संविधानाचा वारसदार झाले पाहिजे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020   
Total Views |
Dr-Prabhakar-Pawar_1 
 

अत्यंज गावाकुसाबाहेरच्या वस्तीचे वारसदार डॉ. प्रभाकर पवार आज शिक्षणक्षेत्रातले सिद्धहस्त झाले आहेत. 'संविधान आपले आहे, देश आपला आहे' असे सांगत समाजाला संविधानयुक्त जगणे ते शिकवत आहेत.
 
वंचितांचे दु:ख अश्वत्थाम्याच्या जखमेसारखे असते का? कधीच न विरणारे? असे वाटत असतानाच प्रभाकर म्हणाले, "मी जरी असा गावकुसाबाहेरच्या वस्त्यांचा वारसदार असलो तरीसुद्धा आता मात्र वारसदार मी आहे बुद्धाच्या पंचशिलाचा माणूस या जातीचा बाबासाहेबांच्या संविधानाचा..." 
 
 
संविधानाचे वारसदार असणारे डॉ. प्रभाकर पवार हे सध्या फलटणच्या मुधोजी महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत. तसेच ते श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेडचे (फलटण) संचालक असून मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळ शिवाजी विद्यापीठाचे ते सदस्य आहेत. त्यांनी 'केशव मेश्राम यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास' या विषयामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील चर्चासत्रांमध्ये त्यांना सन्मानीय अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. आजपर्यंत त्यांनी १२५ शोधनिबंध लिहिले असून त्यापैकी ३५ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

पवार कुटुंब मूळ वडी गाव, खटाव तालुका सातार्यालचे. रामचंद्र पवार आणि यशोदाबाई यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक प्रभाकर. रामचंद्र हे गवंडी काम करायचे. मजुरी करायचे. अहोरात्र कष्ट करायचे. मात्र, तरीही दोन वेळची भाकरी मिळाली की पुरे, असे वातावरण. या वातावरणात प्रभाकर मोठे होत होते. पावसाळ्याच्या दिवसात तर कित्येकदा रामचंद्र यांना कामच मिळत नसे. मग अख्खे कुटुंब तीन-चार दिवस पाणी पिऊन, शिळे भाकरीचे तुकडे शिजवून जगायचे.
 
 
पण, या गरिबीच्या दिवसातही रामचंद्र आणि यशोदा यांनी मुलांना स्वाभिमान शिकवला. भाकरतुकड्यासाठी लोकांच्या दारात जायचे नाही, असे सांगितले. त्यात यशोदाबाईंचे वडील हे मुंबईचे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून काम करायचे. यशोदाबाई लहान असताना अनेकदा त्यांच्या वडिलांसोबत बाबासाहेबांना जवळून भेटलेल्या. लग्न झाल्यावर सातार्यायला आल्यावरही त्यांना या गोष्टीचा अभिमान होता. त्या प्रभाकर यांना सांगत, "सोच्छ राहायचं, स्वाभिमानानं जगायचं, बाबांनं संघर्ष केला, आता आपण इथपावतोर आलोय, तर चांगल्या कामात यश मिळवायचं. त्यासाठी शिकायला पाईजे. बाबासाहेब जी थोरली मोठी बुकं वाचीत, ती तुला वाचता आली पाईजे."
 
 
गरिबीचे चटके असह्य होते, पण आईचे हे विचार प्रभाकरना बळ देत. बाबासाहेबांसारखे शिकायला हवे, हा एकच ध्यास त्यांनी घेतला. धड अन्न नाही, कपडे नाही, स्वत:चे नवे कोरे पुस्तक, वही असणे म्हणजे सोन्या-चांदीची मालकी मिळाली असे वाटावे, अशी परिस्थिती. पण, शेळ्या-मेंढ्यांना चरायला नेणे, तेथूनच घरी चूल पेटवण्यासाठी लाकूडफाट्याची मोळी करून आणणे अशी कामं करत. ही कामे करूनही ते दहावीला शाळेत पहिले आले. त्यांनी ठरवले, आपण विज्ञान शाखेत जायचे. पण, आर्थिक परिस्थितीमुळे कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. त्यावेळी कित्येक महिने ते शेताच्या बांधांवर रडत बसत की कला शाखेत मनाविरूद्ध काय शिकू? एकेदिवशी वस्तीतल्याच एका कीर्तनकारबुवांनी नेमके हे पाहिले. प्रभाकरना त्यांनी विचारले, "का रे रडत बसतोस?" प्रभाकर म्हणाले, "मला विज्ञान शाखेत शिकायचे होते. आता कला शाखेत जाऊन काय करू?" त्यावर बुवा म्हणाले, "का रे आपले बाबासाहेब काय विज्ञान शाखेतून शिकले होते का? गांधी बाबा विज्ञान शाखेतून शिकले होते का? जा पळ, रडू नकोस."
 
 
बुवांच्या बोलण्याने प्रभाकर यांची मरगळ निघून गेली. बारावीलाही ते त्यांच्या महाविद्यालयात पहिले आले. ते शिकत होते. मात्र, घरची परिस्थिती बदलत नव्हती. शेळ्या-मेंढ्या हाकणे, त्यांच्या लेंड्या गोळा करणे, लाकडाच्या मोळ्या बनवणे यात खंड नव्हता. त्यांच्या सोबतचे विद्यार्थी याबाबत त्यांना म्हणत, "का रे असली कामे करतो?" यावर प्रभाकर यांच्याकडे उत्तर नसे. ते मनात म्हणत, "काहीच नसल्यावर जगण्यासाठी काहीतरी करावं लागतं बाबांनो." या दिवसामध्ये प्रभाकर यांची शिकण्याची उमेद कायम राखण्यासाठी मदत केली ती काही अध्यापकांनी. गरीब घरचा हुशार विद्यार्थी जिद्दीने शिकतो आहे म्हणून तिथे रघुनाथ केंगार या प्राध्यापकांनी, चन्ने सरांनी प्रभाकर यांना नेहमीच शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले, सहकार्य केले. तसेच आईवडील आणि भावानेही प्रभाकर यांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. पुढे एम.एची परीक्षा देतानाच मग प्रभाकर यांनी 'नेट'ची परीक्षा दिली. प्रभाकर यांच्या भाषेत 'नेटची परीक्षा दिली आणि आयुष्य 'नेट' झाले.' तोपर्यंत प्रभाकर यांच्याकडे एकच शर्ट आणि पॅन्ट होती. 'नेट' झाल्यावर नोकरी लागली आणि प्रभाकर यांनी आयुष्यात नवे कोरे दुसरे कपडे घेतले.
 
 
मात्र, हे करताना त्यांनी ठरवले की, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करायची. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झालेल्या पाच हुशार, गरजू मुलांना ते तीन वर्षांसाठी दत्तक घेतात. त्यांच्या शिक्षणाचा आणि एकंदर सर्वच खर्च ते करतात. आतापर्यंत ६५ विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी घेतले आहे. प्रभाकर म्हणतात, "शिक्षणासोबत संस्कारही हवेत. समाजातल्या मुलांनी त्रिशरण, पंचशील जगायला हवे." त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी संस्कार पाठ सुरू केले आहेत. या पाठामध्ये ते दया-करुणा, शांती आणि सम्यक मार्गाचा तथागतांचा धम्म सांगतात. 'मी पहिला भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे,' ही बाबासाहेबांची शिकवण सांगतात. संविधान देशाचा आत्मा आहे आणि देशाची एकात्मता हा संविधानाचा आत्मा आहे, हे शिकवतात. प्रभाकर म्हणतात, "शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी आहेत. पण, नुसते 'ते असे म्हणाले' 'तसे म्हणाले' असे म्हणत दंगा करत राहिलो तर स्वत:चे आणि समाजाचेही नुकसान आहे. या महापुरुषांचे विचार जगले पाहिजे. संविधानाचे वारसदार झाले पाहिजे."
 
@@AUTHORINFO_V1@@