...आणि एक निरागस कळी खुलली !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
Child-girl_1  H
 
“ठाण्यात एका दत्तक मुलीला तिची आई खूप त्रास देतेय, तिला मारतेय, चावतेय, तिला आपल्याला सोडवायला हवंय. प्रियाताईने आज बराच पाठपुरावा केला, पण यश येत नाही. आपण काही मदत करू शकतो का?” आलेला हुंदका दाबत असं एका दमात शीतलताईने सांगितले. मूल दत्तक जरी घेतलेले असले तरी त्याच्याशी इतके निष्ठुरपणे कसे वागता येईल, याचा विचार करतच मी आरतीताईंना यात काही करू शकतो, अशा आशयाचा मेसेज पाठवला.
 
 
ही घटना अशी होती, एका मुलीला मथुरेतील एका संस्थेने ठाण्यातील एका कुटुंबास दत्तक दिले होते. पण या घरी तिचा छळ होत होता. ही आई चावण्यासारखी शारीरिक शिक्षा करत होती. शेजारील मंडळी, शाळा-शिकवणीमधील मंडळी हळहळत होती. पण, एखाद्याच्या कौटुंबिक गोष्टीत कसे नाक खुपसायचे असे म्हणत कानाडोळा करीत होती. कुठून तरी ते प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई जाधव यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी मुळापर्यंत जाऊन शहानिशा केली व मग पोलिसात तक्रार केली. पण अपेक्षित सहकार्य मिळेना, मग सहज बोलताना त्यांच्याकडून शीतलताईंना आणि त्यांच्याकडून मला ही बाब समजली.
 
 
या घटनेमध्ये मदत करू शकतील अशा व्यक्तींना मी ही घटना कळवली. आरतीताई नेमाणे यांना ही घटना कळवली. मग, दुसर्याल दिवशी आरतीताई आणि प्रियाताई या दोघींनी त्या मुलीसाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडले. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलीची वैद्यकीय चाचणी वगैरे तर केली, पण तिचा ताबा पालकांकडेच ठेवला. हे कोणालाच पटले नव्हते, पण उशिरापर्यंत प्रयत्न करूनही काही साध्य न झाल्याने दुसर्या दिवशी अजून धडपड करूया असे ठरले. दरम्यान, या दोघींनी हा विषय बालहक्क आयोग व पोलीस उपायुक्त यांच्यापर्यंत पोहोचवला होता.
 
 
वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली आणि भराभर चक्रे फिरली. रात्री उशिरा पोलीस ठाण्यातून प्रियाताईंना फोन गेला अन त्यांना तक्रार दाखल करण्यास व मुलीचा ताबा घेण्यासाठी बोलावले. त्याही मध्यरात्री भांडुपहून धावतपळत पोहोचल्या. रात्री पोलिसांनी घरी जाऊन मुलीचा ताबा घेतला व तिला तात्पुरत्या निवार्या मध्ये ठेवले. मग सकाळी बालहक्क न्यायालयाने तिचा, तिच्या आई-वडिलांचा, शाळा-शिकवणीमधील शिक्षकांचा जबाब घेतला. तिची वैद्यकीय चाचणी करून मग तिला एखाद्या संस्थेकडे सोपवले जाईल, असा आदेश दिला.
 
 
प्रियाताई व आरतीताई यांनी केलेल्या धावपळीला यश मिळाले होते. आता मुलीची काळजी वाटत नव्हती. बालहक्क समितीकडे आणल्यावर मुलीने प्रियाताईला जशा पद्धतीने मिठी मारली, ती पाहता तिला खरेच खूप त्रास होत होता आणि आता ती आनंदी आहे, याची खात्री होत होती. रात्री-अपरात्रीसुद्धा ओळखपाळख नसणार्याआ मुलीला वाचवण्यासाठी धडपडणार्या, प्रिया, आरतीताई व त्यांना मदत करणारी शीतलताई यांच्यामुळे कोमेजून जाऊ पाहणारी एक निरागस कळी खुलली...
 
 
- अभय जगताप
9869176858
@@AUTHORINFO_V1@@