सरसावली नारी शक्ती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2020   
Total Views |

singapore cycle campaign


सध्या जागतिक पातळीवर सिंगापूर सायकल कॅम्पेन राबविले जात आहे. या कॅम्पेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सबकुछ महिला असे हे कॅम्पेन आहे. ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धानासाठी नारी शक्ती सरसावल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.


आधुनिक काळात जगात उद्योग-व्यवसायांची वाढ होत असताना प्रदूषणाच्या समस्यादेखील डोके वर काढू लागल्या आहेत. वातावरणात वाढणारे कार्बनचे प्रमाण हे चिंताजनक असून याबाबत जगातील देश पुढाकार घेत कार्य करत आहेत. मात्र, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे, यासाठी जागतिक पातळीवर प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती व्यापक जनजागृतीची आणि थेट संवादाची. आपल्याच देशातील नागरिक किंवा संघटना आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात, तेव्हा त्याचे महत्व हे आपणास कमी जाणवते. मात्र, जेव्हा परदेशस्थ नागरिक याबाबत जनजागृतीचा वसा हाती घेतात, तेव्हा प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येऊ लागते. सध्या जागतिक पातळीवर सिंगापूर सायकल कॅम्पेन राबविले जात आहे. या कॅम्पेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सबकुछ महिला असे हे कॅम्पेन आहे. ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धानासाठी नारी शक्ती सरसावल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.



विशेष म्हणजे या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील माहेरवाशीण असलेल्या वंदना भावसार यादेखील सहभागी झाल्या आहेत. संपूर्ण महिलांचा सहभाग असलेली ही महिलांसाठीचीच सायकल कॅम्पेन आहे. या कॅम्पेनला दि.३० जानेवारीपासून थायलंडची राजधानी बँकॉक येथून प्रारंभ झाला. बँकॉक, मलेशिया व सिंगापूर अशा तीन देशांचा प्रवास सहभागी महिला सायकलवरून करत पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. जवळपास २०२० किलोमीटरचा प्रवास करत त्या आपला संदेश जगाला देणार आहेत. ही मोहीम दि. ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी अशा तीस दिवसांत पार पडेल. भावसार यांच्याबरोबरच या मोहिमेत भारतातून बडोद्याच्या अजिता बाबुराज व पिनल पार्लेकर या महिलादेखील सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे भारताची नारी शक्ती या निमित्ताने जागतिक स्तरावर कार्बनचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सक्रिय सहभाग नोंदविताना आपल्याला दिसणार आहे.



पर्यावरणरक्षणासाठी सायकलला प्राधान्य द्यावे, सायकल चालविल्याने आरोग्यदेखील सुदृढ राहण्यास मदत होते, या आशयाचा संदेश या मोहिमेत सहभागी महिला यावेळी देणार आहेत. या मोहिमेत सहभागी महिला दररोज सुमारे ६० ते ७० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर सायकल चालविणार आहेत. कुठल्याही स्वरूपातील पुरुषांचा सहभाग घेणे, या मोहिमेत प्रतिबंधित करण्यात आले आहे. सायकलची निगा राखणे, देखभाल करणे, दुरुस्ती करणे आदी सर्व कामे महिलांनाच करावी लागणार आहेत. सायकलस्वार महिलांनाच दिशादर्शनाचे काम करावे लागणार आहे. या मोहिमेसाठी ड्युअल स्पोर्ट्स वन ही विशिष्ट प्रकारची सायकल वापरली जाणार असून ही सायकल रस्त्यावर व डोंगराळ भागातदेखील सहज रीतीने चालू शकते व चालवणार्याच्या दृष्टीने आरामदायी अशी सायकल आहे.



वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरणाचा भीषण प्रश्न संपूर्ण जगात उभा ठाकला आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने व सायकल वापराच्या चळवळीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही सायकल मोहीम पथदर्शकाची भूमिका बजावत आहे. कुठल्याही स्वरूपात कार्बनचे उत्सर्जन न करणे, हे ध्येय घेऊन ही मोहीम राबविली जात आहे. ‘सायकल फॉर ग्रीन अर्थ’ हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून तिन्ही देशांतील नागरिकांना दिला जाणार आहे. तसेच, मोहिमेत सहभागी महिला प्रत्येक दिवशी त्या-त्या देशातील महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सहभागी महिलांच्या माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरण, तसेच जगभरातील महिलांची एकी वृद्धिंगत करणे यासारखी विविध स्वरूपाची कार्ये केली जाणार आहेत. दैनंदिन जीवनात आणि घरातील कामातदेखील जेव्हा महिलांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जातो, तेव्हा त्या कार्यास निश्चितच गती मिळते. कार्बनचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी तसेच जागतिक स्तरावर महिला सबलीकरणकामी महिलांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. आगामी काळात पर्यावरण संवर्धनासाठी हे प्रयत्न निश्चितच दिशादर्शक ठरतील, हीच अपेक्षा.
@@AUTHORINFO_V1@@