म्हणे, तपासामुळे गेले तापसदा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020   
Total Views |


tapas pal_1  H

 


ज्येष्ठ बंगाली अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस पाल यांचा १८ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ६१व्या वर्षी मृत्यू झाला. मुलीकडे आलेले तापसदा मुंबईहून कोलकात्याला परतताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना जुहूच्या रुग्णालयातही दाखल केले, पण त्यांची प्राणज्योत मालवली. तृणमूल काँग्रेसचे खासदार, आमदार, नेते राहिलेल्या तापसदांच्या निधनाचे पक्षप्रमुख म्हणून ममता बॅनर्जी यांना दु:ख होणं म्हणा अगदी स्वाभाविक. पण, ममतादीदींनी तापसदांच्या मृत्यूचेही राजकीय भांडवल लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दीदींनी तापसदांच्या मृत्यूसाठी चक्क केंद्रीय तपास यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात खेचण्याचा दुर्देवी प्रकार केला. ममतांकडून अजून अपेक्षा तरी काय म्हणा, ज्या ममता सीबीआयच्या पथकाला कोलकात्यात डांबू शकतात, त्या भाजपवर दोषारोपण करण्यासाठी कुठल्याही थराला गेल्या तरी त्याचे नवल वाटायला नकोच! तापसदा बंगाली आणि टॉलीवूडच्या सिनेसृष्टीतील एक मोठं नाव. बॉलीवूडमध्येही तापसदांनी करिअर आजमावून पाहिलं, पण ते अयशस्वी ठरले. त्यांची पत्नी, मुलगीही याच सोनेरी दुनियेच्या तारका. 'नेम-फेम अन् पैसा' असं सर्व काही अगदी पायाशी लोळणं घेत असताना तापसदांना राजनीती खुणावू लागली. कम्युनिस्टांविरुद्ध दंड थोपटून उतरलेल्या ममतांच्या पक्षाची ते पायरी चढले. आमदार, खासदार अशी पक्षात त्यांना बढतीही मिळत गेली. त्यांच्या 'स्टारडम'चा ममतांनी प्रचारासाठीही पुरेपूर वापरही करून घेतला. पण, २०१६ साली रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात इतर तृणमूलच्या नेत्यांबरोबरच तापसदांचीही चौकशी झाली व नंतर त्यांना १३ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. असे म्हणतात की, शारदा आणि नारदा चिटफंड घोटाळ्यांपेक्षाही रोझ व्हॅली चिटफंडमधील गैरव्यवहार हा मोठा होता. आरोप, चौकशीने व्यथित झालेल्या तापसदांच्या वाटेला नंतर फारसे सिनेमेही आले नाहीत. तरी त्यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणही नुकतेच संपले होते. राजकारण सोडून पुन्हा पूर्णत: सिनेसृष्टीत परतण्याच्या तयारीत असतानाच तापसदांचे निधन झाले. पण, यासाठी तपास यंत्रणांनाच सर्वस्वी जबाबदार ठरवण्याचा ममतादीदींचा उद्दामपणा हा केवळ आणि केवळ मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच केविलवाणा प्रकार म्हणावा लागेल.

 

फुकाची 'ममता'

 

ममतादीदी म्हणा आपल्या बेताल विधानांसाठी प्रसिद्ध आहेतच. पण, एकटे तापसदाच नाही, तर इतरही काही जणांना केवळ तपास यंत्रणेच्या चौकशीपोटी मृत्यूने कवटाळल्याचा तथ्यहीन आरोपही ममतादीदींनी केला. यामध्ये तृणमूलचे खासदार सुलतान अहमद आणि तृणमूल नेते प्रसून बॅनर्जी यांच्या पत्नीचेही ममतांनी नाव घेतले. खरंतर या प्रत्येकाच्या निधनाची वैयक्तिक कारणं आहेत. पण, केवळ राजकीय अपप्रचारासाठी ममतादीदींनी तापसदांच्या मृत्यूचाही सोयीस्कर वापर करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरंतर गेल्या दोन वर्षांपासून तापसदांना हृदयाचा आणि स्नायूंचा त्रास होताच आणि त्यासाठी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरूच होते. त्यावेळी ममतादीदी तापसदांच्या पाठीशी उभ्या राहिल्या का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. एवढेच नाही, तर एका प्रकरणात तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक झाली तर थेट सीपीएमच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्याची आणि त्यांच्या बायकांचे बलात्कार करण्याची 'फिल्मी स्टाईल' धमकी देऊन तापसदा मोकळे झाले होते. त्यामुळे एकटे तापसदा नाही, तर तृणमूलच्या बऱ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चिटफंडातून पैसे खाल्ले आणि स्वत:बरोबरच तृणमूलचीही तिजोरी भरली. अशा आरोपी, चौकशी सुरू असलेल्या आणि अटकेतही असलेल्या प्रत्येकाविषयी ममतांना म्हणूनच आपुलकीचा उमाळा येणे नैसर्गिकच. पण, तापसदांनी तर २०१८ सालीच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नसल्याचे पक्षाला सांगितले होते. एवढेच काय तर "राजकारणात येऊन आपण घोडचूक केली आणि कोणत्याही राजकीय नेत्याचा चेहराही पाहायची आपली इच्छा नाही," असे त्यांनी निकटवर्तीयांना सांगितल्याचे समजते. तेव्हा, "तापसदा क्रमांक एकचे फिल्मस्टार होते आणि तरीही त्यांना तुरुंगात डांबले," वगैरेसारखी बाष्कळ वक्तव्ये दीदींनी करूच नये. कारण, कायद्यासमोर कुणीही 'स्टार' ठरत नसतो. तेव्हा, दीदींना आपल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची जर एवढीच काळजी असेल तर सर्वप्रथम भ्रष्टाचारावर त्यांनी लगाम कसावा. आपल्या कार्यकर्त्यांकडून होणारी जनवसुलीही थांबवावी. उगाच कोणाच्या मृत्यूचे नाहक भांडवल करून आणि अशाप्रकारे राजकीय 'ममता' लाटून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस आता गेले दीदी!

 
 
@@AUTHORINFO_V1@@