'आयकेईए' या रिटेल कंपनीने काही वर्षांपूर्वीच कंपनीतील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी प्रसुती रजा व बालसंगोपन रजा सुरू केली आहे. या रजेच्या योजनेंतर्गत कंपनीतील सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांच्या बाळाची लहानपणी निगा राखण्यासाठी सहा महिन्यांची विशेष पगारी रजा देण्याची तरतूद करण्यात आली, हे विशेष. याशिवाय कंपनीत कामाच्या ठिकाणी बाल संगोपन केंद्राची व्यवस्था आहेच. 'इरिक्वन' या दूरसंचार उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीनंतर सध्या प्रचलित अशा २६ आठवड्यांच्या प्रसुती रजेशिवाय आणखी दोन महिन्यांची विशेष पगारी रजा नव्यानेच मिळू लागली आहे. याशिवाय कंपनीतील सर्वच कंपन्यांना त्यांच्या वैयक्तिक-कौटुंबिक गरजांपोटी वर्षातील तीन महिनेकालावधीसाठी संपूर्णपणे लवचिक कामाच्या तासांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या धोरणामागचा मूळ आणि मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या गरजेच्या वेळी व्यवस्थापनातर्फे त्यांना आवश्यक व शक्य अशा प्रकारचे सहकार्य देणे हा असल्याचे व्यवस्थापनातर्फे नमूद करण्यात आले आहे.

 

कामाचे तास आणि वेळांना कर्मचाऱ्यांच्या गरजानुरूप लवचिकतेच्या सवलतींच्या जोडीलाच लवचिक वेतन-पगारमान देण्याची सुरुवातही काही व्यवस्थापनांनी केली आहे. यासंदर्भात पुढाकार घेत 'एसएपी इंडिया'चे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या इच्छेनुसार लवचिक वेतनमान देण्यास सुरुवात केली आहे. या लवचिक वेतनमान योजनेनुसार कंपनीतील सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांना लागू असणाऱ्या वेतन, आर्थिक फायदे व संबंधित सोयी यांची त्यांच्या गरजा आणि प्रासंगिक गरजांनुसार निवड करता येते व त्याचे आर्थिक करविषयक व वैयक्तिक कौटुंबिक फायदे या साऱ्यांचा फायदा होत असतो. 'मेरिको' कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या रजा त्यांच्या गरजा व सोईनुसार घेता येऊ शकतात. त्यानुसार आथा 'मेरिको' कर्मचारी प्रसंगी दोन-दोन दिवसांची रजा हव्या तेवढ्या प्रमाणात घेऊ शकतात. कंपनीच्या या नव्या व प्रगत धोरणामुळे कर्मचाऱ्यांची तर मोठी सोय झालीच, त्याशिवाय कर्मचारी तुलनेने मर्यादित वा किमान दिवसांची रजा त्यांच्या गरजांनुरूप घेत असल्यामुळे कर्मचारी आणि कंपनी या उभयतांच्या कामावर कसलाही विपरीत परिणाम होत नाही, हे विशेष. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गरजा-अपेक्षा, बदलते वातावरण, वाढते शहरीकरण, प्रवासाचे अंतर या साऱ्यांचा समतोल विचार करण्यावर आज कंपनी व्यवस्थापन विशेष भर देते. यासाठी आज कंपन्या स्वतःच्या पुढाकारासह व प्रगतशीलपणे केवळ विचारच करतात असे नव्हे, तर आपल्या अशा विचारांना कृतिशील अंमलबजावणीची साथ देतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुरूप असणारे हे चित्र कंपनी-कर्मचारी या उभयतांसाठी पण मोठे आशादायी ठरले आहे.

 

- दत्तात्रय आंबुलकर

 
@@AUTHORINFO_V1@@